श्रेयश वानखेडे:
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या थकबाकी संदर्भातील महत्त्वाच्या आर्थिक मुद्द्यांवर चर्चा झाली. हे प्रकरण, याचिका क्रमांक 4230/2022, हेमंत धुमाळे व इतर विरुद्ध दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट आणि इतर प्रतिवादी यांच्यातील आहे. सर्व कर्मचारी तक्षशीला अभियांत्रिकी महाविद्यालय दारापुर येथील शिक्षकेत्तर कर्मचारी आहेत. हे महाविद्यालय श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट अमरावती द्वारे संचालित केले जाते. कर्मचाऱ्यांनी थकीत वेतन तसेच वेतन थकबाकी (Salary Arrears) करिता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
याचिकाकर्त्यांचे वकील ऍड विजय कोठाळे यांनी २७ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या सुनावणीत कर्मचाऱ्यांचे मार्च २०२४ पासून थकीत असलेले वेतन अदा करण्याची मागणी केली. सुनावणीदरम्यान, संस्थेचे वकील ऍड. पृथ्वीराज एस. चव्हाण यांनी राज्य सरकारकडे शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी 4 कोटी रुपयांची शिष्यवृत्ती थकबाकी असल्याचे अधोरेखित केले. तसेच, मागील शैक्षणिक वर्षातील 1.5 कोटी रुपयांची थकबाकी असल्याचेही त्यांनी सांगितले, ज्यामुळे शैक्षणिक संस्थांच्या आर्थिक स्थैर्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली.
सहाय्यक सरकारी वकिलांनी सध्याच्या शैक्षणिक वर्षासाठी कोणत्याही महाविद्यालयाला शिष्यवृत्ती थकबाकी अदा करण्यात आलेली नसल्याचे न्यायालयाला सांगितले. यावर न्यायालयाने त्यांना मागील वर्षांच्या थकबाकीबाबत अधिक माहिती गोळा करण्याचे निर्देश दिले.
न्या. अविनाश जी. घरोटे आणि न्या. अभय जे. मंत्री यांच्या खंडपीठाने पुढील सुनावणी 3 डिसेंबर 2024 रोजी ठेवली आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सहाय्य मिळावे यासाठी या आर्थिक विसंगतींचे निराकरण करण्याचे महत्त्व न्यायालयाने अधोरेखित केले आहे.
या प्रकरणाच्या निकालावर शिक्षण क्षेत्रातील संबंधित पक्ष लक्ष ठेवून आहेत, कारण न्यायालयाचे निर्णय महाविद्यालयांच्या निधी आणि कार्यप्रणालीवर मोठा परिणाम करू शकतात. सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे घेण्यात आली ज्यामध्ये ऍड विजय कोठाळे अमरावती मधुन उपस्थित राहिले.