Wednesday, July 15, 2026
HomeMaharashtraछत्रपती शिवाजी महाराजांवरील अखंड श्रद्धा आणि शिवकार्याचा गौरव; आ. सुधीर मुनगंटीवार यांना...
spot_img

छत्रपती शिवाजी महाराजांवरील अखंड श्रद्धा आणि शिवकार्याचा गौरव; आ. सुधीर मुनगंटीवार यांना ‘शिवसन्मान-२०२६’

छत्रपती शिवाजी महाराजांवरील अखंड श्रद्धा आणि शिवकार्याचा गौरव; आ. सुधीर मुनगंटीवार यांना ‘शिवसन्मान-२०२६’

आ. मुनगंटीवार यांना श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड यांचे प्रतिष्ठित निमंत्रण

१ ऑगस्ट रोजी मुंबईत होणार ‘शिवसन्मान-२०२६’ पुरस्कार प्रदान सोहळा


Shri. Sudhirbhau Mungantivar Saheb
*Jyotsna Wankhede* : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर, हिंदवी स्वराज्याच्या गौरवशाली परंपरेचे जतन आणि शिवकार्याशी अखंड निष्ठा जपत आयुष्यभर कार्य करणारे राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या योगदानाचा मानाचा गौरव होत आहे. श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड यांनी त्यांना ‘शिवसन्मान-२०२६’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी अधिकृत निमंत्रणही पाठविले आहे. समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी पाठविलेल्या पत्रानुसार, १ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृह, छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर (मुंबई) येथे आयोजित विशेष सोहळ्यात आ. मुनगंटीवार यांना या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

समितीने पाठविलेल्या पत्रात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्याचा विशेष गौरव करण्यात आला आहे. त्यांच्या पुढाकारामुळे ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला प्रथमच अधिकृत शासकीय दर्जा प्राप्त झाला आणि या ऐतिहासिक परंपरेला नवे वैभव लाभले, असा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. शिवराज्याभिषेक समितीला अर्पण केलेली रौप्यमयी पालखी तसेच प्रतापगडावरील श्री भवानीमातेला अर्पण केलेले रौप्यछत्र हे शिवचरित्रावरील त्यांची अखंड निष्ठा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जनमानसात रुजविण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून त्यांनी केलेले अविरत कार्य यांचा समितीने विशेष गौरव केला आहे.

पत्रात पुढे नमूद करण्यात आले आहे की, शिवराज्याभिषेक समितीच्या प्रत्येक उपक्रमामागे आ.मुनगंटीवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, सहकार्य आणि भक्कम पाठबळ लाभले असून, त्यांच्या या अमूल्य योगदानाचा गौरव करण्यासाठी त्यांना ‘शिवसन्मान२०२६’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्याचा समितीने निर्णय घेतला आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्री असताना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले.  देशभरातील पवित्र नद्यांचे जल एकत्र करून सहस्त्र जलकलश यात्रेचे आयोजन करण्यात आले आणि त्या पवित्र जलाने रायगडावर जलाभिषेक करण्यात आला. राज्याभिषेक वर्षाचा अधिकृत लोगो तयार करून शासनाच्या कामकाजात त्याचा वापर सुरू करण्यात आला.  गेटवे ऑफ इंडिया येथे शिवकालीन शस्त्रास्त्रांचे भव्य प्रदर्शन, आग्रा येथील दिवाण-ए-खासमध्ये शिवजयंती उत्सवाचे आयोजन, शिवकालीन ‘होन’ तसेच शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकिटांचे प्रकाशन, मंत्रालयात दररोज ‘शिवविचार’ प्रसारण आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्याचे राज्यभर आयोजन अशा उपक्रमांद्वारे शिवचरित्र जनमानसात अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याचे कार्य त्यांनी केले.

इतिहासाचा सन्मान आणि स्वराज्याच्या अस्मितेचे जतन हेच ध्येय ठेवून आ. मुनगंटीवार यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरीवरील अनधिकृत अतिक्रमण हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. शिवरायांनी अफजलखानाच्या वधासाठी वापरलेली वाघनखे लंडनमधून भारतात परत आणण्यासाठी सामंजस्य करार करून ती मायभूमीत आणण्याचा ऐतिहासिक उपक्रम त्यांनी यशस्वी केला. शिवरायांच्या शौर्याचे साक्षीदार असलेल्या १२ गडकिल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश व्हावा यासाठी प्रभावी पाठपुरावा करण्यात आला. जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे भारतीय सैन्याच्या तळावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारून सीमेवर तैनात जवानांमध्ये राष्ट्रभक्ती आणि स्वाभिमानाची प्रेरणा जागविण्यात आली. शिवकालीन चलन, इतिहास आणि वारशाविषयी जनजागृतीसाठी विशेष प्रदर्शन, कॉफी टेबल बुक, व्याख्यानमाला, संशोधन आणि विविध सांस्कृतिक उपक्रम राबवून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे उल्लेखनीय कार्य त्यांनी केले. या सर्व उपक्रमांमधून शिवभक्ती, इतिहास संवर्धन आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद यांचा प्रभावी संगम घडवून आणत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शिवकार्याला नवे वैभव प्राप्त करून दिले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांचा कृतीतून जागर करत स्वराज्याचा विचार समाजमनात रुजविण्यासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याला मिळालेला हा सन्मान केवळ त्यांच्या वैयक्तिक कर्तृत्वाचा गौरव नसून, शिवविचारांची जपणूक करणाऱ्या प्रत्येक शिवभक्तासाठी आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेसाठी अभिमानाचा क्षण आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page