“माझा विद्यार्थी चुकीचे काही करू शकत नाही, हा माझा विश्वास आहे आणि जर त्याने काही चुकीचे केले असेल तर तो माझा पराभव आहे.” —स्व.श्री.सुदाम चव्हाण सर

अनेक शिक्षकांनी माझ्यावर प्रेम करीत माझे कान पकडून मार्गदर्शन केले होते. या मार्गदर्शनातूनच मला जगण्याचं बळ मिळत होतं. अनेकांच्या मार्गदर्शनातून मी घडलो असलो तरी या सर्वांच्या वरचे स्थान मी स्व.श्री. सुदाम चव्हाण सरांना देतो. कारण त्यांनी मला आयुष्यभर मार्गदर्शनच केले नाही तर ज्यावेळी मी शाळा सोडली होती, त्यावेळी अत्यंत प्रेमाने बोट धरून पुन्हा शाळेची वाट दाखवली होती. त्यामुळे “गुरु” म्हणून त्यांचे स्थान सर्वात वरचे आहे, असे मला वाटते. ती एकदाची वाट चुकली असती तर त्यानंतर मिळालेल्या असंख्य गुरूंच्या संपर्कातच मी आलो नसतो. माझ्यासाठी कोणी काय-काय केले याचा हिशेब मांडता येणार नाही. मांडला तर एकच उत्तर मिळत राहील, आज मी जसा आहे तसा त्यांच्यामुळेच निर्माण झालो.
आयुष्यात बसलेल्या ठेचा हे मैलाचे दगड होते. अनेक चांगले-वाईट प्रसंग आलेत. या प्रसंगांना आव्हान समजण्याची ताकद माझ्यामध्ये निर्माण केली. ही ताकद मला मिळाली नसती तर आयुष्याचा प्रवास थांबला तरी असता किंवा निरस झाला असता. अनेकांनी नको ती शब्द वापरून मला हिणवण्याचाही प्रयत्न केला होता. परंतु, वस्तीगृहातील भाकरीच्या तुकड्यांनी माझ्या प्रचंड ऊर्जा निर्माण केली होती. ती आजही कायम असल्याचे जाणवते. परंतु हे सर्व शाळाबाह्य विद्यार्थी झाल्यानंतर पुन्हा शाळेत आलो त्यामुळेच वाट्याला आल्याची जाणीव मला वारंवार करून देते.
“माझा विद्यार्थी चुकीचे काही करू शकत नाही, हा माझा विश्वास आहे आणि जर त्याने काही चुकीचे केले असेल तर तो माझा पराभव आहे.” असा विश्वास आपल्या विद्यार्थ्यांवर असणारा शिक्षक माझ्या आयुष्यात मला मिळाला हे माझे परम भाग्य आहे.
माझे बोट धरून पुन्हा शाळेत आणणारे स्व.श्री.सुदाम चव्हाण सर 9 जानेवारी, 2021 रोजी इहलोक सोडून गेले. आज त्याला पाच वर्षे होत आहेत. ते आज नसले तरी अनेक प्रसंगी त्यांच्या पाऊल खुणा जाणवतात. त्यात त्यांचे अस्तित्वही जाणवते. सर्व शक्तिमान परमेश्वर त्यांना चिरशांती देवो अशी त्यांच्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने प्रार्थना.
राम पवार
अमरावती
भ्रमणध्वनी : 9284196496






