अखेर राहुल गायकवाड यांच्या समोर शासन नमले दुसऱ्याच दिवशी अन्नत्याग आंदोलन समाप्त
ज्योत्स्ना वानखेडे:
महाराष्ट्र युवा पत्रकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल गायकवाड यांनी शहरातील बेकायदेशीर अतिक्रमण , सरकारी जमिनीच्या कथित फसव्या खरेदी-विक्रीची चौकशी आणि पत्रकारांच्या सुरक्षेसंबंधित गंभीर मुद्द्यांच्या मागण्यांसाठी सुरू केलेले अनिश्चितकालीन अन्नत्याग आंदोलन दुसऱ्या दिवशी शासनाच्या आश्वासना नंतर समाप्त करण्यात आले.
शहरातील मुख्य मार्गावर झालेल्या अतिक्रमणामुळे दिवसागणिक अपघाताच्या संख्येत वाढ होत असल्याने तात्काळ हे अतिक्रमण हटविण्यात यावे , भालेराव शाळेच्या आवारातील ३१ बट्टे या सरकारी भूखंडाची व विसापूर परिसरातील ६९ बट्टे या सरकारी भूखंडांच्या कथित फसव्या खरेदी-विक्रीची सीआयडी चौकशी या मागण्यांना घेऊन राहुल गायकवाड यांनी अन्नत्याग आंदोलन पुकारले होते. याव्यतिरिक्त, पत्रकाराला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या लाकूड व्यापाऱ्याच्या प्रकरणात महाराष्ट्र पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याचीही मागणी त्यांनी केली होती . या सर्व मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत आपला उपवास सुरूच राहील, असे गायकवाड यांचे म्हणणे होते. अखेर आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी प्रशासनाला नमते घ्यावे लागले असून येत्या आठवडाभरात शहरातील अनधिकृत अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात येईल तसेच भूखंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात येणार असल्याचे तसेच पत्रकारांवरील हल्ल्या संदर्भात महाराष्ट्र पत्रकार सुरक्षा कायद्या अंतर्गत कार्यवाही करण्यात यावी याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे पोलीसां तर्फे सांगण्यात आल्या नंतर राहुल गायकवाड यांनी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन समाप्त केले आहे.
उपोषणाला स्थगित करण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी म्हणून न.प.चे उपमुख्याधिकारी तथा सहाय्यक आयुक्त रवींद्र भंडारवार , पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे, डॉ.काशिनाथ सिंह, वरिष्ठ राजकीय नेते राजू झोडे, पत्रकार रामू मेदरवार , रमेश निषाद, प्रशांत वैरागडे,प्रमोद गहलोत, शंकर महाकाली आदींच्या उपस्थितीत राहुल गायकवाड यांना निंबू पाणी पाजून अन्नत्याग आंदोलन समाप्त करण्यात आले.