आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे कृषी पंपांना १२ तास अखंड वीजपुरवठ्याच्या ऊर्जा विभागाच्या सूचना
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा!
कमी पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीत आ. मुनगंटीवार यांच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; १५ ऑगस्टपासून १२ तास वीजपुरवठा सुरू
*Jyotsna Wankhede* : चंद्रपूर जिल्ह्यात कमी पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांची उभी पिके वाचवण्यासाठी कृषी पंपांना विशेष बाब म्हणून अखंड वीजपुरवठा देण्याची आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ऊर्जामंत्री तथा मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केलेल्या मागणीची शासनाने तातडीने दखल घेतली आहे. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या सूचनेनंतर ऊर्जा विभागाने चंद्रपूर जिल्ह्यातील महावितरणच्या संबंधित कार्यालयांना कृषी पंपांसाठी १२ तास अखंड वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या असून, १५ ऑगस्टपासून शेतकऱ्यांना १२ तास वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी केलेल्या मागणीची तातडीने दखल घेतल्याबद्दल आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात यावर्षी अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने अनेक भागांत पावसाचा मोठा खंड पडला आहे. परिणामी जमिनीतील ओलावा कमी होत असून धान, सोयाबीन, कापूस, तूर यांसह विविध खरीप पिकांवर पाण्याअभावी संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या पिकांचे संरक्षण व्हावे आणि त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे कृषी पंपांना विशेष बाब म्हणून अखंड वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
शेतकऱ्यांनी बियाणे, खते, औषधे, मशागत, मजुरी आणि सिंचनासाठी मोठा खर्च केला आहे. अशा परिस्थितीत पिकांना आवश्यक वेळी पाणी मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वीजपुरवठ्यात सातत्य नसल्यास सिंचनाला विलंब होऊन पिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होण्याची आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमी पावसाच्या परिस्थितीत कृषी पंपांसाठी अखंड वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याची मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली होती.
आ. मुनगंटीवार यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी यासंदर्भात आवश्यक सूचना दिल्या. त्यानुसार ऊर्जा विभागाने चंद्रपूर जिल्ह्यातील महावितरणच्या संबंधित कार्यालयांना १२ तास अखंड वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आणि १५ ऑगस्टपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे कमी पावसाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा दिलासा मिळाला असून उभ्या पिकांना आवश्यक पाणी देणे अधिक सुलभ झाले आहे.
शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने आणि खर्च करून पीक उभे केले आहे. कमी पावसामुळे त्याच्या कष्टावर पाणी फिरू नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. माझ्या मागणीची दखल घेत १५ ऑगस्टपासून चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी पंपांसाठी १२ तास वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आभार मानले आहे.