“जय श्रीराम”… बंगाल भगवामय !
आसाम, पश्चिम बंगाल व पुद्दुचेरीतील भाजपाच्या विजयाने राष्ट्रवादाचा बुलंद जयघोष
जनतेने विकास, सुशासन आणि राष्ट्रहिताच्या विचारांवर उमटवला विश्वासाचा शिक्का – आ. सुधीर मुनगंटीवार
Jyotsna Wankhede : पश्चिम बंगाल, आसाम व पुद्दुचेरी येथे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मिळालेला भव्य विजय म्हणजे जनतेने विकास, राष्ट्रवाद आणि सुशासनाच्या विचारांवर व्यक्त केलेला प्रचंड विश्वास असल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
“जय श्रीराम”च्या घोषणांनी दुमदुमलेल्या बंगालच्या भूमीने राष्ट्रहित, संस्कृती आणि विकासाच्या विचारांना दिलेला हा अभूतपूर्व कौल ऐतिहासिक आणि प्रेरणादायी असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. जनतेने केवळ राजकीय परिवर्तनासाठी नव्हे, तर मजबूत नेतृत्व, पारदर्शक प्रशासन आणि राष्ट्रहिताच्या धोरणांना पाठिंबा देत हा विजय घडवून आणल्याचेही त्यांनी नमूद केले.
देशगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी जी, केंद्रीय गृहमंत्री श्री. अमितभाई शहा जी तसेच राष्ट्रीय अध्यक्ष श्री. नितीन नबिन जी यांचे आ. मुनगंटीवार यांनी मनस्वी अभिनंदन केले. तसेच आसाम, पश्चिम बंगाल व पुद्दुचेरीच्या जागृत, राष्ट्रप्रेमी जनतेचेही हार्दिक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
देशगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनामार्फत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्यासाठी राबविण्यात येत असलेले विकासकार्य, गरीब कल्याणाच्या विविध योजना, राष्ट्रीय सुरक्षेबाबतची ठाम भूमिका तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून कार्य करणारे भारतीय जनता पार्टीचे सरकार यामुळेच जनतेने पुन्हा एकदा भाजपावर विश्वास व्यक्त केला आहे, असेही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
बंगालच्या भूमीत उमटलेला “जय श्रीराम”चा जयघोष हा केवळ निवडणुकीतील विजयाचा नाद नसून भारताच्या सांस्कृतिक अस्मिता, राष्ट्रभक्ती आणि लोकशाहीवरील अढळ विश्वासाचा उत्सव असल्याचेही आमदार मुनगंटीवार यांनी नमूद केले. हा विजय आगामी काळात देशाच्या प्रगतीला नवी ऊर्जा देणारा आणि राष्ट्रहिताच्या विचारांना अधिक बळकट करणारा ठरेल, असेही आ. मुनगंटीवार यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.








