Monday, June 22, 2026
HomeProjectरोटरी क्लबच्या सामाजिक उपक्रमाचे आ. मुनगंटीवार यांच्याकडून कौतुक; शिक्षण, कौशल्य विकास आणि...
spot_img

रोटरी क्लबच्या सामाजिक उपक्रमाचे आ. मुनगंटीवार यांच्याकडून कौतुक; शिक्षण, कौशल्य विकास आणि महिला सक्षमीकरणासाठी बल्लारपूर मतदारसंघात विविध प्रकल्प सुरू

बोर्डा गावातून शिक्षण सक्षमीकरणाचा आदर्श!

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते बोर्डा येथे २५ विद्यार्थिनींना सायकलींचे वितरण

रोटरी क्लबच्या सामाजिक उपक्रमाचे आ. मुनगंटीवार यांच्याकडून कौतुक; शिक्षण, कौशल्य विकास आणि महिला सक्षमीकरणासाठी बल्लारपूर मतदारसंघात विविध प्रकल्प सुरू

Jyotsna Wankhede : मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी समाजातील विविध घटकांच्या सहभागातून बोर्डा येथे शिक्षण सक्षमीकरणाचा प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे. रोटरी क्लब चंद्रपूरच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील २५ विद्यार्थिनींना राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सायकलींचे वितरण करण्यात आले. विद्यार्थिनींना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत त्यांचा आत्मविश्वास वाढविणाऱ्या या उपक्रमातून शिक्षण सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचला.

यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष संदीप रामटेके, सचिव राजेश गण्यारपवार, प्रकल्प संचालक अनुप यादव, गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय आईंचवार, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत कातकर, उपसरपंच दीपक खनके, भाजपा जिल्हा महामंत्री शुभम गेडाम,मुख्याध्यापक प्रशांत काटकर, शिक्षक राहुल गंधारे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आ. मुनगंटीवार म्हणाले की, बल्लारपूर मतदारसंघ हा केवळ महाराष्ट्रातील नव्हे, तर देशातील आदर्श आणि क्रमांक एकचा मतदारसंघ म्हणून ओळखला जावा, ही माझी सातत्याने भूमिका राहिली आहे. या ध्येयपूर्तीसाठी विविध सामाजिक संस्था, संघटना आणि दानशूर व्यक्ती महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. त्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य आहे. विद्यार्थिनींना सायकली उपलब्ध करून देत त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासाला गती देण्याचे कार्य रोटरी क्लबने केले असून हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे.

रोटरी क्लबचे सदस्य समाजहितासाठी मोठ्या प्रमाणात योगदान देतात. अशा सामाजिक कार्यातून इतरांनाही प्रेरणा मिळावी यासाठी दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी समाजकार्यात अधिक सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले. मुलींना शिक्षणासाठी सायकली उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असून अशा उपक्रमांमुळे त्यांच्या शिक्षणाला चालना मिळून भविष्य अधिक सक्षम होईल, असे ते म्हणाले.

जिल्ह्यातील सुमारे पाच हजार मुलींना कौशल्याधारित शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी एसएनडीटी विद्यापीठाचे उपकेंद्र उभारण्याचे काम सुरू आहे. तसेच बल्लारपूर येथे स्वर्गीय सुषमा स्वराज यांच्या नावाने उभारण्यात येत असलेल्या कौशल्य विकास केंद्रामध्ये महिलांना रोजगारक्षम बनविण्यासाठी विविध प्रशिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या केंद्राचे उद्घाटन लवकरच होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

बोर्डा गावात अंतर्गत सिमेंट रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, शहीद स्मारक तसेच विविध सामाजिक सभागृहांसह अनेक विकासकामे पूर्णत्वास आली आहेत. सायकली उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थिनींचा शाळेत ये-जा करण्याचा वेळ वाचणार असून त्या वेळेचा उपयोग अधिक वाचन, अध्ययन आणि ज्ञानार्जनासाठी करावा. शिक्षणाच्या बळावर बोर्डा गावाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहनही आ. मुनगंटीवार यांनी केले.

या कार्यक्रमात प्रतिनिधिक स्वरूपात आराध्या राजेंद्र संत्रे, काव्या सतीश लोणगाडगे, शिवण्या विकास मडावी, अभिलाषा श्यामलाल शेंडे आणि जैनबखातून मुश्ताक शहा या विद्यार्थिनींसह एकूण २५ मुलींना सायकलींचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या शिक्षणाच्या प्रवासाला अधिक बळ मिळणार असून शाळेत ये-जा करण्यासाठी त्यांना मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.

नवीन चोरडिया, गुरजीतसिंग गडहोक, अनुप पोरेड्डीवर, जय वाघाडे यांनी मुनगंटीवार यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.संचालन डॉ. सिमला गाजरलावार यांनी तर आभार सचिव राजेश गन्नारपवार यांनी मानले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page