चंद्रपुरमध्ये ड्रग्ज माफियावर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई : १६० ग्रॅम एम.डी. (मेफेड्रॉन) ड्रग्ससह १६ लाखांचा माल जप्त
Jyotsna Wankhede : शहरातील ड्रग्ज माफियाविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत १६० ग्रॅम एम.डी. (मेफेड्रॉन) ड्रग्स पावडरसह सुमारे १६ लाख १२ हजार ५०० रुपये किमतीचा माल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपीला अटक करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरचे उपविभागीय पथक हे पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी गस्त घालत होते. दरम्यान, त्यांना गोपनीय माहिती मिळाली की दिपक कृष्णा वर्मा (वय २८) रा. संजयनगर, मुल रोड, चंद्रपूर आणि आशिष प्रकाश वाळके (वय ३०) , रा. मित्रनगर, चंद्रपूर हे दोघे पांढऱ्या रंगाच्या डिझायर कार क्रं. एमएच ४९ एएस २७०४ मधून एम.डी. ड्रग्स घेऊन फॉरेस्ट अकादमी परिसराकडे येत आहेत.
या माहिती आधारे पोलिसांनी मुल रोडवरील फॉरेस्ट अकादमी समोर सापळा रचला. काही वेळातच नमूद कार येताना दिसल्याने ती अडवून तपासणी करण्यात आली. त्यावेळी दिपक वर्मा याच्याकडून १६० ग्रॅम एम.डी. (मेफेड्रॉन) ड्रग्स पावडर व कार असा एकूण १६ लाख १२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरकडून सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक शममुग्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि दिपक काँक्रेडवार, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोउपनि सुनिल गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, सतिश अवथरे, रजनिकांत पुठ्ठावार, दिपक डोंगरे, इम्रान खान, पोअ. किशोर वाकाटे, पोशि. शशांक बदानवार, हिरालाल गुप्ता, अजित शेंडे यांनी केले.