Wednesday, April 22, 2026
HomeEducationआणि --- एके दिवशी मंत्रालयातुन दुरध्वनी आला.
spot_img

आणि — एके दिवशी मंत्रालयातुन दुरध्वनी आला.

आणि — एके दिवशी मंत्रालयातुन दुरध्वनी आला.

दिनांक 17 एप्रिल, 2006 पासून 30 जून, 2009 पर्यंत मी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, वर्धा येथे कार्यरत होतो. नागपूर हे विभागीय कार्यालयाचे ठिकाण. तेथेच विभागीय मंडळ व मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ यामुळे कार्यालयीन कामासाठी वारंवार नागपूरला जावे लागत असे. नागपूरला कोतवालनगर येथे कुटुंब राहायचे. तशी ही जागा छत्रपती चौकापासून पायी चालत जाता येण्यासारखी आहे. मी बसमधून छत्रपती चौकात उतरलो. सर्व रिक्षावाले प्रवासी शोधत बसच्या दारासमोर दाटीवाटीने उभे होते. प्रवाशांना आवाज देत होते. त्या रिक्षावाल्यांमध्ये एक हिंदी भाषिक रिक्षावाला होता. “साहब, आपको मेरे ही रिक्षा मे चलना होगा” असे मला उद्देशून तो बोलला. इतर रिक्षावाल्यांनाही “साहब मेरेही रिक्षा मे जायेंगे” असे सांगत माझी बॅग घेतली. मला रिक्षापर्यंत जवळ-जवळ आग्रहाने म्हणा किंवा जबरदस्तीने मना घेऊन गेला. मी क्षणभर मनातून घाबरलोसुद्धा. यापूर्वी असा अनुभव कधीच आला नव्हता. त्याचप्रमाणे रिक्षावाल्यांच्या अप्रामाणिकपणाच्या घटना कधीतरी ऐकलेल्या होत्या. तरीही फक्त सात ते दहा मिनिटांचा प्रवास आहे. तसेच मुख्य रस्त्यावरूनच जायचे आहे. त्याचप्रमाणे फार उशीरही झालेला नव्हता. रस्त्यावर भरपूर वर्दळ होती, त्यामुळे दगाफटका होण्याची शक्यता जवळजवळ नव्हतीच. मी त्याला किती पैसे घेणार असे विचारले. “पैसेका रहने दो साहब, आप पहले बताओ कहा जाना है” तो म्हणाला. मी पत्ता सांगितला. त्याने रिक्षा सुरू केली. अगदी सात-आठ मिनिटातच माझे कुटुंब राहत असलेल्या इमारती समोर रिक्षा पोहोचली.

साधारणपणे छत्रपती चौकातील बस स्टॉप वरून 10 ते 15 रुपये त्याकाळी रिक्षा भाडे लागायचे. मी वीस रुपयाची नोट त्याला देण्यासाठी तयार ठेवली होती. त्याने पैसे घेण्यास साफ नकार दिला. मला प्रश्न पडला, एक तर यांनी अत्यंत जबरदस्तीने मला  रिक्षात घेतले. आता पैसे घेण्यासही हा नकार देतो आहे. माझ्या मनातले गुढ आणखी वाढत होते. तो पुढे बोलला “साहब आपने मुझे पहचाना नही होगा, मुझे उम्मीदही नही है, लेकिन मैने आप को पहचान लिया. आप पवार साहब हो ना. मै आपसे कैसे पैसे ले सकता, साहब” मी आणखी कोड्यात पडलो.* *एखादी अनोळखी व्यक्ती असे कसे म्हणू शकते. तो पुढे म्हणाला “साहब आप नागपूरमे थे, तब आपने मेरे बच्चे का एडमिशन बडे स्कूल मे करवा दिया था. मै ऊस बात को कभी भुलाही नही सकता.” माझ्या मनातील गुढ आणखी गडद व्हायला सुरुवात झाली. तो बोलतो तेंव्हा ते खरेच असेल, पण मी एखाद्या रिक्षाचालकाच्या मुलाच्या प्रवेशासाठी मदत केली हे मला आठवतही नव्हते.

त्याच्याशी संवाद साधत आता तो कोणत्या वर्गात आहे. अभ्यासात कसा आहे. त्याच्या शाळेची फी पण जास्त असणार हे शाळेच्या नावावरून स्पष्ट होते, त्यामुळे फी कशी मॅनेज करतो. याबाबत मी आणखी विचारणा केली. त्याने आपण कधी-कधी दोन पाळीत रिक्षा चालवून कुटुंबाचा आणि त्याच्या शिक्षणाचा खर्च भागवतो. आता तो इयत्ता नववीत आहे. दरवर्षी तो पहिल्या पाच क्रमांकात असतो. मला त्याचेकडून खूप अपेक्षा आहेत. आपण त्याच्या प्रवेशासाठी मदत केली नसती तर न जाणो काय झाले असते. असे सांगून नमस्कार करून पैसे न घेता तो निघून गेला.

हा प्रसंग तसा साधाच. पण मला कायम आयुष्यभर लक्षात राहील, असा राहिला. कारण त्याच्या प्रत्येक शब्दात तळमळ जाणवत होती त्याचप्रमाणे माझ्याबाबत एक संवेदना दिसत होती. दोन-तीन मिनिटाच्या संवादात त्याने मला माझा भुतकाळ आठवून दिला. अत्यंत प्रतिकुल परिस्थिती असतांना आपला मुलगा शिकला पाहिजे ही माझ्या वडिलांची भावना एके काळी होती. तीच त्याच्या वक्तव्यातुन प्रकट होत असल्याचे क्षणाक्षणाला जाणवत होते. एक साधारण अशिक्षित रिक्षावाला मला कायम विचार करायला लावून क्षणात निघून गेला. मी त्याला त्याचे नावही विचारले नाही. तसेच आजपर्यंत तो पुन्हा कधी भेटला नाही. आता या घटनेला अनेक वर्षे झाली असली तरी त्याची रिक्षा व तो समोर असल्यासारखाच तो प्रसंग आठवतो. अशिक्षित पालकही आता आपल्या मुलांच्या शिक्षणाबाबत जागरूक आहेत ही बाब मनाला उभारी देऊन जाते.

त्यानंतर वर्धा येथून माझी बदली नांदेडला शिक्षणाधिकारी (माध्यमिक) या पदावर झाली. एके दिवशी रात्री दहा वाजता शिक्षण संचालक आदरणीय भालचंद्रजी देसले साहेबांचा फोन आला. ते म्हणाले “राम तुझी बदली झाली रे” मी बदलीपात्र होतोच, तसेच अमरावती येथे सहाय्यक संचालक पदावर माझे नावाचा प्रस्ताव तयार झाल्याचे मला कळले होते. मी उद्गारलो….. “सर धन्यवाद” ते म्हणाले तुला अपेक्षा जशी आहे तशी बदली झालेली नाही. मी मनातून जरासा दचकलोच. ते म्हणाले तुझी बदली नांदेड येथे झाली आहे. माझी बहुतेक सेवा विदर्भातच झाली होती. त्यामुळे अमरावतीला जाण्यासाठी मी उत्सुक होतो. पण नांदेडला बदली झाली हे कळल्यानंतर माझ्या उत्साहावर पाणी फिरले. एकतर अनोळखी भाग आणि मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात बदली. मी साहेबांना विचारले. सर हा बदल अचानक कसा झाला. त्यांनी सांगितले मा.मुख्यमंत्री यांनी शिक्षण मंत्र्यांना नांदेडची जागा भरण्यास सुचित केले, आणि शिक्षण मंत्र्यांनी मला बदलीपात्र अधिकाऱ्यांमधून कोणाची बदली नांदेडला करता येईल, हे सुचविण्यास सांगितले. त्यानुसार मी तुझे नाव सुचविले असून त्यात माझा शब्द अडकलेला आहे. कोणत्याही परिस्थितीत बदली रद्द करण्यासाठी प्रयत्न करायचा नाही, असाही त्यांनी आदेशच दिला. मी त्यांना विश्वास दिला “सर, आपण माझ्यावर दाखविलेला विश्वास मी सार्थ करून दाखवेन.”

शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना दरवर्षी सांख्यिकी माहिती शासनाला सादर करावी लागते. शाळानिहाय, वर्गनिहाय, संवर्गनिहाय, लिंगनिहाय अशी ही सर्वसाधारण माहिती असते. जिल्हानिहाय माहिती एकत्र केल्यानंतर राज्याची माहिती तयार होते. त्यामध्ये वाढ/ घट व अन्य बाबतीत विश्लेषण करून राज्याच्या शैक्षणिक धोरणाची दिशा ठरवली जाते. ही माहिती सादर करतांना विशेष काळजी घेणे आवश्यक असते, तरीही अनेकदा त्यात यांत्रिकपणा दिसून येतो. आदरणीय भाऊसाहेब गावंडे नेहमीच बैठकीत एक वाक्य सांगायचे “आपण सादर करीत असलेल्या माहितीतील प्रत्येक आकडा निश्चित कांही सांगत असतो, बोलत असतो, फक्त त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे.” अनेकदा थातुरमातुर माहिती देण्याचा प्रयत्न केला तर त्यातील फोलपणा ते काही क्षणातच लक्षात आणून देत असत. सर्वांसमोर आपले हसे होऊ नये म्हणून मी फार काळजी घेत असे. पुढे हळूहळू त्याची सवयच लागली. पटकन सही न करता त्या माहितीच्या अंतरंगात डोकावून पाहणे व त्याबाबत स्वतःलाच काही प्रश्न विचारून उत्तरे शोधण्याची कला मी स्वप्रयत्नाने वाढवली होती. अशाच एका नांदेड जिल्ह्याच्या माहितीच्या तक्त्यावर मी नजर फिरवीत होतो त्यामध्ये शैक्षणिक सत्र 2008-09, 2009-10 व 2010-11 ची माध्यमिक शाळातील इयत्तानिहाय पटसंख्या होती.

वर्ष वर्ग 5 वा वर्ग 6 वा वर्ग 7 वा वर्ग 8 वा वर्ग 9 वा वर्ग 10 वा एकुण

2008-09 23,528 27,947 29,559 50,533 46,218 41,973 2,19,758

 *4,003*

2009-10 22,937 26,855 28,674 50,519 46,930 42,215 2,18,130

 *7,170*

2010-11 24,082 27,059 27,540 48,724 47,878 39,760 2,15,043

वरील माहितीवरून लक्षात येते की, नांदेड जिल्ह्यामध्ये 2008-09 मध्ये इयत्ता नववी मध्ये 46,218 विद्यार्थी होते. त्यापैकी 2009-10 मध्ये इयत्ता दहावी ला 42,215 विद्यार्थी आले. याचाच अर्थ 4,003 विद्यार्थी कमी झाले. त्याचप्रमाणे 2009-10 मध्ये इयत्ता नववी मध्ये 46,930 विद्यार्थी होते. त्यापैकी 2010-11 मध्ये इयत्ता दहावी ला 39,760 विद्यार्थी आले. याचाच अर्थ 7,170 विद्यार्थी कमी झाले. हे विद्यार्थी नापास झाले, असे मानले तर इयत्ता आठवी पास झालेले विद्यार्थी इयत्ता नववी मध्ये नापास झालेले विद्यार्थी याचा आकडाही जुळत नव्हता. त्याचबरोबर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या मुलाला चांगले शिक्षण देण्यासाठी जिवाचे रान करणारा रिक्षावाला व त्यासारखेच अनेक पालक मला या विषयावर चिंतन करण्यास भाग पाडत होते. नापास होणे हा प्रश्न गंभीर होताच त्यापेक्षाही शाळा सोडून देणे हा अधिकच गंभीर प्रश्न होता.

विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोयीचे व्हावे याकरिता शासनाने अनेक विद्यार्थी हिताच्या योजना सुरू केल्या. त्यात शालेय पोषण आहार, विद्यावेतन, शिष्यवृत्त्या अशा योजना आहेत. असे असतांना इयत्ता 9 वी पर्यंत शाळेत नियमित असणारे 7170 विद्यार्थी इयत्ता 10 मध्ये कमी कां होतात? आपल्या मुलाचे शिक्षण व्हावे म्हणुन धडपडणारा रिक्षावाला हा अनेक पालकांचा प्रतिनिधी होता. मग इतर पालक त्यांच्यासारखा विचार करीत नसतील का? एक ना अनेक प्रश्न मला बेचैन करायला लागायचे. याबाबत सहकारी अधिकारी / कर्मचारी यांचेसोबत कधी-कधी  चर्चा व्हायची त्यामध्ये हा पट खोटा असण्याची शक्यता व्यक्त व्हायची. जर हा पट खोटा असेल तर तो कसा शोधता येईल यावर मात्र कोणतेच समाधानकारक उत्तर मिळत नव्हते. “आणि एके दिवशी मंत्रालयातुन दुरध्वनी आला.” नांदेडचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना बैठकीस बोलाविण्यात आले. या बैठकीत या माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे एकाच वेळी मिळाली. नांदेड जिल्ह्याची पहिली पटपडताळणी 7 ते 10 सप्टेंबर, 2011 या कालावधीत झाली.

राम पवार

अमरावती

भ्रमणध्वनी : 9284196496

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page