Saturday, April 18, 2026
HomeChandrapurआ. सुधीर मुनगंटीवार यांची चंद्रपूर रिंग रोडसाठी सभागृहात ठोस मागणी; प्रकल्पासाठी सकारात्मक...
spot_img

आ. सुधीर मुनगंटीवार यांची चंद्रपूर रिंग रोडसाठी सभागृहात ठोस मागणी; प्रकल्पासाठी सकारात्मक भूमिका, लवकर निर्णयाचे संकेत

आ. सुधीर मुनगंटीवार यांची चंद्रपूर रिंग रोडसाठी सभागृहात ठोस मागणी; प्रकल्पासाठी सकारात्मक भूमिका, लवकर निर्णयाचे संकेत

आ. मुनगंटीवार यांनी शहरातील वाढती वाहतूक, अपघातांची भीषणता आणि औद्योगिक वाहतुकीमुळे रिंग रोडची गरज केली अधोरेखित

लवकरात लवकर बैठक घेऊन प्रकल्प मार्गी लावण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सभागृहात आश्वासन

Jyotsna Wankhede: राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर शहरातील वाढती वाहतूक, अपघातांची वाढती संख्या आणि औद्योगिक वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन चंद्रपूरसाठी स्वतंत्र रिंग रोड उभारण्याची ठोस मागणी विधानसभेत केली. सभागृहातील अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून आ. मुनगंटीवार यांनी या रिंग रोडची गरज अधोरेखित केली. सार्वजनिक बांधकाम विभाग या प्रकल्पाबाबत सकारात्मक असून लवकरच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन राज्य व केंद्र सरकारच्या समन्वयातून हा प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.

चंद्रपूरची लोकसंख्या सुमारे ४.७९ लाख असून साक्षरता दर ८९.४५ टक्के आहे. जिल्ह्यातील औष्णिक विद्युत प्रकल्प, सिमेंट उद्योग, कोळसा खाणी आणि मोठ्या प्रमाणातील मालवाहतूक यामुळे शहरातून मोठ्या प्रमाणावर जड वाहनांची वाहतूक होते. २०२४-२५ मध्ये जवळपास ९०० अपघातांमध्ये ४३० नागरिकांचा मृत्यू झाला असून सुमारे ८०० जण जखमी झाले आहेत. चालू वर्षातही अपघातांची संख्या वाढत असल्याने वाहतूक व्यवस्थापनासाठी रिंग रोड अत्यावश्यक असल्याचे आ.मुनगंटीवार यांनी सांगितले.

आ.सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, चंद्रपूर हे औद्योगिकदृष्ट्या वेगाने विकसित होणारे शहर असून जिल्ह्यातील औष्णिक विद्युत प्रकल्प, सिमेंट उद्योग आणि कोळसा खाणींमुळे मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक शहरातून होत असते. त्यामुळे वाहतुकीचा ताण वाढून अपघातांची संख्या चिंताजनकरीत्या वाढत आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करून नागरिकांना सुरक्षित व सुकर प्रवासाची सुविधा मिळावी, तसेच औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळावी यासाठी नियोजनबद्ध रिंग रोड अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. हा रिंग रोड आधुनिक, हरित आणि स्मार्ट पद्धतीने विकसित करून शहराबाहेरील वाहतूक वळवली तर चंद्रपूरच्या भविष्यातील विकासाला नवी दिशा मिळेल, असेही त्यांनी सभागृहात स्पष्ट केले.

आ. मुनगंटीवार यांनी सांगितले की नागपूर-चंद्रपूर तसेच बल्लारपूर-राजुरा-तेलंगणा मार्गावरील वाहतूक शहरातून जात असल्यामुळे कोंडी वाढत आहे. त्यामुळे चेकबोर्डा-मोरवा-बाबूपेठ-जुनोना या मार्गावर चार ते सहा पदरी रिंग रोड विकसित करावा, हा रिंग रोड स्मार्ट आणि ग्रीन संकल्पनेवर आधारित असावा, सौर उर्जेचा वापर व्हावा अशी सूचना त्यांनी केली.

या प्रकल्पासाठी महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून काम हाती घेऊन तीन महिन्यांत डीपीआर तयार करावा, स्वतंत्र कार्यकारी अभियंता नेमावा तसेच प्रकल्पाबाबत मुंबईत लवकरच बैठक घेण्याची मागणी केली. ‘रस्ते केवळ अंतर कमी करत नाहीत, ते विकासाची गाथा लिहितात. चंद्रपूरचा रिंग रोड हा जिल्ह्याच्या भविष्यातील प्रगतीचा मार्ग ठरेल,’ असेही आ . मुनगंटीवार यांनी नमूद केले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page