Monday, April 20, 2026
HomeMaharashtraराज्यात शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये १६ जून रोजी 'शाळा प्रवेशोत्सव'
spot_img

राज्यात शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये १६ जून रोजी ‘शाळा प्रवेशोत्सव’

राज्यात शासकीय आदिवासी  आश्रमशाळांमध्ये १६ जून रोजी ‘शाळा प्रवेशोत्सव’

आदिवासी विकास विभागाचा अभिनव उपक्रम

शैक्षणिक गुणवत्ता बाबत कोणतेही तडजोड करणार नाही.

मंत्री डॉ. अशोक उईके

आश्रमशाळांमधील शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी बहुआयामी प्रयत्न

 श्रेयश वानखेडे : आदिवासी विकास विभागामार्फत राज्यातील सर्व शासकीय आश्रमशाळांमध्ये १६ जून २०२५ या दिवशी नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात “शाळा प्रवेशोत्सव” या कार्यक्रमाद्वारे उत्साहात होणार आहे. या  दिवशी प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत लोकप्रतिनिधी तसेच  प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. प्रवेशाचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी केवळ औपचारिक न राहता आनंद, आत्मीयता आणि प्रेरणा देणारा क्षण ठरावा, हा त्यामागील मुख्य हेतू असल्याचे सांगून आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी विभागामार्फत विविध बहुआयामी उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी सांगितले.

  मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आज त्यांच्या शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

   मंत्री डॉ. उईके म्हणाले, राज्यात एकूण ४९७ शासकीय आश्रमशाळा आणि ५५४ अनुदानित आश्रमशाळा कार्यरत आहेत. नाशिक व ठाणे विभागातील शाळा दि. १६ जून २०२५ पासून सुरू होणार आहेत. तर नागपूर व अमरावती विभागातील शाळा दि. ३० जून २०२५ पासून सुरु होतील.

 मुंडेगाव येथील शासकीय आश्रमशाळेत १६ जून रोजी शाळा प्रवेशोत्सवासाठी मी स्वतः उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

  *प्रत्येक शाळेसाठी एक परिचारिका नियुक्त*

 विद्यार्थ्यांच्या आरोग्याची निगा राखण्यासाठी प्रत्येक  आश्रमशाळेत एक परिचारिका (नर्स) नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची नियमित देखरेख शक्य होणार आहे.  आश्रमशाळांमध्ये इयत्ता १ लीपासून विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने, ६ वर्षांवरील वयोगटातील विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी दक्ष राहणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर शाळेत नर्सची उपलब्धता अत्यंत आवश्यक आहे.  आरोग्यविषयक तक्रारी उद्भवल्यास विद्यार्थ्यांना तत्काळ प्राथमिक उपचार देता येणार आहेत. परिचारिकांमार्फत आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला, प्रथमोपचार देण्यात येणार असून, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यासही मदत होईल. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात आरोग्यदृष्ट्या सुरक्षित आणि सक्षम वातावरण निर्माण करणारा ठरणार आहे.

 अनुदानित आश्रमशाळांमध्ये ‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरती

 विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती प्रक्रियेसाठी आता ‘पवित्र पोर्टल’  या ऑनलाईन प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.  याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून सुधारित संच मान्यतेचे निकष जाहीर करण्यात आले आहेत. या  निर्णयामुळे अनुदानित आश्रमशाळांमध्ये होणारी शिक्षक भरती पारदर्शक, निकोप आणि गुणवत्ताधारित होणार आहे. यामुळे पात्रताधारक उमेदवारांना समान संधी उपलब्ध होणार आहे. ‘पवित्र पोर्टल’द्वारे निवडले जाणारे सर्व शिक्षक ‘शिक्षक अभियोग्यता चाचणी’ (TET) उत्तीर्ण असणार आहेत, यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत निश्चितच वाढ होणार आहे. या निर्णयामुळे शिक्षक भरती प्रक्रियेवरील विश्वासार्हता वाढून, विद्यार्थ्यांना अधिक प्रशिक्षित व पात्र शिक्षक लाभणार आहेत. राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याच्या दृष्टीने हा निर्णय दिशादर्शक ठरणार आहे.

 गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ‘राघोजी भांगरे गुणगौरव पुरस्कार

 इयत्ता १०वी व १२वीच्या परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या आदिवासी  विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘राघोजी भांगरे गुणगौरव पुरस्कार योजना’ राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, नामांकित शाळा, सैनिकी शाळा तसेच एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल शाळांमधील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या योजनेनुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतलेल्या परीक्षांमध्ये राज्यस्तरावर प्राविण्य मिळविणाऱ्या प्रत्येकी ५ मुले व ५ मुलींना, तसेच प्रत्येक ९ विभागीय शिक्षण मंडळातील प्रथम ३ मुले व ३ मुलींना खालीलप्रमाणे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तेच्या माध्यमातून पुढे जाण्याची प्रेरणा निर्माण होणार असून, शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

 वसतीगृह समन्वय समिती’ गठीत

वसतीगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह आरोग्य, सुविधा आणि प्रशासन यामधील सुसंवाद वाढवण्यासाठी ‘वसतीगृह समन्वय समिती’ स्थापन करण्यात आली आहे.

ही समिती वसतीगृहस्तरावर कार्यरत राहून विद्यार्थ्यांच्या समस्या तातडीने सोडविण्याचा प्रयत्न करेल. यामुळे विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रकल्प कार्यालय स्तरावरच मार्गी लागण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारी दूर व्हाव्यात, त्यांचे प्रश्न वसतीगृहस्तरावर व प्रकल्प कार्यालय स्तरावरच सुटावेत व विद्यार्थी आणि प्रशासनात समन्वय राहावा, वसतीगृहामध्ये दिल्या जाणाऱ्या सेवांचा दर्जा वाढावा हया सर्व बाबींसाठी वसतीगृह समन्वये समितीचा उपयोग होणार आहे.

‘संवाद चिमुकल्यांशी’ अभियानाद्वारे विद्यार्थ्यांशी थेट संवाद

 राज्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळा आणि वसतीगृहांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक जीवनातील अडचणी समजून घेण्यासाठी, तसेच त्यांच्याशी थेट संवाद साधून त्यांच्या विकासासाठी उपाययोजना करण्याच्या उद्देशाने “संवाद चिमुकल्यांशी” हे अभिनव अभियान राज्यभर ७ फेब्रुवारी २०२५ राबविण्यात आले. या उपक्रमाद्वारे आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची हमी, उपलब्ध सेवांची गुणवत्ता आणि आरोग्यविषयक सोयी यांचे मूल्यमापन करून त्यात सुधारणा करण्यावर भर देण्यात आला.

या उपक्रमाअंतर्गत राज्यातील प्रत्येक दुर्गम आश्रमशाळेत  वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांची उपस्थिती, उपलब्ध सुविधा, स्वयंपाकाची व्यवस्था, आर.ओ. पाणी प्रणाली, स्वच्छता व स्वयंपाकासाठी लागणाऱ्या साधनांची पाहणी करण्यात आली. यात आढळलेल्या त्रुटींवर तातडीने कार्यवाही करून सुधारणा करण्याचे आदेश मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिले. या संवादातून विद्यार्थ्यांच्या मनात शासनप्रणालीबाबत विश्वास व आपुलकी निर्माण झाली असून, त्यांना आत्मविश्वास आणि प्रेरणा मिळाल्याची सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवली जात आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page