Sunday, May 31, 2026
HomeProjectअमृत २.० अंतर्गत पोंभुर्णा शहराला ४०.८४ कोटी रु. किंमतीच्या पाणीपुरवठा प्रकल्पाला मंजुरी
spot_img

अमृत २.० अंतर्गत पोंभुर्णा शहराला ४०.८४ कोटी रु. किंमतीच्या पाणीपुरवठा प्रकल्पाला मंजुरी

अमृत २.० अंतर्गत पोंभुर्णा शहराला ४०.८४ कोटी रु. किंमतीच्या पाणीपुरवठा प्रकल्पाला मंजुरी

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश

 

Jyotsna Wankhede: केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियानांतर्गत पोंभुर्णा नगरपंचायतीच्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा प्रकल्पास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. तब्बल रु. ४०.८४ कोटी खर्चाच्या या पाणीपुरवठा प्रकल्पामुळे पोंभुर्णा शहरातील नागरिकांच्या दीर्घकालीन पाणी समस्येवर प्रभावी तोडगा निघणार असून, शहराच्या पायाभूत विकासाला नवी चालना मिळणार आहे.

या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी माजी मंत्री व आमदार आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने राज्य शासनाशी पत्रव्यवहार करत प्रभावी पाठपुरावा केला. त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच हा प्रकल्प मंजूर होऊ शकला आहे. स्थानिक पातळीवरील गरजा ओळखून त्या शासनदरबारी प्रभावीपणे मांडण्याच्या त्यांच्या कार्यशैलीचा हा आणखी एक यशस्वी परिणाम मानला जात आहे.

नगरविकास विभागाने दि. ३० मार्च २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला असून, या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून ५०% (रु. २०.४२ कोटी), राज्य शासनाकडून ४५% (रु. १८.३७८ कोटी) आणि नगरपंचायतीकडून ५% (रु. २.०४२ कोटी) निधी उपलब्ध होणार आहे. या निधीच्या सुयोग्य वापरातून पोंभुर्णा शहरात आधुनिक, दीर्घकालीन आणि शाश्वत पाणीपुरवठा व्यवस्था उभारली जाणार आहे.
या प्रकल्पामध्ये पाणी उचल यंत्रणा (Intake Well), जलशुद्धीकरण प्रकल्प (WTP), साठवण टाक्या (ESR), विस्तृत वितरण व्यवस्था, उच्च क्षमतेची पाईपलाईन, सौर ऊर्जा प्रकल्प तसेच कामांदरम्यान बाधित होणाऱ्या रस्त्यांचे पुनर्स्थापन यांसारख्या विविध मूलभूत सुविधांचा समावेश आहे. यामुळे केवळ पाणीपुरवठाच नव्हे तर शहराच्या एकूण पायाभूत सुविधांमध्येही दर्जात्मक सुधारणा होणार आहे. हा प्रकल्प १८ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन असून, पूर्णत्वानंतर नागरिकांना नियमित, स्वच्छ व पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे.

“पोंभुर्णा शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही आमची प्राथमिकता आहे. पाणी ही जीवनावश्यक गरज असून, या प्रकल्पामुळे शहराच्या विकासाला गती मिळेल आणि नागरिकांचे जीवनमान उंचावेल. हा प्रकल्प केवळ पाणीपुरवठा योजना नसून पोंभुर्णा शहराच्या भविष्यातील प्रगतीचा मजबूत पाया आहे.” असे मत या संदर्भात बोलताना आ सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे.
यापूर्वीही आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून पोंभुर्णा शहरात नगरपंचायत इमारतीचे बांधकाम, राजराजेश्वर मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण, खुल्या नाट्यगृहाचे बांधकाम, मटण मार्केट, सिमेंट रस्ते, आठवडी बाजार, शासकीय विश्रामगृह, तालुका क्रीडा संकुल, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, अभ्यासिका, महात्मा ज्योतिबा फुले सभागृह तसेच क्रांतीवीर बाबुराव शेडमाके सभागृह यांसारखी अनेक विकासकामे पूर्णत्वास आली आहेत. या सर्व कामांमुळे पोंभुर्णा शहराच्या नागरी सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे.
नवीन पाणीपुरवठा प्रकल्पाच्या मंजुरीमुळे पोंभुर्णा शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार असून, नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील मूलभूत अडचणी दूर होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून दीर्घकालीन पाणीपुरवठ्याची सक्षम व्यवस्था निर्माण होणार असल्याने हा निर्णय पोंभुर्णा शहरासाठी ऐतिहासिक ठरणार आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page