श्रेयश वानखेडे: दिनांक:12/08/2025 रोजी मान. ना. श्री. दादाजी भुसे, मंत्री, शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य व मान. श्री. रणजीत सिंह देओल, प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग यांचे सोबत संघटनेचे पदाधिकारी व सर्व शिक्षण संचालक, सहसंचालक यांची पुढील विषयांवर सकारात्मक चर्चा झालेली आहे.
1. नागपूर विभागासह सर्व बोगस शालार्थ प्रकरणांची चौकशी दिनांक:07/08/ 2025 च्या शासन निर्णयाद्वारे गठीत केलेल्या विशेष चौकशी समितीकडे वर्ग करावी.
2. विना चौकशी कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियमबाह्य अटक करू नये.
3. शालार्थ प्रकरणी निलंबित झालेले सर्व अधिकारी यांना सेवेत पूर्णस्थापित करण्यात यावे.
4. अतिरिक्त कामांच्या ताणाबाबत कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त होणाऱ्या व्हि.सी. बाबत चर्चा झाली.
वरील सर्व मागण्यांबाबत मान. मंत्री महोदय व मान. प्रधान सचिव महोदय यांनी ठोस आश्वासन संघटना प्रतिनिधी यांचे सोबत दिनांक:12/08/ 2025 रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिलेले आहे. संघटनेच्या सर्व न्याय मागण्यांबाबत सकारात्मक विचार केला जाईल. संघटनेच्या मागण्यांचे निवेदनाबाबत पोलिस विभागाला शासन स्तरावरून कळविण्यात येणार आहे. कोणत्याही निरपराध अधिकारी व कर्मचारी यांच्यावर चुकीची कारवाई होणार नाही. अशा प्रकारचे आश्वासन मान. मंत्री महोदय व मान. प्रधान सचिव महोदय यांनी दिलेले आहे. त्यामुळे दिनांक:08/08/2025 पासून सुरू असलेले सध्याचे बेमुदत सामूहिक रजा आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात येत आहे.
यापुढे अशा प्रकारची विनाचौकशी नियमबाह्य पद्धतीने अटक झाल्यास स्थगित केलेले आंदोलन कोणतीही पूर्वसूचना न देता पुन्हा सुरू केले जाईल. त्यामुळे सर्व शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी व कर्मचारी यांनी बुधवार दिनांक:13/08/ 2025 पासून पूर्ववत कामावर रुजू व्हावे, असे आवाहन अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाच्या वतीने करण्यात येत आहे.
संघटनेचे हे ऐतिहासिक आंदोलन यशस्वी करण्यासाठी सहकार्य व मार्गदर्शन करणाऱ्या राजपत्रित अधिकारी महासंघ, अराजपत्रित अधिकारी कर्मचारी संघटना, विस्तार अधिकारी संघटना, केंद्रप्रमुख संघटना, शिक्षक- शिक्षकेतर संघटना, सर्व मान. लोकप्रतिनिधी, अशा विविध संघटनांचे सहकार्य व मार्गदर्शन तसेच मान. श्री. सच्चिंद्रप्रताप सिंह, आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य व वरिष्ठ अधिकारी मान्यवरांचे, सर्व पदाधिकारी व सन्माननीय सदस्यांचे तसेच प्रसार माध्यमांचे मनापासून खूप खूप धन्यवाद मानण्यात आले.