के.जी.एन. पब्लिक स्कूलमध्ये पॉक्सो अधिनियम व आहार-पोषणाबाबत जनजागृती
विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम उत्साहात संपन्न
*ज्योत्स्ना वानखेडे*:
के.जी.एन. पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बल्लारपूर येथे विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता, आरोग्य व सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने पॉक्सो अधिनियम तसेच आहार व पोषण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक ऍडव्होकेट किशोर पूसलवार यांनी विद्यार्थ्यांना पॉक्सो अधिनियमाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. बालकांना लैंगिक शोषण व अत्याचारापासून संरक्षण देण्यासाठी या कायद्याची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही प्रकारचा अनुचित स्पर्श किंवा वर्तन जाणवल्यास घाबरून न जाता पालक, शिक्षक किंवा संबंधित अधिकाऱ्यांना माहिती द्यावी, तसेच आपल्या हक्कांविषयी जागरूक राहावे, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
यानंतर बाल रोग तज्ञ डॉ. अंकिता वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना संतुलित आहार, पोषण आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व समजावून सांगितले. पौष्टिक आहार, फळे, हिरव्या भाज्या, दूध व पुरेसे पाणी यांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसेच जंक फूडचे अतिसेवन टाळून नियमित व्यायाम व आरोग्यदायी सवयी अंगीकारण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी विद्यालयाचे संस्थापक शेख महमूद सर, प्राचार्या स्वाती वाघमारे मॅडम व उपप्राचार्या तेजस्विनी दहिकर मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यालयातील शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत मान्यवरांचे मार्गदर्शन मनोभावे ऐकले. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षितता, आरोग्य, पोषण आणि जबाबदार जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.