प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना युवकांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रभावी माध्यम – आ. किशोर जोरगेवार
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या वतीने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
Jyotsna Wankhede:
भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी रोजगारनिर्मिती हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. ‘प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना’ ही केवळ एक योजना नसून देशातील युवकांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक येथे आयोजित करण्यात आलेला कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर संगिता खांडेकर, एमआयडीसीचे अध्यक्ष मधुसुदन रुग्घठा, प्रशांत सिंग, पियुश मिश्रा, अमित सिंग आदींची उपस्थिती होती. यावेळी अनेक युवकांना आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने विविध आस्थापनात नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी पूढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, आज अनेक सुशिक्षित युवक रोजगाराच्या शोधात आहेत. अशा परिस्थितीत प्रथमच नोकरी करणार्या युवकांना आर्थिक प्रोत्साहन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे युवकांना रोजगार मिळविण्यासाठी प्रेरणा मिळेल, तसेच औपचारिक रोजगार क्षेत्रात त्यांचा सहभाग वाढेल. सामाजिक सुरक्षा ही प्रत्येक कामगाराची गरज आहे आणि एपीएफओ सारख्या व्यवस्थेमुळे कामगारांच्या भविष्याची आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित होते.
या योजने अतंर्गत उद्योग आणि व्यावसायिक संस्थांना नवीन रोजगार निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. उद्योग वाढतील तर रोजगार वाढतील आणि रोजगार वाढले तर देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील उद्योजकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि नव्या युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात.
चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आहे. कोळसा, ऊर्जा, सिमेंट आणि इतर अनेक उद्योग येथे कार्यरत आहेत. या योजनेच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यात रोजगारनिर्मितीची नवी दारे खुली होतील, असा मला विश्वास आहे. आपल्या जिल्ह्यातील युवकांना स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आपण सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे.
केंद्र सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन, बँका, उद्योग क्षेत्र आणि लोकप्रतिनिधी यांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. अशा जनजागृती कार्यक्रमांमुळे नागरिकांपर्यंत योजनांची अचूक माहिती पोहोचते आणि त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होतो असे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात अनेक तरुणांना आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.










