आम आदमी पक्षाने डॉ.आंबेडकर वॉर्डमधील समस्यांकडे नगरपालिकेचे लक्ष वेधले.
Jyotsna Wankhede: शहरातील डॉ. आंबेडकर वॉर्डमधील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे आम आदमी पक्षाने नगरपरिषदेचे लक्ष वेधले आहे. पक्षाने मुख्याधिकारी विशाल वाघ यांना निवेदन सादर करून या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या निवेदनात नालेसफाई व दुरुस्ती, खराब झालेले बोरवेल, विजेचे खांब आणि तुटलेल्या चेंबर्सच्या गंभीर समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. वॉर्डातील अनेक नाले जुने आणि तुटलेले असल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचते. यामुळे दुर्गंधी पसरत असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. डॉ. आंबेडकर भवनजवळचा बोरवेल खराब झाल्याने पाणी सतत वाया जात आहे. यामुळे रस्त्यावर चिखल आणि शेवाळ जमा झाले आहे, ज्यामुळे घसरून पडण्याचे अपघात वाढले आहेत. नागरिकांचे हात-पाय तुटल्याचीही माहिती समोर आली आहे. डॉ. आंबेडकर भवनच्या मागील रस्त्यांवरील विजेचे खांब जुने झाले असून, त्यातील दोन दिवे बंद आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी परिसरात अंधार असतो, ज्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. रस्त्याच्या कडेला आणि जयभीम आखाड्याजवळचे १० ते १२ चेंबर्स तुटले आहेत. गल्ली लहान असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. या सर्व गंभीर समस्यांवर तातडीने लक्ष देऊन कोणत्याही मोठ्या दुर्घटनेपूर्वी त्या सोडवाव्यात, अशी मागणी आपचे शहर सचिव ज्योती बाबरे यांनी केली आहे. स्थानिक रहिवाशांनी या समस्यांमुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. निवेदन देताना आपचे शहर उपाध्यक्ष अफजल अली, सचिव ज्योती बाबरे, प्रवक्ता आसिफ शेख, सह संघटन मंत्री सलमा सिद्दिकी, महिला उपाध्यक्षा मनिषा अकोले, आणि इतर कार्यकर्ते तसेच परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.