Shreyash Wankhede:
राज्यातील बोगस शिक्षक पदभरती प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी व विदर्भातील शिक्षण विभागातील अधिकारी यांची रिक्त पदे पदोन्नतीने तात्काळ भरण्यात यावी, या दोन प्रमुख मागण्यांसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने विमाशि संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात विदर्भस्तरीय एक दिवसीय धरणे / निदर्शने आंदोलन करण्यात आले.
दि. २७ जून २०२५ रोजी शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्या कार्यालयासमोर आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात तर नागपूर शिक्षण उपसंचालक यांचे कार्यालयासमोर माजी आमदार तथा म.रा.मा.शि. महामंडळ मुंबईचे सरचिटणीस व्ही. यू. डायगव्हाणे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
यावेळी अमरावती येथे विमाशि संघाचे प्रांतीय अध्यक्ष अरविंद देशमुख, प्रांतीय उपाध्यक्ष विजय ठोकळ, जयदीप सोनखास्कर, विभागीय कार्यवाह बाळासाहेब गोटे, विज्युक्टाचे अध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे तर नागपूर येथे प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे, विभागीय कार्यवाह चंद्रशेखर रहांगडाले, कोषाध्यक्ष भूषण तल्हार, विज्युक्टाचे महासचिव डॉ. अशोक गव्हाणकर व विदर्भातील विमाशि संघाचे प्रांतीय, जिल्हा, महानगर, तालुका पदाधिकारी, विज्युक्टाचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने शिक्षकांची उपस्थिती होती.