ज्योत्स्ना वानखेडे:
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय, दि. २३ ऑगस्ट २०२४ नुसार वर्षभर चालणारे बीएलओ हे काम शैक्षणिक नसून अशैक्षणिक काम आहे. परंतु, पंचायत समिती सावनेर (जिल्हा नागपूर) अंतर्गत २९० शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून कामे न स्वीकारल्यामुळे सदर २९० शिक्षकांना गटशिक्षणाधिकारी सावनेर मार्फत सामूहिकरीत्या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. त्यांच्यावर एफआयआर नोंदविण्यात येणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी सांगितले आहे. हा प्रकार संपूर्ण विदर्भात सुरु आहे. हा एकप्रकारे शिक्षकांना वेठीस धरण्याचा प्रकार आहे.
चालू अधिवेशनात शिक्षण मंत्री यांनी कोणत्याही शिक्षकांवर कारवाई करण्यात येणार नसल्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे सदर शिक्षकांवर कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये, याबाबत संबंधितांना निर्देश तात्काळ देण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे मा. शिक्षण मंत्री, मा. राज्यमंत्री, मा. प्रधान सचिव व सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडे केली आहे.
सोबतच महसूल विभागातर्फे ही कारवाई करण्यात येत असल्याने मा. महसूल मंत्री यांची भेट घेऊन यावर सविस्तर चर्चा करून मागणी करण्यात येणार असल्याचे आमदार सुधाकर अडबाले यांनी सांगितले.