वर्धा नदीतील आत्महत्येच्या घटनेची गंभीर दखल; आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्देशांनंतर शोधमोहीम सुरू
आ. मुनगंटीवार यांच्या निर्देशांनंतर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून तात्काळ शोध व बचाव पथक
मृतदेह शोधण्यासाठी वर्धा नदी परिसरात व्यापक शोधकार्य सुरू

Jyotsna Wankhede: बल्लारपूर तालुक्यातील कळमना वॉर्ड क्रमांक १ येथील रहिवासी मोरेश्वर बाबुराव सोनवणे (वय ३७) यांनी २७ मार्च २०२६ रोजी सकाळी वर्धा नदीत आत्महत्या केल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी तात्काळ प्रशासनाला निर्देश दिले आहेत. आ. मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून जिल्हा स्तरावरील शोध व बचाव पथक घटनास्थळी पाठविण्यात आले असून मृतदेह शोधण्यासाठी व्यापक शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
माहितीनुसार, मोरेश्वर सोनवणे हे मजुरी करून उदरनिर्वाह चालवत होते आणि त्यांच्या पश्चात आई-वडील असा परिवार आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेनंतर पोलिसांकडून शोधकार्य सुरू होते, मात्र मृतदेह अद्याप मिळालेला नव्हता.
या घटनेची माहिती मिळताच आ. सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने दखल घेत जिल्हाधिकारी यांना जिल्हा स्तरावरील विशेष शोध व बचाव पथक पाठविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पथक घटनास्थळी पोहोचले असून वर्धा नदी परिसरात सखोल शोधकार्य सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाकडून या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.








