Sunday, December 7, 2025
HomeLekhस्त्री सशक्तीकरणाचा " आगाज " : कादंबरीकार डॉ. श्याम मोहरकरांची "...
spot_img

स्त्री सशक्तीकरणाचा ” आगाज ” : कादंबरीकार डॉ. श्याम मोहरकरांची ” लालगुंजी “

स्त्री सशक्तीकरणाचा ” आगाज ” : कादंबरीकार डॉ. श्याम मोहरकरांची ” लालगुंजी ” 

प्रत्येक कादंबरी गद्यातील काल्पनिकच साहित्य असते असे नाही, बरेचदा कादंबरीतील अनुभव आणि कथानक हे वास्तविक घडलेल्या घटनांचे वास्तवच असू शकते.

वि. स.खांडेकरांची ‘ययाती’ , शिवाजी सावंत यांची ‘मृत्युंजय’ आणि आनंद यादवांची ‘झोंबी’ या गाजलेल्या कादंबऱ्यातील ययाती कादंबरी मनुष्याच्या चिरतरुण राहण्याच्या व भोगवादी प्रवृत्तीवर काल्पनिक प्रकाश टाकला असेल तरी मृत्युंजय मधील कर्ण काही प्रमाणात वास्तवातील पात्र आहे आणि झोंबी मधील आनंद रत्नाप्पा जकाते हे पूर्णपणे वास्तविक पात्र आहे.

याचप्रमाणे “लालगुंजी” ही कादंबरी त्यातील पात्र आणि घटनानुसार वास्तविकच असावी असे वाटते.

निमित्त होते विदर्भ साहित्य संघ नागपूर शाखा भद्रावतीच्या वतीने आयोजित चंद्रपूर जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे आणि डॉक्टर ज्ञानेश हटवार लिखित ग्रामगीतेतील क्रांतीदर्शीत्व ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याचे.

त्यानिमित्ताने घडून आलेली आदरणीय डॉ. श्याम मोहरकर सरांची दीर्घ भेट,साहित्यिक चर्चा आणि उलगडलेले त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू व अत्यंत आनंददायी गोष्ट म्हणजे सरांची नवनिर्मित साहित्यकृती “लालगुंजी” कादंबरी ची भेट.

प्रस्तुत कादंबरी वैनगंगेच्या कुशीत जन्मलेल्या वाढलेल्या आणि झाडीबोलीच्या मुशीत घडलेल्या सर्व आप्त आणि जिवलगांना समर्पित करून स्वतःसोबत इतरांचेही जीवन समृद्ध करणारे लेखक श्याम मोहरकर सर हे वेगळेच रसायन आहे.

ज्येष्ठ समीक्षक, कवी, संपादक  श्री दा. गो. काळे सर यांनी लालगुंजीच्या निमित्ताने प्रस्तावना लिहिताना,कादंबरी हे काळाला उसवणारी गोष्ट असते असे म्हटले आहे.

ते लालगुंजी या कादंबरीतून स्पष्टपणे दिसून येते.

मला वाटते मराठी वाङ्मयीन दृष्टीने आजच्या पार्श्वभूमीवर ‘दुर्गा’ भोवती फिरणारे विविध अंगी कंगोरे दर्शविणारी ” लालगुंजी “कादंबरी येणे हे अपरिहार्य आणि स्वागतार्हच आहे.

शहरी, ग्रामीण आणि झाडीपट्टीतील खेड्यापाड्यांच्या भौगोलिक, सामाजिक, राजकीय,शैक्षणिक व आर्थिक परिस्थितीचे समाजभान राखून या सर्व घटकांशी घातलेली सांगड म्हणजे ‘लालगुंजी’ ही रसिक वाचकांना गुंतवून ठेवते.

प्रस्तावना लिहिताना समीक्षक दा.गो. काळे सर यांनी ऐंशीच्या दशकातील ग्रामीण साहित्याच्या निर्माण झालेल्या स्वतंत्र प्रवाहात झोंबी या आत्मचरित्राचे लेखक डॉ.आनंद यादव आणि विदर्भातील साहित्यिक डॉ. सुभाष सावरकर व डॉ. नीलकंठ मेंढे या साहित्यिकांच्या पंगतीला डॉ. श्याम मोहरकर सरांना बसविले आहे हे आपल्या झाडीपट्टीतील साहित्यिकांसाठी भुषणावह आहे.

मलपृष्ठावरील ब्लर्ब च्या माध्यमातून पाठराखण करताना महाराष्ट्राचे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे सर यांनी डॉ. श्याम मोहरकर सरांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करताना,पाच पिढ्यांचा मध्य अक्ष सांभाळणारी म्हातारी स्त्री ला केंद्रस्थानी ठेवून मांडलेला लालगुंजी चा जीवनपट कादंबरीला वेगळा आयाम दिल्याचे स्पष्ट करून, आश्वासक कादंबरी मराठीला दिल्याबद्दल अभिनंदन केले आहे. यावरून प्रस्तुत कादंबरी साहित्याच्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणारी आहे हे रसिक वाचकांकडून लवकरच सर्वश्रुत होईल यात कोणतीही शंका नाही.

पुणे येथील चित्रकार श्रीकृष्ण ढोरे यांनी रेखाटलेले मुखपृष्ठ ज्यामध्ये पवनीची बेभान वाहणारी वैनगंगा नदी, दोन्ही काठाला जोडणारा स्प्रिंग चा भव्य आधुनिक पूल, या काठावरून दिसणारे त्या काठावरील मंदिर, गोपूर आणि किल्ल्याची भिंत व या काठावर बसलेली पाठमोरी दुर्गा “लालगुंजी” भोवरा मारून गिरक्या घेत वाहणाऱ्या नदीतील पाण्याकडे पहात स्वतःच्या दुःखाचा डोह निरखत बसली आहे हे मुखपृष्ठावरील चित्र ‘लालगुंजी’बद्दल बरेच काही सांगून जाते.

प्रस्तुत कादंबरी वयाच्या चाळीशीमध्ये अकाली झालेली विधवा काटक स्त्री आपले कुंकू पुसून अपत्यांसाठी हिरवे स्वप्न पाहणारी नायिका म्हणजेच पतीच्या मृत्यूने स्वयंभू झालेली दुर्गा या कथेची नायिका आहे.

बोलीभाषा व प्रमाण भाषेचा सुंदर मेळ घालून लेखकांनी वैनगंगा काठावरील किल्ला व टेकड्यांमध्ये वसलेले पवनी तालुक्यातील सिंदपुरी गाव, राजे राजवाडे यांच्या सुंदर बुरुजांचे बांधलेले घाट,सव्वाशे मंदिर, पवनीचा प्राचीन इतिहास दर्शविणारे अनेक सुंदर प्रेक्षणीय स्थळ वाचकाला नैसर्गिक सौंदर्यात गुंतवून ठेवतात.

ज्याप्रमाणे झाडीपट्टीतील नैसर्गिक सौंदर्य आपल्याला खुणावत असतं त्याचप्रमाणे बोलीभाषेचेही स्वतंत्र सौंदर्य आहे. जसे -नर्मदा पारबतीला म्हणाली,

” बाई मानसापेक्स्या पैसे मोलाचे रायतेत का वं ?” अना आजी दुर्गी ला म्हणाली,

” तू कायलं येतेस दुर्गे SS दिवसभर तपनीत बीना अन्नापान्यानं रायना सोपा नसं बरं SS जा घरी.”

” कन्या नं चून SS  खावा धमसून SS

राती खावा दार भात S  नं  बुळगा बुळगीची  कोड्डीच रात.”

यावर हजरजबाबी भागा म्हणाली,

“बाप्पा S तं मायजनाले बनवून काऊन नाई आणलीस आजे?”

हा असा झाडीबोलीतील संवाद मनाला सुखावून जातो.

“लालगुंजी”कादंबरीमध्ये अनेक ठिकाणी बोलीभाषेतील गमतीजमतीची रंगतदार केलेली पेरणी मनाला मोहून टाकते.

 गाव खेड्यातील शेतकरी कुटुंबाच्या कामाचे हुबेहूब वर्णन लेखकांनी केलेले आहे. ज्यामध्ये गायची वासरं, म्हशीचे रेडकू, वळू, रेडा यांच्या सानिध्यात दुर्गाला जाणवणारा घरच्या जनावरांचा प्रेमभाव, चाटणे, पाठ थोपटणे व कृतज्ञता भाव अत्यंत सुंदरतेने लेखकाने रेखाटलेला आहे.

आई नर्मदाच्या कष्टाने सुख-समृद्धी मध्ये जगताना शिवराम-पार्वतीच्या संसार वेलीवर उमललेलं रूपवान आणि गुणवान पहिलं फुल म्हणजे “दुर्गा”.

हसत बागडत आनंदाने जगणाऱ्या दुर्गाला सहाव्या वर्षी शाळेत पोगळे गुरुजींनी दाखल  करतानाचा प्रसंग लेखकाने एवढा जिवंत केलेला आहे की कादंबरी निरंतर वाचतच राहावं आणि वाचता वाचता आपण कधी कादंबरीचा भाग बनतो हेही कळत नाही.

म्हणूनच शाळेतील काशीराम बिल्वने गुरुजी विद्यार्थ्यांना म्हणतात,”वाचाल तर वाचाल ” आणि त्यांच्याच पावलावर पाय ठेवून दुर्गा शाळेतील कबड्डीत सर्वोत्तम खेळाडू म्हणून शाळेला पहिले बक्षीस मिळवून देते.

नसाळी मावशी म्हणजे मायाबाई जिचा दहा वर्षातच नवरा मरण पावला. आणि ती स्वयंपाकीन म्हणून काम करायची, तिला नस प्यायची एवढी सवय की सारा गाव तिला नसाळी मावशी म्हणून ओळखायचा. हे नसाळी मावशी आपलं स्वतंत्र अस्तित्व घेऊन ‘लालगुंजी’ मध्ये भेटत असते.

ही कादंबरी आपल्याला कथा सांगत आहे असा भास होतो नव्हे तर ती कथाच सांगत असते. गाव प्रदेशाचे जीवन दर्शन व्यक्तिरेखा आपल्याला जवळच्या वाटतात.

सोनबा चंदनशिवे पार्वताचे वडील व दुर्गाचे आजोबा.पार्वताच्या बहिणीची मोठी मुलगी कळबा काढताना साप जाऊन मेली.

चहा टपरी वरील ऋषी हा शिवराम चा मित्र नदीकाठच्या गावोगावच्या लोकांना रात्री घरी पोहोचवायचा अशा अनेक आठवणी नसाळी बुढ्ढी, ऋषी आणि देवाजी थाटे या त्रिकूटाबद्दल आहे  जे लोकांना नेहमी मदत करायचे‌.

राघोबा पाटलाचा नवथर सांड आणि दुर्गा यांच्या युद्धाचा प्रसंग, सांडापासून केलेली मुलांची सुटका, त्यातच दुर्गाचे मोठे होणे, शाळेतील वर्ग वाढणे आणि गावाची प्रगती  यांची सांगड लेखकाने बेमालूमपणे घातलेली आहे.

शाळा बुडविणारे गणेश, रव्या आणि मंंनस्या या त्रिकूटांचे शाळा बुडविण्याचे चित्रण व त्यांना शाळेत आणण्याची कला लेखक मोहरकर सरांनी भेदकपणे मांडली आहे.

हनम्याच्या लग्नाचे वर्णन आणि दुर्गाच्या लग्नाचे दंडोक परिपूर्ण रेखाटलेले आहे काही बायकांनी प्रासंगिक गाण्याचे सूर लावले होते.

वल्या वल्या मांडवात…

कचारीन आली …

नको व करू घाई…

नंदा माह्या आल्या नाई..

हिरवा चुडा ल्येली…

पार्वता पाटलीन…

एवढी शोभा केली…शिवराम पाटलांना… हळदी कुंकवान मंडप दिसे छान…

व दुर्गाच्या लग्नाची वरात निघताना गाण्यातूनच….

पाडाचा आंबा बाई, कावळा खाते….

 लाडाची दुर्गा बाई, सासरी जाते…

 यातून पवनी-कोंढा परिसरातील लोकसंस्कृती सांगून जाते.

नवरदेव नीलकंठ वीस वर्षांपूर्वी पूरबुडीमुळे येनोडा गावाचे पुनर्वसन कसे झाले ते सांगत असताना म्हणतो…

वगर वाहत येते अना येती नदीला भेटते, जसा काई नदी तोंडाचा चंबू करून वगराचा चुम्मा घेते. म्हणून या वगराचे नाव तोंड्या वगर ठेवला असे सांगताना लालगुंजी दुर्गा लाजून चुरचुर होते व दोघे हसू लागतात.

सुहागरात च्या दिवशी नीलकंठाने दुर्गाच्या बदामासारख्या टपोऱ्या डोळ्याचे केलेले वर्णन, काळ्याभोर बाहुल्या… भोवताल तपकीर रंगाचा बुबुळ अन् बाजूला पांढऱ्या ऐवजी फिक्‍या लाल रंगाचा स्वलेरा ss अहाहा !! अगदी लाल गुंजासारखा म्हणूनच दुर्गा म्हणजे “लालगुंजी” असे लेखकाने कादंबरीला शीर्षक दिले असावे व ते तंतोतंत शोभून दिसते.

कादंबरीला लालगुंजी हे शीर्षक देण्यामागचे दुसरे कारण म्हणजे अमेरिकेने दुष्काळात पोटातील आग विझवण्यासाठी भारताला दिलेली मिलोची लाल ज्वारी त्यापासून बनणारी लाल गुंजासारखी भाकरी खाल्ल्याने पोटात आग पडून भडका होत असे आणि त्यामुळे ग्रामीण भागात लोक त्याला लालगुंजी म्हणायचे हेही असू शकते.

आणि कादंबरीला लालगुंजी हे शीर्षक देण्यामागे तिसरे कारण म्हणजे भागा बाई पोटदुखीने बिमार असताना शेर-दिडशेर लालगुंजी लुगड्याच्या ओच्यात घेऊन भागा दुर्गासह मतीराम भक्ताच्या घरी आल्या व तेथील घडलेल्या प्रसंगातून दुर्गाने अंधश्रद्धा नष्ट केली म्हणूनही कदाचित लालगुंजी हे नाव कादंबरीला दिले असावे.

मात्र कादंबरीला दिलेले लालगुंजी हे नाव चपखलपणे बसलेले आहे, यात काही शंका नाही.

ही कादंबरी वाचताना बऱ्याच वेळा ती आपल्या मनाचा ठाव घेते. विषारी दारूने मृत्यूचे तांडव करीत घेतलेले तीन बळी बापूराव, सरजू आणि नीलकंठ.

नीलकंठ्याच्या मृत्यूच्या अखेरच्या घटका मोजताना केलेले वर्णन लेखक म्हणतो, अमावस्याच्या पूर्ण काळ्याभोर रात्रीला परजीवी चांदण्या प्रकाशमान करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत होत्या. किंवा नीलकंठला शेवटचा प्रकाश दाखविणारी कंदीलाची काच काळी पडली होती. हा नीलकंठचा जीव जातानाचा दाखविलेला प्रसंग शब्दातीत आहे यातून लेखकाचे शब्द सामर्थ्य किती जबरदस्त आहे हे दाखवून देते.

कौटुंबिक कलह, नवरा मेल्यावर होणारी स्त्रीची कुचंबना या आणि यासारखे अनेक घटना कादंबरीत वाचत असताना आपण स्वतःला विसरून जातो व कादंबरीचा भाग बनतो हिच लेखकाच्या लेखणीची खरी ताकद आहे‌.

लेखकाने रंगवलेली पात्र निरंतर मनात घर करून वावरत असतात जसे पत्ते खेळणारा दोन पायाने अपंग जगन, जनार्दन शाहीर, नागेश्वर, गीता, भागा आणि असे अनेक पात्र….

लेखकाने कौटुंबिक कलहाचे प्रसंग ही तेवढ्यात ताकदीने रंगविलेले आहे. दुर्गाच्या नवऱ्याच्या मरणाने झालेली जीवनाची वाताहात… सासूने तिला घराबाहेर काढले, मात्र वडिलांनी मदतीसाठी दिलेले पाचशे रुपये परत करून फक्त आशीर्वाद द्या असा स्वाभिमानी ताठपणा दुर्गा मध्ये दिसून येतो. यातून संस्कारातून झालेले खेड्यातील स्त्रीचे सुद्धा सशक्तिकरण दिसून येते.  भागाबाईने दुर्गाच्या संदर्भात बोलून नागेश्वरला भरलेला हाग्यादम कादंबरीतून प्रत्येकाने अवश्य वाचावा. दुष्काळात दुर्गा पहिल्याच दिवशी सव्वा वर्षाच्या कृष्णाला घेऊन रोजगार हमीच्या कामावर गेली होती या दोन तिची जिद्द दिसून येते.

नारी सशक्तिकरण हे कागदावरील घोषणांनी होत नाही तर ते दुर्गा सारख्या मुलीला लहानपणापासून सर्वांगीण विकास घडवून करावे लागते हे “लालगुंजी” कादंबरीतून दाखवून दिलेले आहे.

दुर्गा शिकलेली असल्यामुळे रेडिओ ची बातमी ऐकत असायची.

लेखकाने प्रस्तुत कादंबरी ही सर्वांगीण मुद्द्यांना धरून लिहिलेली आहे ज्यात भारत पाकिस्तानचे युद्ध, काश्मीरच्या प्रश्न, ऑपरेशन ब्लू स्टार, आनीबानी, माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या, रोजगार हमी योजना, राजीव गांधींचे पंतप्रधानपदी विराजमान होणे आणि नंतर त्यांची हत्या अशा अनेक घडामोडींसोबत कादंबरीतील पात्र आणि नायिका जोडले गेलेले आहेत.

अवकाशात बंद पडलेल्या स्कायलॅब उपग्रहाची परिपूर्ण माहिती आणि जगबुडीच्या कहाण्यांचे वर्णन लेखकाने फारच सुंदर केलेले आहे.

कादंबरीतील काही प्रसंग प्रेरक व न विसरणारे आहेत जसे कृष्णाला शाळेत घालून दुर्गा ने देशसेवेसाठी कसे तयार केले त्यामागील कष्ट, वांढराने परबाकाकी च्या पोरीला पाळण्यातून उचलून नेले व स्वतः जवळ झाडावर ठेवले तो थरारक प्रसंग, पुलावरील नरबळीच्या पूजेचे भीतीदायक चित्रण असे एक नाही तर अनेक प्रसंग सर्वांग सुंदर कादंबरी निर्माण होण्यास महत्त्वपूर्ण ठरतात. लेखकाने बैलपोळा ऐवजी ट्रॅक्टर पोळ्याचे केलेले भविष्य आज सत्यात उतरले आहे. यातून लेखक दूरदर्शी स्वभावाचे आहे हे त्यांच्या लेखनातून दिसून येते.

नसाळी बुड्डीच्या मरणाने आक्रोश करणारे माया जोडलेले लोक चेपाजी, दुर्गा , पार्वती आपल्या वाचक रसिकांचे मन हेलावून टाकतात.

शेवटी दुर्गाची वडील शिवरामचा मृत्यू मात्र तिच्या जिव्हारी लागतो आणि त्यानंतर राष्ट्रसंताचे भजन, तुकारामाचे अभंग अशा अध्यात्मामध्ये दुर्गा जीवन घालवते आणि कधी कधी कीर्तनकार बाई महाराज यांना सुद्धा गायीच्या दुधाच्या अध्यात्मातून अंधश्रद्धेतून बाहेर काढते.

दुसऱ्यांसाठी जगत आलेली परोपकारी दुर्गा आपला मुलगा कृष्णाच्या पत्नीचे सुनेचे डोहाळे जेवण करून मुलासोबत काश्मीरला जायला तयार होते पण मुलगा कृष्णा पत्नी आणि सासूसमोर काहीच बोलत नाही, मी दुसऱ्या वेळेस तुला न्यायला येईन असेही सांगत नाही, तेव्हा तिचे मन खट्टू होते व वैनगंगेच्या काठावरील दगडावर बसून वाहणाऱ्या पाण्याकडे निश्चलपणे पाहत असते. हृदयात उमळलेल्या भावकल्लोळांकडे अंतस्थ दृष्टीने पाहत ती आत्मकोषात शिरते आणि दगडावरून उठताना तिचा पाय लुगड्यात अडकून दुर्गा नदीच्या प्रवाहात पालथी पडते, ती पट्टीची पोहणारी असल्यामुळे तिला जगताही आलं असतं, मात्र “मी आता कोणासाठी जगू ?का, व कशासाठी जगू?” या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने ती आपल्या देहाचं निर्माल्य झालं आहे असे म्हणून स्वतःला गंगार्पण करते.

निष्प्राण देह वैनगंगेच्या प्रवाहात वाहत जुनोन्याच्या खडकाळीच्या पाटातील झाडाला अडकला होता. जिथून तिने पहिल्यांदा माहेरून सासरी जाताना गाव शिवेत प्रवेश केला होता. आजही तिथेच पोहोचली… पंचक्रोशीतील जुनोनावासीयांनी दुर्गाचा निष्प्राण देह पाहून फोडलेला हंबरडा आसमंत चिरून टाकत होता….

अशी सर्वांग सुंदर “लालगुंजी”वाचकांना शेवटी अस्वस्थ करून सोडते.  झाडीबोडीतील अस्सल रंगकर्मी, कवी, लेखक, साहित्यिक,कादंबरीकार बहुआयामी व्यक्तिमत्व प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर सर यांनी नितांत सुंदर “लालगुंजी” कादंबरी निर्माण करून वाचक रसिकांवर उपकारच केलेले आहे त्याबद्दल आदरणीय प्राचार्य डॉ .मोहरकर सरांचे अभिनंदन !!

आणि त्यांच्या “लालगुंजी”कादंबरीला भरभरून मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!!

डॉ. विठ्ठल चौथाले

    चामोर्शी

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page