चंद्रपूरच्या नवोदित कलावंतांना मोठे व्यासपीठ मिळावे, यासाठी सांस्कृतिक चळवळ उभी करूया – आ. सुधीर मुनगंटीवार
उत्कृष्ट शॉर्ट फिल्म व रील स्पर्धेतील पुरस्कारप्राप्त कलावंतांचा आ.मुनगंटीवार हस्ते गौरव
२०२७ मध्ये यापेक्षाही भव्य आणि दर्जेदार स्पर्धा आयोजित करण्याचे आ. मुनगंटीवार यांचे आवाहन *Jyotsna Wankhede*: चंद्रपूरच्या नवोदित कलावंतांना आपल्या कल्पकतेला आणि प्रतिभेला वाव देणारे मोठे व दर्जेदार व्यासपीठ मिळावे, तसेच चंद्रपूर आणि विदर्भाच्या परिसरात एक व्यापक सांस्कृतिक चळवळ उभी राहावी, हे माझे स्वप्न आहे. कला, आवाज आणि चित्रफितींमध्ये समाजमन बदलण्याची मोठी शक्ती असून, अवघ्या दीड मिनिटांची शॉर्ट फिल्मदेखील कधी कधी दीड हजार पानांच्या पुस्तकापेक्षा अधिक प्रभावीपणे आशय आणि भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकते, असे प्रतिपादन माजी सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
एस. के. फिल्म प्रोडक्शन, चंद्रपूर यांच्या वतीने आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘उत्कृष्ट शॉर्ट फिल्म व रील स्पर्धा २०२६’च्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय, चंद्रपूर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक देवा बुरडकर, गणेश साळवे, सुदेश भालेकर, प्रीतम खोब्रागडे, चंद्रकांत गुंडावार, राजेश्वर सुरावार, रामपाल सिंग, डॉ. जयश्री कापसे आदी उपस्थित होते.
या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे १५० ते २०० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी ७० स्पर्धकांची निवड करण्यात आली. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या पुरस्कारांसह त्यांचा गौरव करण्यात आला. पुरस्कारप्राप्त सर्व स्पर्धकांचे आ. मुनगंटीवार यांनी अभिनंदन करून त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.
चंद्रपूर कुठेही मागे नाही. ज्याचे नाव चंद्रपूर आहे, त्या चंद्रपूरचे नाव जगभर पोहोचले पाहिजे, या भावनेने प्रत्येकाने काम करण्याची गरज आहे, असे आ. मुनगंटीवार म्हणाले. शॉर्ट फिल्म आणि रील्सच्या माध्यमातून चंद्रपूरचा आवाज, येथील संस्कृती आणि स्थानिक कलावंतांची प्रतिभा महाराष्ट्रासह देशभरात आणि जगभरात पोहोचली पाहिजे, अशी अपेक्षाही आ.मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
सांस्कृतिक कार्यमंत्री असताना कलावंतांच्या कल्याणासाठी घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती देताना आ.मुनगंटीवार यांनी सांगितले की, कलावंतांच्या मानधनात वाढ करण्यासोबतच राज्यातील कलावंतांना पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला. गरजू कलावंतांना कमी वयातच मदत मिळावी, यासाठी वयोमर्यादेतही बदल करण्यात आला. मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिराचे दर्जेदार आणि भव्य रूपांतर करण्यात आले. त्याचप्रमाणे चंद्रपूरसह बल्लारपूर, मूल, दुर्गापूर, गडचांदूर, घाटंजी आणि पांढरकवडा येथे नाट्यगृह उभारण्यात आले असून काही ठिकाणी ही कामे सुरू आहेत.
चंद्रपूरची ओळख केवळ कोळशाच्या खाणींपुरती मर्यादित राहू नये; या कोळशाच्या खाणीतून निघणारे खरे ‘कोहिनूर’ म्हणजे आपल्या जिल्ह्यातील कलाकार, कलावंत आणि प्रतिभावंत आहेत. त्यांच्या कलेला योग्य व्यासपीठ, संधी आणि प्रोत्साहन मिळाल्यास चंद्रपूरच्या या ‘कोहिनूरां’ची चमक महाराष्ट्रासह देश-विदेशात पोहोचेल, असा विश्वास आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.एस. के. फिल्म प्रोडक्शनने यंदाची स्पर्धा उत्तम प्रकारे आयोजित केली असून, २०२७ मध्ये यापेक्षाही मोठी, भव्य आणि दर्जेदार स्पर्धा आयोजित करण्याचे नियोजन करावे, असे आवाहन आ. मुनगंटीवार यांनी केले. कला, कलावंत आणि नव्या सर्जनशीलतेला व्यासपीठ देणाऱ्या आयोजकांसह त्यांच्या संपूर्ण टीमचे त्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
चंद्रपूर आणि विदर्भाच्या परिसरात केवळ कार्यक्रमांपुरती मर्यादित न राहता नव्या पिढीतील कलावंत, लेखक, दिग्दर्शक, अभिनेते आणि सर्जनशील प्रतिभांना घडविणारी व्यापक सांस्कृतिक चळवळ उभी राहावी, हे माझे स्वप्न आहे. चंद्रपूरच्या मातीत असलेल्या कलागुणांना योग्य व्यासपीठ, प्रोत्साहन आणि संधी मिळाल्यास येथील प्रतिभावंत राज्याच्या आणि देशाच्या सांस्कृतिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करू शकतात. या चळवळीला केवळ प्रेक्षक म्हणून नव्हे, तर सहभागी होऊन प्रत्येकाने बळ द्यावे आणि चंद्रपूरच्या कलेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवावा, असे आवाहनही आ . सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केले.