Thursday, April 16, 2026
Homeबल्लारपूरआ.सुधीर मुनगंटीवार यांचा बल्लारपूर येथील एसएनडीटी उपकेंद्राला ‘मॉडेल कॅम्पस’ बनविण्याचा निर्धार
spot_img

आ.सुधीर मुनगंटीवार यांचा बल्लारपूर येथील एसएनडीटी उपकेंद्राला ‘मॉडेल कॅम्पस’ बनविण्याचा निर्धार

आ.सुधीर मुनगंटीवार यांचा बल्लारपूर येथील एसएनडीटी उपकेंद्राला ‘मॉडेल कॅम्पस’ बनविण्याचा निर्धार

आ.मुनगंटीवार यांनी जुलैपर्यंत कामे पूर्ण करण्याचे दिले निर्देश

ऑक्सफर्डसारखा आधुनिक कॅम्पस; आ. मुनगंटीवार यांचा संकल्प

क्रीडा, पायाभूत सुविधा व आधुनिक सुविधांसाठी व्यापक आराखडा


Jyotsna Wankhede : राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी विसापूर (बल्लारपूर) येथील एसएनडीटी विद्यापीठाच्या उपकेंद्रातील सुरू असलेल्या विविध बांधकामांचा आढावा घेत, संपूर्ण परिसर ‘मॉडेल कॅम्पस’ म्हणून विकसित करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. सर्व कामे वेळेत आणि उच्च दर्जात पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना देत, विद्यार्थिनींसाठी सुरक्षित, आधुनिक व सर्वसमावेशक सुविधा निर्माण करण्यावर त्यांनी आढावा बैठकीत विशेष भर दिला.

यावेळी,कुलगुरू श्रीमती उज्ज्वला चक्रदेव व कुलसचिव नांदावडेकर हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संभाजी माने, अधीक्षक अभियंता सोनाली चव्हाण, एसएनडीटीचे संचालक श्री. इंगोले, उपकुलसचिव बाळू राठोड, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, उपअभियंता संजोग मेंढे तसेच अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

आ. मुनगंटीवार यांनी एसएनडीटी विद्यापीठाच्या उपकेंद्रातील विविध बांधकामांचा आढावा घेत प्रगती समाधानकारक असल्याचे नमूद केले आणि सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. मुख्य इमारतीचे बांधकाम जूनपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून, 100 केएलडी क्षमतेच्या सिवेज ट्रीटमेंट प्लांटचे काम 30 जूनपर्यंत पूर्ण करण्यास आ. मुनगंटीवार यांनी सांगितले. गेस्ट हाऊस बिल्डिंग क्रमांक-2 चे बांधकाम 30 मेपर्यंत, इनडोअर स्पोर्ट्स बिल्डिंगचे काम 30 जुलैपर्यंत आणि 2 बीएचके क्वार्टर इमारतीचे काम 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच क्वार्टरमध्ये योग्य व्यवस्था करण्यावरही त्यांनी विशेष भर दिला.

विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा सुविधा अत्याधुनिक करण्याच्या सूचना देताना, पारंपरिक महिला खेळांचा समावेश असलेले मैदान विकसित करण्याचे निर्देश आ.मुनगंटीवार यांनी दिले. तालुका क्रीडा संकुलातील कमतरता दूर करून ते अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला. स्विमिंग टँक दुरुस्ती, गोंडवाना विद्यापीठाकडे क्रीडा संकुल संचालनासाठी करार, तसेच सैनिकी शाळा व बल्लारपूर कॉलरी ग्राउंडवरील क्रीडा विकास कामांचा आ.मुनगंटीवार यांनी आढावा घेतला.

“मिशन ऑलिंपिक”च्या दृष्टीने चंद्रपूर जिल्ह्याला क्रीडा क्षेत्रात सक्षम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.परिसरातील लँडस्केपिंग कल्पकतेने व दर्जेदार पद्धतीने करण्यासोबत त्याच्या देखभालीसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध ठेवण्याच्या सूचना दिल्या. महिलांच्या विविध भूमिकांचे प्रतीक म्हणून दगडातील शिल्प उभारणे, योगा हॉल तयार करणे, तसेच विद्यार्थिनींसाठी वसतिगृह उभारणीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

आरओ, जिम व भव्य सांस्कृतिक सभागृह,विद्यार्थिनींसाठी आधुनिक सुविधा

विद्यार्थिनींसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्थेसाठी आरओ मशीन बसविणे, तसेच देशासाठी योगदान दिलेल्या महान महिलांची माहिती क्यूआर कोडच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा अभिनव उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले. अत्याधुनिक जिम उभारून त्यासाठी 3 ते 4 महिला प्रशिक्षक नेमण्याचे, 20 मीटर लांबीचा ॲक्युप्रेशर वॉकिंग ट्रॅक तयार करण्याचे आणि सुमारे 900 विद्यार्थिनी बसू शकतील असा भव्य सभागृह उभारत असून या भव्य सांस्कृतिक सभागृहाचे काम प्रगतीपथावर आहे. येत्या ३० जुलै पर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले.

ऑक्सफर्डसारखा आधुनिक कॅम्पस; मुनगंटीवार यांचा संकल्प!

विद्यापीठ परिसराची रंगसंगती ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या धर्तीवर ठेवण्याचा, अंतर्गत सिमेंट रस्ते एअरपोर्टसारख्या दर्जाचे विकसित करण्याचा, तसेच झेब्रा क्रॉसिंग व वाहतूक नियमांची जाणीव करून देणारी रचना करण्याचा आग्रह त्यांनी धरला. पावसाचे पाणी साठवण्यासाठी वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम उभारणे, सायनिंग बोर्ड चंद्रपूरच्या इतिहासाशी सुसंगत ठेवणे, तसेच ग्राउंडमध्ये थीम लाईटिंग व आधुनिक साउंड सिस्टीम बसविण्याबाबतही चर्चा झाली.परिसरात इलेक्ट्रिक बस सुविधा उपलब्ध करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश देत, भविष्यात येथे इलेक्ट्रिक बस स्टेशन उभारण्याचा येईल, असे आ. मुनगंटीवार म्हणाले. यासोबत विद्यार्थिनींसाठी स्टेशनरी व प्राथमिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला.

फुलांनी नटलेला आधुनिक कॅम्पस!

कॅम्पस सौंदर्यीकरणासाठी 400 प्रकारच्या फुलांचा बगीचा तयार करणे, बाराही महिने फुलणाऱ्या वनस्पतींची निवड करणे व ऑटोमॅटिक ठिबक सिंचन व्यवस्था उभारण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच 30 मीटर उंच एलिव्हेटेड वॉटर टँकवर आकर्षक घड्याळ बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. लँडस्केपिंगच्या देखभालीसाठी संबंधित कंपनीशी करार करण्याचेही सुचविण्यात आले.या सर्व कामांमुळे एसएनडीटी विद्यापीठाचे उपकेंद्र केवळ शैक्षणिक केंद्र न राहता विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी एक आदर्श, आधुनिक आणि प्रेरणादायी कॅम्पस म्हणून विकसित होईल, असा विश्वास आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page