*चंद्रपूर पोलीस आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘TEENS’ कार्यशाळा उत्साहात संपन्न;* *1072 शिक्षक, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग*
*चंद्रपूर पोलीस आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘TEENS’ कार्यशाळा उत्साहात संपन्न;* *1072 शिक्षक, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
चंद्रपूर जिल्हा पोलीस दल आणि रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण सुरक्षेसाठी ‘टीन्स’ (TEENS – Teachers Educating, Empowering & Nurturing Students) जनजागृती कार्यशाळेचे भव्य आयोजन प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह, चंद्रपूर येथे करण्यात आले. या कार्यशाळेत 926 मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, रोटरी क्लबचे 67 सदस्य, 15 बँक कर्मचारी, तसेच विशेष किशोर पोलीस युनिट (SJPU) व भरोसा सेलचे 64 पोलीस अधिकारी व अंमलदार अशा एकूण 1,072 जणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी *श्रीमती वसुमाना पंत (भा.प्र.से.)* यांनी भूषविले. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक *मा. श्री. संदीप पाटील (भा.पो.से.)* उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अपर मुख्य कार्यकारी अधिकारी *श्रीमती कल्पना क्षिरसागर,* जिल्हा पोलीस अधीक्षक *श्री. आयुष नोपाणी (भा.पो.से.),* शिक्षणाधिकारी (जि.प. चंद्रपूर) तसेच रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरच्या अध्यक्षा *रोटे. स्मिता जिवतोडे,* सचिव *रोटे. विशाल खांडरे* व वरिष्ठ रोटेरियन सदस्य तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
*तज्ज्ञांचे महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन:*
*१. पोक्सो कायदा (POCSO Act):* पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी यांनी लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (POCSO) कायद्यातील विविध तरतुदी, शाळांची जबाबदारी व बालकांच्या सुरक्षेबाबत कायदेशीर मार्गदर्शन केले. ज्यात मुख्यत: शाळांनी सुरक्षित वातावरण निर्माण करणे, कर्मचाऱ्यांचे चारित्र्य पडताळणी करणे, पीडित बालकाची ओळख गोपनीय ठेवणे आवश्यक आहे. तसेच कलम 19 अन्वये पोक्सो गुन्ह्याची माहिती देणे बंधनकारक असून, माहिती लपवल्यास शिक्षेची तरतूद असल्याचे सांगून *’चाईल्ड हेल्पलाईन 1098’* चा प्रभावी वापर करण्याचे आवाहन केले.
*२. तरुणाईचे मानसशास्त्र व ताणतणाव व्यवस्थापन:* क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट श्रीमती मानसी मोरे नोपाणी (Happy Heads) यांनी विद्यार्थ्यांचा भावनिक व वैचारिक मेंदू (Emotional vs Rational Brain), योग्य निर्णयासाठी ‘Stop-Think-Choose’ फॉर्म्युला, सहानुभूतीपूर्वक संवाद (Empathy), मानसिक अडचणींची लक्षणे, आणि शिक्षकांसाठी ताणतणाव मुक्तीकरिता ग्राउंडिंग तंत्र’ व कृतज्ञता (Gratitude) भाव यावर सांगून उपयुक्त पद्धतींवर सविस्तर मार्गदर्शन केले.
*३. सायबर सुरक्षा:* सायबर पोलीस ठाण्याचे सहा.पोउपनि मुजावर अली यांनी यांनी डिजिटल अरेस्ट, बनावट APK मालवेअर (उदा. गॅस बिल/कुरिअर/विवाह निमंत्रण), व्हॉट्सॲप हॅकिंग, फिशिंग, टास्क फ्रॉड, सेक्सटॉर्शन, ऑनलाईन गेमिंग, डीपफेक आणि शेअर मार्केट फसवणुकीच्या युक्त्यांवर प्रकाश टाकला. यापासून संरक्षणासाठी टू-स्टेप व्हेरिफिकेशन, अनधिकृत कॉल फॉरवर्डिंग रद्द करण्यासाठी ##002# कोड, हरवलेला मोबाईल ब्लॉक व ट्रॅक करण्यासाठी ‘CEIR’ पोर्टल, संशयास्पद कॉल्स/मेसेजसाठी ‘चक्षू’ (Chakshu) पोर्टल, एम-कवच 2 (M-Kavach 2) ॲप, तसेच सायबर आर्थिक फसवणूक झाल्यास तात्काळ गोल्डन अवरमध्ये 1930 हेल्पलाईन किंवा http://cybercrime.gov.in वर तक्रार करण्याचे आवाहन केले. तसेच ‘डायल 112’ आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करुन वाढत्या सायबर गुन्ह्यांचे स्वरूप, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर आणि ऑनलाईन सुरक्षिततेविषयी माहिती दिली.
*मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. संदीप पाटील यांचे प्रतिपादन:*
आपल्या विशेष मार्गदर्शनात मा. श्री. संदीप पाटील (विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र) यांनी पोक्सो कायदा, सायबर सुरक्षा आणि विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र या तिन्ही विषयांचे दैनंदिन जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. “योगाभ्यास आणि प्राणायामामुळे आयुष्य तणावमुक्त राहते, मी स्वत: याचे अनुभवसिद्ध उदाहरण आहे,” असे सांगत शिक्षकांनी स्वत: नियमित योग साधनेचा अवलंब करून सकारात्मक व आनंदी वृत्तीने विद्यार्थ्यांना घडवावे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी श्रीमती वसुमाना पंत व अपर मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती कल्पना क्षिरसागर यांनी शिक्षक आणि पोलीस प्रशासनाच्या या संयुक्त उपक्रमाचे मनमोकळे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरच्या अध्यक्षा रोटे. स्मिता जिवतोडे यांनी केले. स्वागतपर आभार रोटे. विशाल खांडरे (सचिव, रोटरी क्लब) यांनी मानले, तर आभार प्रदर्शन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रज्ञा वाडेकर यांनी केले.