ज्ञानेश्वर माऊलीच्या गजराने दुमदुमली सेलू नगरी.

ज्योत्स्ना वानखेडे: सेलू शहरातील सातोना रस्त्यावरील मयुरी पार्क परिसरातील अलंकापुरी नगरीत 12 ते 19 मार्च कालावधीत संपन्न होणाऱ्या फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्या निमित्त ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरा पासून दि. 11 बुधवार रोजी भव्य ग्रंथ दिंडी काढण्यात आली. ग्रंथदिंडीतील ज्ञानेश्वर माऊलीच्या गजराने शहर दुमदुमून गेले होते. वातावरण भक्तीमय झाले. ग्रंथदिंडीत माऊलीचा रथ, तुकोबारायाचे अश्व, 750 वारकरी पताका, फेटेवाले नागरिक, तुळशीधारी महिला, वृक्षधारी, कलशधारी महिला, टाळकरी, विणेकरी, ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वर, ज्ञानदेव नावाच्या व्यक्ती, नूतन कन्या प्रशाला, श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयातील विद्यार्थ्यांचे लेझीम पथक, यशवंत विद्यालय, नूतन प्राथमिक, शारदा विद्यालय, कस्तुरबा गांधी विद्यालय शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. परभणी, जालना, बीड, वाशिम,नांदेड, पुणे व आसपासच्या जिल्ह्यातील दहा हजाराहून अधिक भावीक ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते. ग्रंथदिंडीचा समारोप सामूहिक पसायदानाने झाला. यावेळी ह. भ. प. पंडित महाराज ढाके, अच्युत महाराज दस्तापुरकर, कृष्णा महाराज रासवे, 1008 मनीषा नंद महाराज पुरी, शिवाजी महाराज खवणे, शंतनु पाठक आदी उपस्थित होते.
ग्रंथ दिंडीवर जागोजागी पुष्पवृष्टी.
ग्रंथ दिंडी मार्गावर श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिर ते अलंकापुरी नगरी पारायण स्थळा पर्यंत नगरपालिकेच्या वतीने सडा रांगोळी केले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला रांगोळी रेखाटली होती. तसेच चौका चौकात सुरेख रांगोळी काढली होती. ग्रंथ दिंडीवर जागोजागी पुष्पवृष्टी केली जात होती. ग्रंथदिंडीत सहभागी वारकऱ्यां ना फराळ, केळी, पाणी, झूणका भाकरी, शरबताचे वाटप करण्यात आले. सोपारा, फुलवाडी वस्ती, ब्राह्मणवाडी, आष्टी, हिस्सी,मंठा, माव पाटोदा पाथरी, नरसिंह नागनाथ संस्थान बोरगव्हाण, मानवत या गावांनी विशेष सहकार्य केले.