गत सहा महिने प्रबोधिनीत प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर नुकत्याच झालेल्या दीक्षांत समारंभात 49 वनपालांनी पासींग आऊट परेड(Passing Out Parade) प्रदर्शित केली. यावेळी, महाराष्ट्र वनविभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) श्रीनिवास राव, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण) तथा वन अकादमीचे संचालक एम. श्रीनिवास रेड्डी यांनी या परेडचे निरीक्षण करुन वनपाल प्रशिक्षणार्थींची मानवंदना स्विकारली.
यावेळी अरुणाचल प्रदेशचे पर्यावरण, वन आणि हवामान बदलचे सल्लागार वांगकी लोवांग, तसेच प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) अरुणाचल प्रदेश पी. सुब्रमण्यम, दुरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
पर्यावरण, वन आणि हवामान बदल अरुणाचल प्रदेशचे सल्लागार वांगकी लोवाँग यांनी वनपाल प्रशिक्षणार्थींना 6 महिन्याचे प्रशिक्षण कालावधीत चंद्रपूर, वन अकादमी येथे दिल्या गेलेले प्रशिक्षण, पुरविण्यात आलेल्या सोयी-सुविधा तसेच प्रशिक्षणा दरम्यान महाराष्ट्र, तेलंगना, आंध्रप्रदेशातील अभ्यास दौऱ्यात वनपाल प्रशिक्षणार्थींनी अध्ययन केलेल्या विशेष बाबींचे सादरीकरण केले. अरुणाचल प्रदेशचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) पी. सुब्रमण्यम यांनी चंद्रपूर वन अकादमी येथे वनपाल प्रशिक्षणार्थींना उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिल्याबद्दल वन अकादमीचे आभार व्यक्त केले. तसेच माहे फेब्रुवारी 2025 पासून पुन्हा नवीन 50 अप्रशिक्षित वनपाल तुकडीस प्रशिक्षणासाठी चंद्रपूर वन अकादमी येथे पाठविण्याचे जाहिर केले.
प्रशिक्षणार्थी वनपालांना प्रमाणपत्र वितरण : यावेळी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण) तथा वन अकादमीचे संचालक एम. श्रीनिवास रेड्डी, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक, अशोक खडसे, अपर संचालक मनिषा डी. भिंगे, सत्र संचालक संजय एस. दहिवले यांच्या हस्ते प्रशिक्षण पुर्ण केलेल्या 49 वनपालांना प्रमाणपत्र तसेच विशेष प्राविण्य प्राप्त प्रशिक्षणार्थ्यांना पदक देवून सन्मानित केले. तसेच वनपालांना मार्गदर्शन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
००००००