Thursday, July 2, 2026
HomeChandrapurआ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यातील वाहतूक समस्यांवर ठोस उपाययोजनांना गती
spot_img

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यातील वाहतूक समस्यांवर ठोस उपाययोजनांना गती

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यातील वाहतूक समस्यांवर ठोस उपाययोजनांना गती

आ.मुनगंटीवार यांची वाहतूक व्यवस्थापनासाठी १०० होमगार्ड नियुक्तीची मागणी; पोलीस महानिरीक्षकांचे आठवडाभरात कारवाईचे आश्वासन

अपघात, ट्रॅफिक जॅम आणि मनुष्यबळ तुटवड्यावर आ.मुनगंटीवार यांची गंभीर भूमिका; अतिरिक्त उपाययोजनांवर भर



Jyotsna Wankhede: चंद्रपूर जिल्ह्यातील वाढती वाहतूक कोंडी, अपघातांची गंभीर समस्या आणि वाहतूक पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेता राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत राज्याचे पोलीस महानिरीक्षक मनोज कुमार शर्मा यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. जिल्ह्यातील वाहतूक समस्यांवर ठोस उपाययोजनांना गती मिळावी, यासाठी ट्रॅफिक व्यवस्थापनासाठी किमान १०० होमगार्डची नियुक्ती करण्यात यावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी त्यांनी केली. यामध्ये ७५ पुरुष आणि २५ महिला होमगार्डचा समावेश असावा, असेही आ.मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. या चर्चेनंतर पोलीस महानिरीक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद देत आठवडाभरात आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले असून चंद्रपूरच्या वाहतूक समस्यांवर प्रभावी निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

चर्चेदरम्यान आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेवरील वाढता ताण, अपुरे मनुष्यबळ, अवजड वाहनांची वाढती संख्या आणि सातत्याने घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर गंभीर चिंता व्यक्त केली. वाढत्या परिस्थितीचा आढावा घेत तातडीच्या आणि प्रभावी उपाययोजनांची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. वाढत्या वाहनसंख्येमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी, मुख्य मार्गांवरील वाढलेला ताण आणि त्यामुळे नागरिकांना दररोज सहन करावा लागणारा मनस्ताप हाही मुद्दा ठामपणे मांडला.

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वाहतूक समस्यांबाबत सातत्याने विधानसभेत प्रभावीपणे आवाज उठवला आहे. विशेषतः चंद्रपूर शहरासाठी रिंग रोडची वाढती गरज, ट्रॅफिक जॅममुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी तसेच ड्रंक अँड ड्राईव्हच्या वाढत्या घटनांमुळे होणारे अपघात याकडे त्यांनी वारंवार शासनाचे लक्ष वेधले आहे.

ड्रंक अँड ड्राईव्हविरोधात मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवून कठोर कारवाई करण्याची गरजही आ.मुनगंटीवार यांनी यापूर्वी अधोरेखित केली आहे.वाहतूक पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेता ट्रॅफिक व्यवस्थापनासाठी स्वतंत्र मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचे आ.मुनगंटीवार यांनी चर्चेत स्पष्ट केले. जिल्ह्यातील मुख्य चौक, महामार्ग आणि वाहतूक कोंडीच्या ठिकाणी पोलिसांसोबत होम गार्ड तैनात करण्याचाही प्रस्ताव त्यांनी मांडला.

चंद्रपूर जिल्हा औद्योगिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा जिल्हा मानला जातो. जिल्ह्यात कोळसा खाणी, सिमेंट उद्योग, पेपर मिल, वीज निर्मिती केंद्रे तसेच जागतिक स्तरावर प्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते.

प्राप्त आकडेवारीनुसार, चंद्रपूर शहरातून दररोज सुमारे ६ हजार ते ६ हजार ५०० वाहनांची ये-जा होते.जिल्ह्यात सध्या एकूण ८ लाख ४१ हजार ४७६ वाहने नोंदणीकृत असूनत्यात ६ लाख ६९ हजारांहून अधिक दुचाकी, ७९ हजारांहून अधिक चारचाकी आणि जवळपास ९० हजार अवजड वाहनांचा समावेश आहे. याशिवाय बाहेर जिल्ह्यातून आणि राज्यातून येणाऱ्या वाहनांची संख्याही मोठी आहे.

जिल्ह्यातून ७ राष्ट्रीय महामार्ग आणि १३ राज्य महामार्ग जात असल्याने वाहतूक नियंत्रणाचे आव्हान अधिक गंभीर बनले आहे. चंद्रपूर शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० हा २४ तास वाहतुकीने गजबजलेला असतो. शहरातील किमान १२ ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक कोंडी निर्माण होत असून ग्रामीण भागातील १४ तालुक्यांतील २० हून अधिक ठिकाणी वाहतूक समस्येची स्थिती गंभीर आहे.अपघातांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास सन २०२३ मध्ये ७९२, सन २०२४ मध्ये ७८५ तर सन २०२५ मध्ये आतापर्यंत ७५३ अपघातांची नोंद झाली आहे. गंभीर अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

जिल्ह्यातील ३४ पोलीस ठाण्यांपैकी तब्बल १५ ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातून राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने वाहतूक नियंत्रणाचे आव्हान अधिक जटिल बनले आहे. परिणामी उपलब्ध मनुष्यबळावर मोठा ताण निर्माण झाला असून वाहतूक व्यवस्थापनासाठी स्वतंत्र आणि सक्षम ट्रॅफिक फोर्सची गरज अधिक तीव्रतेने जाणवत आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पोलीस महानिरीक्षकांकडे ठोस आणि परिणामकारक उपाययोजनांची मागणी केली आहे. होमगार्डची नियुक्ती आणि ड्रंक अँड ड्राईव्हविरोधात विशेष मोहीम राबविणे तसेच आधुनिक ट्रॅफिक व्यवस्थापनाच्या उपाययोजना प्रभावीपणे अंमलात आणणे, या मागण्यांमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील वाहतूक समस्यांवर दिलासा मिळेल आणि नागरिकांना सुरक्षित, सुलभ वाहतुकीचा लाभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page