Friday, April 24, 2026
HomeChandrapur'अमृत २.०' अंतर्गत ३० कोटींचा निधी खर्च होऊनही रामाळा तलावातील भीषण मत्स्यहानीची...
spot_img

‘अमृत २.०’ अंतर्गत ३० कोटींचा निधी खर्च होऊनही रामाळा तलावातील भीषण मत्स्यहानीची सखोल चौकशी करण्याबाबत.

‘अमृत २.०’ अंतर्गत ३० कोटींचा निधी खर्च होऊनही रामाळा तलावातील भीषण मत्स्यहानीची सखोल चौकशी करण्याबाबत.

ज्योत्स्ना वानखेडे:

चंद्रपूर शहराचे भूषण असलेल्या ऐतिहासिक रामाळा तलावात हजारो माशांचा जो सामूहिक मृत्यू झाला आहे, तो केवळ तांत्रिक बिघाड नसून प्रशासकीय यंत्रणेचा अक्षम्य निष्काळजीपणा आहे. केंद्र पुरस्कृत ‘अमृत २.०’ अभियानांतर्गत या तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी तब्बल ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. असे असतानाही माशांचा तडफडून मृत्यू होणे आणि परिसरात भीषण दुर्गंधी पसरणे, ही बाब अत्यंत संतापजनक असून यामुळे प्रशासकीय दाव्यांचे पूर्णतः वाभाडे निघाले आहेत.

या प्रकल्पांतर्गत सावरकर नगर परिसरातील सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे काम ९०% पूर्ण झाले असून संरक्षक भिंतीचे कामही ८०% पूर्ण झाले आहे. तरीही रामाळा तलावात दूषित पाणी मिसळून जलचर मृत्युमुखी पडत असतील, तर या कामाच्या गुणवत्तेवर मोठा संशय निर्माण होतो. तलावातील पाणी शुद्ध करण्यासाठी ‘ऑक्सिडेशन’ यंत्रणा आणि ‘वायुवीजन’ यंत्रांचा वापर केवळ कागदोपत्री दाखवला जात असून प्रत्यक्ष जमिनीवर मात्र प्राणवायूच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणावर माशांचा बळी गेला आहे, या तांत्रिक विसंगतीची सखोल चौकशी होणे अनिवार्य आहे.

तलावातील कचरा साफ करण्यासाठी जलपर्णी काढण्याचे यंत्र आणि तरंगता कचरा गोळा करणारी अत्याधुनिक यंत्रे उपलब्ध असतानाही रामाळा तलावाची ही दुर्दशा का ? ३० कोटी रुपये खर्च होऊनही जर तलाव प्रदूषणमुक्त होत नसेल, तर या निधीचा विनियोग नेमका कुठे झाला, हा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. १८ मे २०२४ पासून सुरू झालेल्या या कामाची मुदत संपत आली असतानाही प्रकल्प पूर्णत्वाऐवजी जलचरांच्या विनाशाकडे झुकत असल्याचे दिसत आहे. या मृत माशांमुळे शहरात संसर्गजन्य रोगराई पसरल्यास त्याला जबाबदार असणाऱ्या कंत्राटदारावर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.

तरी, जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी समितीमार्फत चौकशी करावी. रामाळा तलावातील मृत मासे युद्धपातळीवर काढून परिसराचे निर्जंतुकीकरण करावे आणि ३० कोटींच्या या प्रकल्पाचे ‘न्यायवैद्यक अंकेक्षण’ करून दोषींवर कठोर कारवाई करावी. या पत्राची तात्काळ दखल न घेतल्यास, चंद्रपूरच्या ऐतिहासिक वारशाच्या रक्षणासाठी आणि जनतेच्या पैशाच्या हिशोबासाठी आम्हास तीव्र लोकआंदोलन छेडावे लागेल, याची प्रशासनाने नोंद घ्यावी. अशा आशयाचे पत्र

Letter No- 2157/2026 Date : 24/04/2026 मा. जिल्हाधिकारी,  जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांना Smt. PRATIBHA SURESH DHANORKAR MEMBER OF PARLIAMENT  LOKSABHA

DELHI यांनी दिले आहे व प्रतिलीपी  १) मा. आयुक्त, महानगरपालिका, चंद्रपूर.  २) मा. प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर यांना प्रेषित केल्या आहेत.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page