Monday, August 17, 2026
spot_img
HomeChandrapurबदलत्या औद्योगिक गरजांनुसार विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे : डॉ. अनिल झेड....

बदलत्या औद्योगिक गरजांनुसार विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे : डॉ. अनिल झेड. चिताडे आरसीईआरटी चंद्रपूर येथे विद्युत अभियांत्रिकी विभागाचा पालक-शिक्षक मेळावा उत्साहात

बदलत्या औद्योगिक गरजांनुसार विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे : डॉ. अनिल झेड. चिताडे

आरसीईआरटी चंद्रपूर येथे विद्युत अभियांत्रिकी विभागाचा पालक-शिक्षक मेळावा उत्साहात

Jyotsna Wankhede :
सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) द्वारा संचलित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी, चंद्रपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या वतीने शैक्षणिक सत्र 2025-26 अंतर्गत “द्वितीय पालक-शिक्षक मेळावा 2026” मोठ्या उत्साहात व यशस्वीरित्या पार पडला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पालक व शिक्षक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या मेळाव्यात प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीचा बारकाईने आढावा घेऊन संबंधित पालकांशी वैयक्तिक संवाद साधण्यात आला. विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील अडचणी, विषयांतील कमकुवत भाग, वेळेचे नियोजन, नियमित अभ्यासाची सवय, डिजिटल साधनांचा योग्य वापर तसेच करिअर निवडीसंबंधी मार्गदर्शन यावर सखोल चर्चा झाली. पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या पाल्यांच्या प्रगतीबाबत उत्स्फूर्तपणे मते व सूचना मांडल्या. या संवादातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या सुधारणा व उपाययोजना निश्चित करण्यात आल्या.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. अनिल झेड. चिताडे,  डाॅ. राजेंद्र के. धात्रक (विभागप्रमुख, विद्युत अभियांत्रिकी), डॉ. सुभाष वाय. कामडी तसेच प्रा. डी. बी. मेश्राम उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. अनिल झेड. चिताडे यांनी मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उत्कृष्टतेसोबतच नैतिक मूल्ये, संवाद कौशल्य, टीमवर्क, नेतृत्वगुण आणि व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. बदलत्या औद्योगिक गरजांनुसार विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची जाण ठेवून स्वतःला सक्षम बनविण्याचे त्यांनी आवाहन केले.

कार्यक्रमात विभागप्रमुख डाॅ. राजेंद्र के. धात्रक (विभागप्रमुख, विद्युत अभियांत्रिकी) यांनी उपस्थित पालकांचे स्वागत करून मेळाव्याचे उद्दिष्ट स्पष्ट केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच उपस्थिती, वर्तन, शिस्त, प्रकल्प कार्य, प्रयोगशाळेतील कामगिरी, अंतर्गत मूल्यमापन तसेच विविध तांत्रिक व सहशैक्षणिक उपक्रमांमधील सहभाग याबाबत सविस्तर माहिती दिली. आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षाभिमुख शिक्षणावर न राहता कौशल्याधारित शिक्षण, संशोधन वृत्ती, नवोपक्रम आणि उद्योगाभिमुख ज्ञान आत्मसात करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

पालक प्रतिनिधी म्हणून श्री. रविंद्र गनवीर व श्री. विनोद पेटकर यांनी मनोगत व्यक्त करत महाविद्यालयाच्या शैक्षणिक, तांत्रिक व सहशैक्षणिक उपक्रमांचे कौतुक केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालक व शिक्षक यांच्यातील समन्वय अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमादरम्यान विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. नियमित पालक-शिक्षक संवाद, तांत्रिक कार्यशाळा, औद्योगिक भेटी, प्रकल्पाधारित शिक्षण, करिअर मार्गदर्शन सत्रे तसेच व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम यांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत असून त्यांची कौशल्ये अधिक विकसित होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी विद्युत अभियांत्रिकी विभागातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रम अत्यंत सकारात्मक, संवादात्मक आणि समाधानकारक वातावरणात पार पडला. या उपक्रमामुळे पालक व शिक्षक यांच्यातील नाते अधिक दृढ झाले असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा मेळावा एक प्रभावी व महत्त्वपूर्ण पाऊल ठरला आहे.

“यावेळी शैक्षणिक व सहशैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नाविन्यपूर्ण व गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.”

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page