पूर्ण शक्तीने शेतकरी बांधवांच्या पाठीशी; प्राकृतिक शेतीच काळाची गरज – आ. सुधीर मुनगंटीवार
आ. मुनगंटीवार यांचा भाजपा किसान मोर्चाच्या प्राकृतिक शेतकरी संमेलनात शाश्वत शेतीचा संदेश
नैसर्गिक शेती, आंतरपीक पद्धती व आधुनिक कृषी तंत्रज्ञानावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
*Jyotsna Wankhede* : “शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्याच्या प्रगतीशिवाय राष्ट्राची प्रगती शक्य नाही. प्रत्येक शेतकरी बांधवाच्या सुख-दुःखात मी पूर्ण शक्तीने त्यांच्या पाठीशी उभा आहे. प्राकृतिक शेतीचा स्वीकार करून उत्पादन खर्च कमी करावा, जमिनीचे आरोग्य जपावे आणि शाश्वत शेतीचा मार्ग स्वीकारावा,” असे आवाहन राज्याचे माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा, चंद्रपूर (ग्रामीण) यांच्या वतीने आयोजित प्राकृतिक शेतकरी संमेलनात उपस्थित शेतकरी बांधवांशी आ. मुनगंटीवार यांनी दूरध्वनीद्वारे संवाद साधत भूमिका व्यक्त केली.
या संमेलनाला आमदार करण देवतळे, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, ब्रिजभूषण पाझारे, डॉ. मंगेश गुलवाडे तसेच भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बंडू गौरकर,किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष, महामंत्री, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दूरध्वनीद्वारे उपस्थित शेतकरी बांधवांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्राकृतिक शेती ही केवळ शेतीची पद्धत नसून शेतकरी, पर्यावरण आणि भावी पिढ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी आवश्यक असलेली जीवनशैली असल्याचे सांगत शेतकऱ्यांना तिचा व्यापक स्वीकार करण्याचे आवाहन केले. शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपण कायम कटिबद्ध आहोत, असे नमूद करत त्यांनी शेतकरी बांधवांच्या प्रत्येक अडचणीत पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही दिली. शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी, त्यांच्या न्याय्य मागण्यांना शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांच्या प्रभावी सोडवणुकीसाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी सोनाली लोखंडे (कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही), डॉ. अमर शेट्टीवार (भाजीपाला संशोधन केंद्र, वरोरा), भास्कर गायकवाड (सेवानिवृत्त कृषी अधिकारी) आणि रवीजी निगुडे (संयोजक, ॲग्री कोर्स, भाजपा किसान मोर्चा) यांनी प्राकृतिक शेती, आंतरपीक पद्धती, मृदासंवर्धन, सेंद्रिय निविष्ठा निर्मिती, आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि शाश्वत शेती यावर सखोल मार्गदर्शन केले.
मार्गदर्शकांनी रासायनिक खतांचा अतिरेक टाळून प्राकृतिक शेती व आंतरपीक पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. या पद्धतीमुळे उत्पादन खर्च कमी होऊन जमिनीची सुपीकता, पर्यावरण संरक्षण आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न अधिक सक्षम होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्राकृतिक शेतीचा यशस्वी अवलंब करून इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या शेतकरी बांधवांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी प्राकृतिक शेतीचा स्वीकार करावा, असे आवाहन करण्यात आले.
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्राकृतिक शेतकरी संमेलनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल भाजपा किसान मोर्चा, चंद्रपूर (ग्रामीण)च्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उपस्थित शेतकरी बांधवांचे अभिनंदन करत त्यांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.