नरखेड येथील महाराष्ट्र छात्र सेनेचे (MCC) संचालन, एक अविस्मरणीय अनुभव !
नागपूर येथील हिवाळी अधिवेशन सुरू होते. दिवसभराची धावा-धाव करून नुकताच अंथरुणावर पडलो होतो. रात्रीचे 1.00 वाजले होते. अचानक फोनची रिंग वाजली. झोप लागलीच नव्हती. त्यामुळे पहिल्या रिंगलाच फोन उचलला. पलीकडून अत्यंत भारदस्त आवाज कानावर पडला. बोलणारी व्यक्ती अत्यंत रागात असल्याचे आवाजावरून जाणवले. त्यांनी सांगितले………..
“रामा झोपलास का रे……..”
मी घाबऱ्या-घाबऱ्या आवाजात……… “सर आत्ताच पाठ टेकली आहे.” असे सांगितले.
हे बघ मी येथे आलो आहे……………
“मला तुमच्या कार्यक्रमाची कोणतीच तयारी दिसून येत नाही. उद्या कार्यक्रमाला जरा सुद्धा गालबोट लागले, अव्यवस्था झाली. तर तुझे आणि तुझ्या शिक्षण उपसंचालकाचे मी असे हाल करेन की, तुमच्याकडे पाहून साऱ्या शिक्षण विभागाला तुमची किव येईल.”
मी म्हटले……….
“सर काय झाले, मला कळले तर ठीक होईल. मी आत्ताच सर्व तयारीबाबत संबंधितास बोललो असून सर्व व्यवस्था तयार असल्याचे त्यांनी मला सांगितले. त्यांच्याशी बोलणे झाल्यानंतरच मी अंथरुणावर पाठ टेकण्याचे धाडस केले.”
त्यांनी सांगितले………..
“ते काही नाही, येथे मला कसलीच व्यवस्था दिसत नाही.”
“माझ्यासोबत नव्यानेच रुजू झालेले शिक्षणाधिकारी बोरकर यांना तुम्ही पाठवून दिले, ते नव्यानेच रूजू झाले असल्यामुळे त्याला कसलीही माहिती नाही. आणि तुम्ही दोघे घरात झोपा काढताय………., आत्ताच्या आत्ता निघा………, आल्यानंतर मला सूचना द्या.”
पलीकडचा आवाज तत्कालीन शिक्षण संचालक आदरणीय श्री.राघवेंद्र पाटील यांचा होता.
मी मनातून अत्यंत घाबरलो होतो मी तात्काळ शिक्षण उपसंचालक श्री.मस्के साहेबांना फोन केला. त्यांचीही अवस्था माझ्यासारखीच होती. त्यांनीही नुकतीच पाठ टेकली होती. मी त्यांना फोनवरच्या संभाषणाचा वृत्तांत सांगितला. मी आता घरी येतो. आपण पुढचा काहीतरी विचार करू अशी त्यांना विनंती केली. त्यांनी होकार दिला. त्यांचे निवासस्थानही माझ्या निवासस्थानापासून फार दूर अंतरावर नव्हते. मी पटकन त्यांचेपर्यंत पोहोचलो.
थोड्या वेळापूर्वीच आपण स्थिती जाणून घेतली होती. फोनवर संभाषण झाले होते आणि आता हे काय नवीन झेंगट उभे झाले, असे त्यांनी सांगितले. साहेबांनी कार्यक्रमाच्या तयारीसाठी ज्यांचेमार्फत काम दिले होते, त्या श्री.विजय केवलरामाणी यांना फोन केला. ते एका शाळेचे संस्थाचालक होते. अत्यंत प्रामाणिक व सदैव मदतीसाठी तत्पर असणारे शिक्षण विभागात वावरणारे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व होते. ते सुद्धा इतक्या उशिरा फोन आल्यामुळे काहीसे घाबरले.
त्यांच्याशी संवाद झाला. ते म्हणाले तुम्ही काळजी करू नका, तयारी करा मी पंधरा-वीस मिनिटात पोहोचतो. आपण सगळे सोबतच नरखेडला जाऊ. हा संवाद संपल्यानंतर त्यांनी लागलीच ठेकेदाराला फोन केला. ठेकेदाराने प्रथम तर इतक्या उशिरा फोन करून माझी झोपमोड केली याबाबत त्यांना अक्षरशः झापले.
ठेकेदार म्हणाले……..
“साहेब, तुमचा कार्यक्रम फक्त एका दिवसाचा आहे. मला माझ्या व्यवसायाच्या प्रतिष्ठेला जपणे त्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. माझा एक कार्यक्रम बिघडला, तर माझा व्यवसाय मोडीत निघेल. याची मलाही भीती आहे. आपणाला जशी काळजी आहे, तशीच काळजी मलाही होती आणि आहे.
जोपर्यंत माझ्या माणसांनी मला हिरवी झेंडी दिली नाही, तोपर्यंत मी सुद्धा झोपलो नव्हतो.”
त्यांना आमच्यासोबत चालण्याची विनंती केली. पण त्यांनी साफ नकार दिला. माझ्या बोलण्यावर आपला विश्वास नसेल तर तुम्ही जा, मी येणार नाही. असे त्यांनी निक्षुन सांगितले. त्यांच्या बोलण्यातून भयंकर आत्मविश्वास जाणवत होता.
श्री.विजय केवलरामाणी सर जरीपटका परिसरात राहत होते. ते येईपर्यंत पंधरा ते वीस मिनिटे लागणार होती. मी साहेबांची परवानगी घेऊन घरी आलो. जाण्याची तयारी केली. माझ्या निवासस्थाना शेजारीच आमच्या चालकाचेही निवासस्थान होते. त्याला घरी जाऊन आवाज दिला. त्याला तात्काळ गाडी काढून नरखेडला जाण्याची तयारी करण्याची सूचना केली. तो ही तत्पर तयार झाला. गाडी गॅरेज मधून काढेपर्यंत केवलरामाणी सर पोहोचले होते. आम्ही रात्री 2.00 वाजताच्या सुमारास नरखेडच्या दिशेने जाण्यासाठी निघालो होतो.
प्रसंग असा होता 1995 साली सत्तेत आलेल्या युती सरकारचे काळात महाराष्ट्र छात्र सेना (MCC) या नावाने इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी एक योजना सुरू केली होती. या महाराष्ट्र छात्र सेनेच्या 3,000 हजार विद्यार्थ्यांचे संचालन नरखेड येथे ठेवण्यात आले होते. त्यासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहीम पी.सी.अलेक्झांडर, राज्याचे शिक्षण मंत्री नामदार सुधीर जोशी व अन्य बरीच मंडळी येणार होती. शिक्षण राज्यमंत्री मा.अनिल देशमुख यांच्या मतदारसंघात हा कार्यक्रम होता. त्यांच्या पुढाकारानेच कार्यक्रमाची आखणी केली होती. महाराष्ट्र छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांच्या संचालनाबरोबरच “एरो मॉडेलिंगचा शो” सुद्धा ठेवण्यात आला होता. विविध प्रकारच्या विमानांच्या प्रतिकृती व त्यांचे हवेतील उड्डाण यामध्ये प्रेक्षकांना पाहण्यास मिळणार होते. कार्यक्रमाची तयारी जवळपास महिनाभरापासून चालू होती. संचालन परेडची जबाबदारी एमसीसीच्या कमांडर व त्यांच्या सहाय्यक अधिकाऱ्यांवर होती. निवासस्थान, भोजनव्यवस्था व इतर बाबी शिक्षण विभागांनी पहावयाच्या होत्या. सर्वांच्या समन्वयाने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.
श्री.लक्ष्मीनारायण सोनवणे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, नरखेड हे तयारीसाठी रात्रंदिवस खपत होते. तीन-चार दिवसांपूर्वीच मी आणि मस्के साहेब नरखेडला जाऊन आलो होतो. सोनवणे यांच्याकडे सगळ्या तयारीची ब्ल्यू प्रिंट तयार होती. त्यांनी अत्यंत अप्रतिम नियोजन केले होते. येणारे विद्यार्थी कोणत्या ठिकाणी थांबणार, त्यांच्या थांबण्यासाठीची व्यवस्था, किती विद्यार्थी येणार त्यांच्या संख्या, विद्यार्थ्यांच्या आंघोळीसाठी व प्रातर्विधीसाठी तात्पुरते संडास व बाथरूम पाण्याची सोय आणि सर्व विद्यार्थ्यांची जेवणाची सोय या सर्व बाबी त्यांनी प्रथम समजावून सांगितल्या व नंतर प्रत्यक्ष दाखविल्या सुद्धा. आपल्या सहकारी विस्तार अधिकारी (शिक्षण) व केंद्रप्रमुख यांचेवर त्यांनी जबाबदाऱ्या निश्चित केल्या होत्या व त्या सर्वांना लेखी स्वरूपात सूचनाही दिल्या होत्या.
ना.अनिल देशमुख, शिक्षण राज्यमंत्री यांचेकडूनही अधूनमधून याबाबतचा आढावा घेतला जात होता. नागपूर येथील नामांकित सेवा पुरविणाऱ्या कंत्राटदाराला मंडप, साउंड सिस्टिम, बैठक व्यवस्था इत्यादी व्यवस्था करण्याची जबाबदारी सोपविली होती. कार्यक्रमाचे संचालन करण्यासाठी आकाशवाणीचे वृत्त निवेदक / कार्यक्रम संचालक श्री.किशोर शर्मा यांना विशेष विनंती करून निमंत्रित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या भोजनाची सारी व्यवस्था कंत्राटदाराला दिली होती. सर्व व्यवस्था उत्तम प्रकारे झालेली असल्यामुळे कार्यक्रम यशस्वी होणारच याबाबत शिक्षण उपसंचालक, मस्के साहेब व मी सुद्धा आश्वस्त होतो. असे असले तरीही शिक्षण संचालकाचा आदेश झाल्यामुळे आमची गाडी नरखेडच्या दिशेने धावत होती.
नागपूर ते नरखेड हा रस्ता त्याकाळी फारसा चांगला नव्हता. त्यातही आमचे वाहन फार जुने असल्यामुळे फार वेगाने धावत नव्हते. त्यामुळे आम्हाला नागपूर ते नरखेड हा प्रवास पूर्ण करायला जवळपास तीन तास लागले. नरखेड पोहोचेपर्यंत गावातील बरीच मंडळी सकाळी उठली होती, उठत होती आणि रात्रभर डोळ्याला डोळा न लावता आम्ही पुढे सरकत होतो.
नरखेड विश्रामगृहावर पोहोचेपर्यंत चांगलेच उजाडले होते. विश्रामगृहावर श्री.चंद्रमणी बोरकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे एकटेच थांबले होते.
त्यांनी सांगितले………..
“साहेब, रात्रीच श्री.सुनील शिंदे, माजी आमदार यांच्या निवासस्थानी मुक्कामाला गेलेत. रात्रभर मी या विश्रामगृहात एकटाच होतो. त्यामुळे मी सुद्धा नीट झोपू शकलो नाही. भीती वाटत होती.
रात्रभर झोपलो नव्हतो, तरीही आम्ही सर्वांनी ब्रश केले. चेहऱ्यावर पाणी मारले. थोडी तरतरी यावी यासाठी चहा मिळणे फार आवश्यक होते. तथापि, विश्रामगृहावर वरील खानसामा जागेवर नव्हता. आम्ही बाहेर कुठे चहा मिळतो काय? याची चाचणी करीत होतो. तथापि, एवढ्या सकाळी चहाची दुकाने उघडली नव्हती. चहा न घेताच आम्ही कार्यक्रम स्थळी पोहोचलो. तेथील व्यवस्था पाहणारी माणसेही झोपली होती. त्यांच्या प्रमुखाला उठविले. तो म्हणाला संपूर्ण तयारी झालेली आहे. तो असे सांगत होता. तथापि, आम्हालाही तसे काही दिसत नव्हते. कदाचित, त्यामुळेच संचालक महोदयाचा पारा गरम झाला असावा. सकाळी 7.00 वाजता सर्व मंडळी कामाला लागली. आश्चर्य म्हणजे दीड-दोन तासात त्यांनी स्टेज, मंडप, खुर्च्या, साऊंड सिस्टिम, बैठक व्यवस्था इत्यादी सर्व तयारी केली. आम्ही विचारात पडलो. आतापर्यंत काहीच दिसत नव्हते. आता मात्र जय्यत तयारी झाल्याची दिसून येत होते. सकाळी 9.00 वाजेपर्यंत छात्र सेनेचे अधिकारी पोहोचले. विद्यार्थी पोहोचले. मैदानावर आखून दिलेल्या व नेमून दिलेल्या जागांवर विद्यार्थ्यांचे ग्रुप उभे राहिले. तोपर्यंत “एरो मॉडेलिंग शो” करणारी मंडळी पोहोचली. सर्व तयारी जय्यत झाली. शिक्षण संचालक महोदय सुद्धा आले. त्यांनी सर्व बाबीवर एक नजर फिरविली. बाजूला जाऊन त्यांची व म्हस्के साहेबांची बातचीत झाली. रात्री मी आलो तेव्हा काहीही दिसत नव्हते, असेही त्यांनी बोलून दाखविले.
कार्यक्रम वेळेवर सुरू झाला. संपूर्ण मैदान महाराष्ट्र छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांच्या लयबद्ध हालचालींनी मनोवेधक वाटत होते. नरखेडला राज्यपाल येणार, तसेच विद्यार्थ्यांचे संचालन व एरो मॉडेलिंग शो पहावयास मिळणार, त्यामुळे काटोल-नरखेड तालुक्यातील बहुसंख्य विद्यार्थी व मोठ्या संख्येने नागरिक जमले होते. सगळीकडे गर्दीच गर्दी दिसत होती. संचालनामध्ये फक्त इयत्ता नववीचे विद्यार्थी होते. परंतु, आपल्या शाळेतील विद्यार्थी भाग घेत आहेत हे पाहण्यासाठी शाळेतील सर्वच विद्यार्थी जमेल तसे नरखेडला पोहोचत होते. “एरो मॉडेलिंग शो” हे सुद्धा त्यामागील एक आकर्षण होतेच.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य कमांडर यांनी केले. स्वागतपर भाषण मा.अनिल देशमुख, शिक्षण राज्यमंत्री यांनी केले. त्यानंतर संचालनाला सुरुवात झाली. अत्यंत शिस्तबद्ध संचालन झाले. त्यानंतर शिक्षण मंत्री सुधीर जोशी यांचे भाषण झाले. त्यानंतर सर्वात शेवटी राज्यपाल महोदय यांचे भाषण झाले. त्यांनी इंग्रजीत भाषण केले. त्यांच्या भाषणाचा हिंदीतून अनुवाद कार्यक्रम संचालक किशोर शर्मा करीत होते. त्यांनी हिंदी अनुवाद इतक्या उत्तम रीतीने केले की, राज्यपाल महोदय भारावून गेले. त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख करताना सांगितले की, असा अनुवादक मला आजपर्यंत भेटला नाही. अनेक वेळा तर मी बोललो वेगळे आणि अनुवादक स्वतःच भाषण भाषण करतो असे वाटायचे, असाही उल्लेख करत त्यांनी किशोर शर्मा यांना स्टेजवर बोलावून त्यांचा सत्कार केला.
राज्यपाल महोदयांच्या भाषणानंतर “एरो मॉडेलिंग शो” ला सुरुवात झाली. विविध प्रकारची विमाने त्यांच्या हवेतील कसरती-करामती यांचे जिवंत प्रदर्शन पाहून आलेले सर्व विद्यार्थी व नागरिक धन्य झाले. सर्वांच्या तोंडून कौतुकाचे शब्द निघत होते. शो संपल्यानंतर आभार प्रदर्शनाने व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
आतापर्यंतचा कार्यक्रम अत्यंत शांततेत व नियोजनबद्ध रीतीने पार पडला होता. संचालनामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. संचालनात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची व त्यांचेसोबत आलेल्या शिक्षकांची संख्या आमच्या जवळ होती. त्यानुसार भोजनाची संपूर्ण तयारी झाली होती. भोजन समितीमध्ये काम करणाऱ्या लोकांनी आपले काम चोख बजावले होते. संचालनात भाग घेणारे 3000 विद्यार्थी 300 ते 400 शिक्षक व व्यवस्थेत काम करणारे अन्य असे जवळजवळ 3500 लोकांच्या भोजनाची जय्यत तयारी होती.
आपापल्या खोल्यांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी छात्र सेनेचा गणवेश काढून सुरक्षित ठेवला व साध्या गणवेशात भोजन व्यवस्थेकडे यायला विद्यार्थ्यांनी सुरुवात केली. सर्व विद्यार्थी शालेय गणवेशांमध्ये असल्यामुळे परेडसाठी आलेले विद्यार्थी कोणते व कार्यक्रम पाहण्यासाठी आलेले विद्यार्थी कोणते हे ओळखणे कठीण झाले. त्यामुळे येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना जेवण देणे भाग पडले. परिणाम असा झाला की, तयार केलेला स्वयंपाक संपला. बाहेर मात्र विद्यार्थ्यांची गर्दी कायम होती.
भोजन व्यवस्थेचा ठेका श्री.नरेंद्र गोडे या अत्यंत सुस्वाभावी व अनुभवी व्यक्तीला दिला होता. त्यांनी स्काऊट गाईडचे प्रशिक्षण आणि शिक्षकांच्या मोठमोठ्या कार्यक्रमात चांगल्या प्रकारे भोजन व्यवस्था केली होती. आम्ही सर्व अधिकारी काळजीत होतो. उद्या वर्तमानपत्रातून बातम्या प्रसिद्ध झाल्या की, संचालनात सहभागी होण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना भोजन मिळाले नाही तर आपले काही खरे नाही, ही भावना आम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर जाणवत होती. नरेंद्र गोडे मात्र आश्वस्त होता. त्यांनी सांगितले, “सर एकही विद्यार्थी न जेवता परत जाणार नाही, याची मी हमी देतो. मात्र आपणास भाजी व चपाती देता येणार नाही. आपण सर्व विद्यार्थ्यांना बटाटेमिश्रित फोडणीच्या भाताचे जेवण देऊ.” त्यांनी आपल्या लोकांना सूचना केल्या. त्याचेजवळ असलेला राखीव साठाही संपला. त्याने नरखेडच्या बाजारातून भाताचे कट्टे मागविले, बटाटे मागविले, गॅसचे सिलेंडर मागविले. एकीकडे शिजविणे चालू होते. दुसरीकडे वाढणे चालू होते. विद्यार्थ्यांना आवरता-आवरता आमची दमछाक होत होती. मी, बोरकर साहेब, सोनवणे साहेब, केवलरामाणी सर आणि खुद्द मस्के साहेब विद्यार्थ्यांना थोपवित होतो. मुलांना भुका लागल्या होत्या. त्यांचाही दोष नव्हता. प्रवेशद्वाराजवळ मस्के साहेब काठी घेऊन बसले होते. फारच आणीबाणीची परिस्थिती होती.
शाळेच्या परिसरातील शेवटच्या मुलाचे जेवण झाले आणि आम्ही सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. किती विद्यार्थी जेवले असतील याचा अंदाज आम्ही घेत होतो. लागलेला शिधा व समोर दिसणारी गर्दी यावरून जवळजवळ 7000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी जेवण केले असण्याची शक्यता होती. आम्हालाही भुका लागल्या होत्या. आम्ही सुद्धा बटाटामिश्रित तो पिवळा भात खाल्ला. घाईघाईने स्वयंपाक केला असला तरीही चव मात्र उत्तम होती. आम्ही जेवण घेतले. नरेंद्र गोडे यांचे आभार मानले.
शाळेच्या परिसरातील मुलांचा किलबिलाट शांत झाला होता. आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर फार मोठ्या संकटातून वाचल्याचे जाणवत होते. आम्ही परत यायला निघालो. बोरकर साहेब, केवलरामाणी सर मी आणि मस्के साहेब एकाच गाडीत परत येणार होतो. लक्ष्मीनारायण सोनवणे यांचे काम अजून संपले नव्हते. ते आम्हाला सोडण्यासाठी गाडीपर्यंत आले.
मस्के साहेबांनी गाडीत बसण्यापूर्वी सोनवणेला कडकडून मिठी मारली आणि उद्गारले……….
“बाबा, आज तू मला व स्वतःलाही निलंबित होण्यापासून वाचविले आहे, तुझे खूप खूप अभिनंदन !”
दुसऱ्या दिवशी एरो मॉडेलिंग शो व छात्र सेनेच्या संचालन कार्यक्रमाबाबत सर्व वर्तमानपत्रांमध्ये रकानेच्या रकाने भरून बातम्या आल्या, फोटो आले. त्यामध्ये मैदानात व स्टेजवर झालेल्या कार्यक्रमाचे वर्णन होते. मात्र, निवासव्यवस्था व भोजनव्यवस्था यासाठी जीवाचे पाणी केलेल्या श्री.लक्ष्मीनारायण सोनवणे यांच्या कसरतीचा कोठेही उल्लेख नव्हता.
राम पवार
अमरावती
भ्रमणध्वनी : 9284196496
|
|









