*चंद्रपूर जिल्ह्यात गणेशोत्सव-2026 पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न;* *’DJ’ बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन*
*ज्योत्स्ना वानखेडे*
आगामी सार्वजनिक गणेशोत्सव-2026 च्या पार्श्वभूमीवर दिनांक :10/07/2026 रोजी सायंकाळी पोलीस मुख्यालय, चंद्रपूर येथील ड्रिल शेडमध्ये एक महत्त्वपूर्ण आढावा व नियोजन बैठक पार पडली. सदर बैठक चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक मा. श्री. आयुष नोपानी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीला चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री. अकनूरी नरेश, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. प्रमोद चौगुले यांच्यासह महानगरपालिका व विविध शासकीय विभागांचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, चंद्रपूर जिल्ह्यातील विविध गणेश मंडळांचे प्रतिनिधी, मूर्तिकार, डीजे चालक-मालक आदींसह सुमारे 200 ते 250 नागरिक उपस्थित होते.
*बैठकीतील महत्त्वाचे निर्णय व प्रशासनाचे आवाहन:*
गणेशोत्सव शांततापूर्ण, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यासाठी पोलीस अधीक्षक व उपस्थित अधिकाऱ्यांनी गणेश मंडळांना खालीलप्रमाणे महत्त्वपूर्ण सूचना दिल्या:
1. *समन्वय व सुरक्षा व्यवस्था:* सर्व गणेश मंडळांनी आपापल्या पातळीवर समन्वय समिती स्थापन करावी, स्वयंसेवकांची नियुक्ती करावी आणि सुरक्षेच्या दृष्टीने मंडप परिसरात सीसीटीव्ही (CCTV) व्यवस्था उभारावी.
2. *बालकांची सुरक्षा:* विसर्जन मिरवणुकीतील वाहनांवर लहान मुलांना बसवू नये, जेणेकरून संभाव्य अपघात टाळता येतील.
3. *पारंपरिक वाद्यांना प्राधान्य:* यंदाच्या महोत्सवात पारंपरिक वाद्यांचा वापर वाढवून संस्कृतीचे जतन करण्याबत विशेष मार्गदर्शन करण्यात आले.
4. *आदर्श गणेश मंडळ स्पर्धा:* जिल्ह्यातील सर्व मंडळांनी प्रशासनातर्फे आयोजित ‘आदर्श गणेश मंडळ स्पर्धेत’ उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे.
*आवाहन: जिल्ह्यात ‘डीजे’ बंदीची प्रभावी अंमलबजावणी*
चंद्रपूर जिल्ह्यात श्री गणेश चतुर्थीपासून ‘डीजे’ (DJ) वाजवण्यावर पूर्णपणे बंदी असणार आहे. सर्वोच्च न्यायालय आणि शासनाच्या ध्वनी प्रदूषण नियमांचे पालन करण्यासाठी या बंदीची अतिशय प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले असून सर्व चालक-मालक व मंडळांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासन व चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने गणेशोत्सवासाठी सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात येणार आहे. नागरिकांनी आणि गणेश मंडळांनी प्रशासनाने दिलेल्या सर्व नियमांचे व सूचनांचे तंतोतंत पालन करून आगामी उत्सव शांततेत व उत्साहात साजरा करावा, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.