Sunday, May 24, 2026
HomeLekhअरेरेरे… काय दिवस आलेत राव!
spot_img

अरेरेरे… काय दिवस आलेत राव!

अरेरेरे… काय दिवस आलेत राव!

ज्या हातांनी पोरांना केमिस्ट्रीचे फॉर्म्युले शिकवून डॉक्टर-इंजिनिअर बनवायचं स्वप्न दाखवलं, त्याच हातांत आज सीबीआयने कायद्याच्या बेड्या ठोकल्या. ज्या डोक्याने ‘गोल्ड मेडल’ जिंकलं, त्याच डोक्याने अख्ख्या शिक्षण व्यवस्थेचा बाजार मांडला. शिवराज मोटेगावकर! लातूर पॅटर्नचा स्वतःला ब्रँड म्हणवून घेणारा, १ हजार कोटींच्या साम्राज्यावर सुबत्ता भोगणारा हा माणूस आज मान खाली घालून पोलिसांच्या गाडीत बसलाय.

​पण राग या गोष्टीचा नाही की एक मोठा माणूस जेलमध्ये गेला; राग या गोष्टीचा आहे की, या असल्या धंदेवाईकांमुळे महाराष्ट्रातल्या लाखो गरीब, शेतकरी आणि कष्टकरी बापांच्या विश्वासाचा खून झालाय. गावाकडचा बाप जेव्हा आपली एक-दोन एकर जमीन गहाण ठेवतो, आईच्या गळ्यातलं मंगळसूत्र सोनाराकडं गहाण ठेवतो, तेव्हा कुठे या असल्या ‘लातूरच्या कारखान्यांची’ लाखो रुपयांची फी भरली जाते. पोराने डॉक्टर व्हावं, घराचं दारिद्र्य फिटावं म्हणून बाप तिथे उन्हातान्हात राबतोय आणि इकडे हे ‘गुरुजी’ नावाचे दलाल कोट्यवधी रुपयांचे बंगले बांधून, पेपर फुटीचे आणि घोटाळ्यांचे बाजार मांडून बसलेत!

​हा नुसता घोटाळा नाही, हा आमच्या पोरांच्या भविष्याचा मुडदा पाडणारा क्रूर खेळ आहे!

माणूस शिकला की शहाणा होतो, असं आमची म्हातारी माणसं सांगायची. पण इथं तर उलटाच कारभार झाला. शिवराज मोटेगावकर हा काय ऐरागेरा माणूस नव्हता. एम.एस्सी. केमिस्ट्रीमध्ये सुवर्णपदक (Gold Medalist) विजेता, NET, SET, GATE सारख्या देशातल्या सर्वोच्च आणि अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या परीक्षा पहिल्या फटक्यात उत्तीर्ण झालेला बुद्धीचा सम्राट! रसायनशास्त्राचा (Chemistry) असा शिक्षक, ज्याच्या एका शब्दावर हजारो पोरं लातूरला धाव घ्यायची. ‘आरसीसी’ (RCC) नावाचं एक मोठं साम्राज्य उभं केलं.

​पण विचार करा, ज्या बुद्धीचा वापर गरिबांच्या पोरांना वर आणण्यासाठी करायला पाहिजे होता, तीच बुद्धी या व्यवस्थेला वाळवीसारखी पोखरण्यासाठी कशी वापरली गेली?

​पुण्यातल्या पी. व्ही. कुलकर्णी चौकशीदरम्यान जेव्हा धागेदोरे हाती लागले, तेव्हा या ‘माऊलीचा’ खरा चेहरा समोर आला. सीबीआयच्या (CBI) २८ जणांच्या पथकाने जेव्हा लातूरच्या त्या आलिशान साम्राज्यावर छापा टाकला, तेव्हा ८ ते १० तास या महाशयांची घाम सुटेपर्यंत चौकशी झाली. अखेर, पापाचा घडा भरला आणि सीबीआयने मुसक्या आवळून गाडीत कोंबलं.

​अरे, लाज वाटायला पाहिजे! ज्या हातांनी सरस्वतीची पूजा करायची, पोरांना ज्ञान द्यायचं, त्याच हातांनी लक्ष्मीच्या हापापलेपणासाठी थेट पेपर फुटीच्या आणि सेटिंगच्या काळ्या बाजारात उडी घेतली? ज्ञान देणारा गुरुच जर व्यवस्थेला काळिमा फासायला लागला, तर मग या समाजाने विश्वास तरी कोणावर ठेवायचा?

लातूर पॅटर्न… एक काळ असा होता जेव्हा या नावाचा दरारा होता. राज्यातली पोरं तिथे उन्हातान्हात, साध्या खोलीत राहून, वाटी-भातावर दिवस काढून अभ्यास करायची आणि मेरिटमध्ये यायची. पण या मोटगावकरांसारख्या व्यापाऱ्यांनी त्या पवित्र ‘लातूर पॅटर्न’चा नुसता धंदा करून टाकला.

​फीच्या नावाखाली लूट: एका एका पोराची फी लाख-लाख, दोन-दोन लाख रुपये! जर फी भरायला एक दिवस उशीर झाला, तर पोराला क्लासच्या बाहेर काढणारे हे लोक.

​हजार कोटींचं साम्राज्य: एका शिक्षकाकडे १ हजार कोटींची संपत्ती येते कुठून? एवढे मोठे बंगले, महागड्या गाड्या, जमिनी… हा सगळा पैसा पोरांच्या आणि त्यांच्या पालकांच्या रक्ताचा आहे.

​शॉर्टकटचा धंदा: जेव्हा क्लास चालवूनही पोट भरत नाही, तेव्हा मग पेपर सेट करणाऱ्या यंत्रणेला हाताशी धरायचं, पैशाच्या जोरावर पेपर फोडायचे, आणि आपल्या क्लासची पोरं कशी टॉप येतात याचं मार्केटींग करायचं!

 कसला पराक्रम? ही कसली बुद्धिमत्ता? हा तर सरळ-सरळ दरोडा आहे. तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या त्या गरिबाच्या पोराचा हक्क हिरावून घेतला, जो रात्र-रात्रभर कंदील लावून किंवा स्ट्रीट लाईटखाली अभ्यास करत होता. पैशाच्या जोरावर श्रीमंतांची ढब्बू पोरं डॉक्टर होणार आणि लायकी असूनही गरिबाचं पोरगं शेतात राबणार, ही कसली व्यवस्था तुम्ही आणू पाहत आहात?

गावाकडच्या एका साध्या बापाची व्यथा जरा डोळे उघडून बघा. उन्हाळ्यात अंगाची लाही-लाही होत असताना, पायात चप्पल नसताना तो शेतात नांगर धरतो. कशासाठी? तर लातूरला, पुण्यात शिकणाऱ्या आपल्या पोराला पैशाची कमी पडू नये म्हणून. महिना संपायच्या आत पोराच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी हा बाप सावकाराचे पाय धरतो. आणि जेव्हा पोराचा रिझल्ट येतो, तेव्हा कळतं की परीक्षाच रद्द झाली किंवा पेपर फुटला!

​त्या बापाच्या काळजावर काय बेतत असेल, याचा विचार कधी केला का रे तुम्ही, पैशाचे पुतळे झालेल्यांनो?

​मोटेगावकर सारखे लोक जेव्हा अटक होतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा एक टक्काही भाव नसतो. कारण त्यांना माहीत असतं, “पैसा फेको, तमाशा देखो.” आज अटक झाली, उद्या जामीन होईल, पुन्हा महागड्या गाडीत फिरतील. पण ज्या पोरांचे वय निघून गेलं, ज्या पालकांचं आयुष्यभराचं भांडवल संपलं, त्यांचं काय? त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली, त्याला जबाबदार कोण?

शिवराज मोटेगावकर तर फक्त एक हिमनगाचं टोक आहे. या शिक्षण व्यवस्थेच्या नावाखाली अख्खा बाजार सडलाय. कोचिंग क्लासेसचे मालक आता शिक्षक राहिले नाहीत, ते माफिया झालेत.

​मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांशी सेटिंग,

​परीक्षा घेणाऱ्या बोर्डाच्या माणसांना लाच,

​आणि राजकीय नेत्यांचे वरदहस्त!

​या तिन्हींच्या जोरावर हा काळा धंदा राजरोसपणे सुरू आहे. जोपर्यंत या एज्युकेशन माफियांच्या मुळावर घाव घातला जात नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातल्या कोणत्याही परीक्षेची पवित्रता शिल्लक राहणार नाही. आज NEET असेल, उद्या SET-NET असेल, परवा स्पर्धा परीक्षा असतील… प्रत्येक ठिकाणी हेच दलाल बसलेले आहेत.

​माझा सवाल सरकारला आहे, तपास यंत्रणांना आहे आणि या समाजातल्या प्रत्येक बापाला आहे… आम्ही कधीपर्यंत हे सहन करणार?

​सरकारला सवाल: हे असले हजार कोटींचे मालक जेव्हा शिक्षण व्यवस्थेला बाजारात विकतात, तेव्हा तुमची गुप्तहेर यंत्रणा काय झोपा काढत असते का? पी. व्ही. कुलकर्णीची चौकशी झाली नसती, तर हा मोटगावकरांचा काळा धंदा कधी समोर आलाच नसता का?

अजून किती दिवस या असल्या मोठ्या ब्रँडच्या नावाखाली आपल्या कष्टाचा पैसा यांच्या घशात घालणार आहात? जो शिक्षक स्वतः गुन्हेगार आहे, तो तुमच्या पोराला काय संस्कार देणार आणि काय डॉक्टर बनवणार?

​ज्ञान देणाऱ्या हातांनी जर व्यवस्थेलाच काळिमा फासला, तर समाजाने विश्वास कोणावर ठेवायचा? हा प्रश्न आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात विचारला गेला पाहिजे.

शिवराज मोटेगावकर, तुझी जी काय लायकी होती, ती कायद्याने आज दाखवून दिलीय. सोन्याचं पदक जिंकणारं तुझं ते डोकं जर पोरांच्या आयुष्याशी खेळायला लागलं, तर त्या सुवर्णपदकाची किंमत कवडीमोलाचीही उरत नाही.

​सीबीआयने या प्रकरणाचा असा तपास केला पाहिजे की, याच्या पाठीमागे जे कोणी बडे मासे, राजकारणी किंवा अधिकारी असतील, त्या सगळ्यांना खेचून बाहेर काढलं पाहिजे. या गुन्ह्याला माफी नाही. हा गुन्हा देशाच्या भविष्याशी, तरुणाईच्या रक्ताशी खेळणारा आहे.

आता तरी महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेचे शुद्धीकरण होणार का? की पुन्हा काही दिवसांनी नवीन मोटेगावकर जन्माला येणार? जनता बघतेय, आणि जनतेचा हा राग आता शांत बसणार नाही! तुडवून टाका अशा शिक्षण माफियांना, जे आमच्या पोरांच्या स्वप्नांची राख करत आहेत!

*गंगाधर गडदे*

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page