महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील वंचित शेतकऱ्यांना न्याय; आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीनंतर कर्जमाफीची व्याप्ती वाढली
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सभागृहात केली घोषणा
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

*Jyotsna Wankhede*: महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ५० हजार रुपयांच्या अतिरिक्त प्रोत्साहनपर कर्जमाफीची मर्यादा रद्द करून आता दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विधानसभेत केली. या निर्णयामुळे योजनेतील हजारो पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे, या योजनेतील पात्र असूनही विविध तांत्रिक, प्रशासकीय व बँकिंग प्रक्रियेतील अडचणींमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि कर्जमाफीची व्याप्ती वाढवावी, अशी मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सविस्तर निवेदनाद्वारे केली होती. या मागणीची दखल घेत शासनाने हा निर्णय जाहीर केल्याबद्दल आमदार मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
सन २०१९ मधील महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र ठरूनही अनेक शेतकरी निधीअभावी, तांत्रिक त्रुटी, आधार संलग्नीकरणातील अडचणी, बँकिंग प्रक्रियेतील विलंब आणि इतर प्रशासकीय कारणांमुळे कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिले होते. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांवर कर्जाचा आर्थिक बोजा वाढत गेला असून अनेकांना नव्याने पीककर्ज व इतर आर्थिक सुविधाही मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या.
या गंभीर प्रश्नाची दखल घेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर निवेदन सादर करून पात्र पण वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांची विशेष पडताळणी करून त्यांना तातडीने कर्जमाफीचा लाभ द्यावा, तसेच प्रशासकीय विलंबामुळे वाढलेले व्याज, दंड व इतर आकारणी शासनाने माफ करावी, अशी ठाम मागणी केली होती.
महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र असूनही लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि कर्जमाफीची व्याप्ती वाढवून दोन लाख रुपयांपर्यंत लाभ देण्यात यावा, अशी सातत्यपूर्ण मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाकडे केली होती. त्यांच्या या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विधानसभेत महत्त्वपूर्ण घोषणा करत महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीची व्याप्ती वाढवून दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून, आपल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला हा निर्णय राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांसाठी दिलासादायक ठरणार आहे. पात्र असूनही विविध कारणांमुळे कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना या निर्णयामुळे न्याय मिळेल, असा विश्वास आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी कमी करून त्यांना नव्याने आर्थिक बळ देण्यास आणि शेती व्यवसाय अधिक सक्षम करण्यास हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.









