श्री माता कन्यका सेवा संस्थेचा स्तुत्य उपक्रम * स्व.डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्या स्मरणार्थ
श्री माता कन्यका सेवा संस्थेचा स्तुत्य उपक्रम
स्व.डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्या स्मरणार्थ
Shreyash Wankhede:
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात विकासाचा झंझावात निर्माण करत, विविध विकासकामे पूर्णत्वास आणणारे व या क्षेत्राचा चेहरामोहरा बदलविणारे लोकनेते राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय तथा चंद्रपूर-वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने स्व. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार फिरते नेत्र चिकित्सा केंद्राच्या माध्यमातून गावागावात नेत्र रुग्ण तपासणे तथा मोफत चष्मे वितरण आणि नेत्र शस्त्रक्रिया करण्याकरिता बल्लारपूर विधानसभा क्षेत्रामध्ये नेत्र चिकित्सा शिबिरांचे आयोजन दि. १८ फेब्रुवारी ते दि. २५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत नियोजित करण्यात आले आहे.
श्री माता कन्यका सेवा संस्था चंद्रपूर यांच्या सौजन्याने स्व.डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार फिरते नेत्र रुग्णालयाचे दिनांक १८ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० वा. भटाळी येथील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते पुजन करुन यांच्या शुभहस्ते फिरते नेत्रचिकित्सालयाचे उद्घाटन होईल व दि. २५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत नियमितपणे विविध गावांमध्ये फिरत्या नेत्र चिकित्सा रुग्णालयाचे शिबिर आयोजित करुन नेत्र तपासणी करण्यात येईल. यामध्ये गरजुंना चष्मे वितरण करण्यात येईल. ग्रामीण भागातील गरजू नागरिक गरिबीमुळे वैद्यकीय सेवा घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना अनेक आजारांचा घरीच सामना करावा लागतो. परंतु आता फिरत्या नेत्र चिकित्सा रुग्णालयाद्वारे त्यांच्या गावामध्येच त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहे. या शिबिरांमध्ये नेत्र शस्त्रक्रियेकरिता पात्र असलेल्या रुग्णांना दि. २८ फेब्रुवारी २०२४ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र दुर्गापूर येथे सेवाग्राम येथील तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करुन सेवाग्राम येथे शस्त्रक्रिया करण्यात येईल.
रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानुन श्री माता कन्यका सेवा संस्था चंद्रपूर सातत्याने आरोग्य शिबिरांचे आयोजन करीत आहे. याआधी ०१ लाखापेक्षा अधिक नागरिकांनी विविध शिबिरांच्या माध्यमातून आरोग्य सेवेचा लाभ घेतला आहे. ८ हजार नेत्र रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ४० हजार नागरिकांना चष्मे वितरीत करण्यात आले आहे. १०० पेक्षा अधिक बालकांवर हृदयविकार शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली आहे. ५०० हून अधिक दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकल वितरीत करण्यात आली आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या शिबिरांमध्ये गरजु नागरिकांनी सहभाग घेऊन नेत्र चिकित्सा करावी असे आवाहन संस्थेचे सचिव राजेश्वर सुरावार व शैलेंद्रसिंग बैस यांनी केले आहे. शिबिराचा लाभ घेण्याकरिता रामपाल सिंग, हनुमान काकडे, गौतम निमगडे, फारुख शेख, रोशनी खान, केमा रायपुरे, देवानंद थोरात, शांताराम चौखे, अनिता भोयर, विलास टेंभुर्णे, राकेश गौरकार, बंडू गौरकार, श्रीनिवास जंगमवार, दयानंद बंकुवाले, वासुदेव गावंडे, चंद्रकांत धोडरे, रविंद्र पाम्पट्टीवार, अशोक आलाम, जयंत टापरे, अरविंद राऊत यांचेशी संपर्क साधावा.








