अंतरजिल्हा चोरट्याला बल्लारपूर पोलिसांची अटक; चौकशीत अनेक चोरीचे गुन्हे उघड
*ज्योत्स्ना वानखेडे*: विसापूर येथील रेल्वेचे साहित्य ठेवण्यात येणाऱ्या गोदामातून लोखंडी अँगल, प्लेट, जॅक आदी साहित्य चोरीला गेल्याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी कारवाई करीत दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांसह दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत आरोपींकडून सुमारे २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विसापूर येथील रेल्वे गोदामातून लोखंडी साहित्य चोरीला गेल्याची घटना समोर आल्यानंतर बल्लारपूर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान दोन विधीसंघर्षग्रस्त बालक तसेच दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले. आरोपींची नावे रुषेश उर्फ कोब्रा चंद्रभान आत्राम (वय २५, रा. विसापूर) आणि रोहन राजू सिडाम (वय १९, रा. विसापूर) अशी आहेत.
यातील रुषेश उर्फ कोब्रा चंद्रभान आत्राम याची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने बल्लारपूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अपराध क्रमांक ८५७/२०२६ मधील घरफोडी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यांतही चोरीचे गुन्हे केल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे.
आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे २५ हजार रुपये आहे. आरोपींच्या चौकशीतून आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, पोलिसांकडून त्या दिशेने तपास सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि सहायक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड, पोलीस हवालदार विकास जुमनाके, संतोष पंडीत, सत्यवान कोटनाके, पुरुषोत्तम चिकाटे, पंकज शिंदे, पोलीस अंमलदार मिलिंद आत्राम, शरदचंद्र कारुस, महेश कुकुडकर, शांतकुमार घोसे, फुलचंद लोधी, संदीप थेरे यांनी सहभाग घेतला.
प्रकरणाचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.