*मॅजिक बस इंडिया फाउंडेशनचा उपक्रम : बल्लारपूर आजीविका संसाधन केंद्राच्या माध्यमातून महिलांना उद्योजकतेचे प्रशिक्षण*
*विसापूर येथे पाच दिवसीय प्रशिक्षण यशस्वी; २५ महिलांचा सहभाग*
*ज्योत्स्ना वानखेडे:* मॅजिक बस इंडिया फाउंडेशन व टाटा ट्रस्ट्स यांच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या महिला व युवकांच्या आजीविका विकास उपक्रमांतर्गत बल्लारपूर आजीविका संसाधन केंद्राच्या वतीने विसापूर येथे पाच दिवसीय उद्योजकता विकास प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पडले. या प्रशिक्षणात २५ महिलांनी सहभाग घेतला.
प्रशिक्षणामध्ये उद्योजकता विकास, जीवन कौशल्ये, व्यवसाय नियोजन आणि विपणन या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. संवादात्मक सत्रे, गटचर्चा, विविध उपक्रम व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून महिलांना व्यवसायाच्या संधी ओळखणे, ग्राहक व बाजारपेठ समजून घेणे, किंमत ठरविणे, व्यवसाय नियोजन आणि विपणनाच्या मूलभूत बाबी याबाबत माहिती देण्यात आली.
यासोबतच संवादकौशल्य, निर्णयक्षमता, आत्मविश्वास आणि व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करण्यावरही भर देण्यात आला. सहभागी महिलांनी आपल्या व्यवसाय कल्पनांवर चर्चा करून व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने प्राथमिक नियोजन केले.
हे प्रशिक्षण प्रशिक्षण व्यवस्थापक चेतन पाटील तसेच प्रशिक्षण अधिकारी वैभव करमकर आणि राणी खिरटकर यांनी घेतले. प्रशिक्षणाच्या नियोजन व समन्वयामध्ये केंद्र व्यवस्थापक अमीर तुराळे आणि सहकारी नितीन उपगमलावार यांचे योगदान राहिले. तसेच उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, बल्लारपूर यांच्या सहकार्यामुळे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाले.
प्रशिक्षणानंतर सहभागी महिलांना व्यवसाय उभारणी व विकासासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि पुढील सहकार्य दिले जाणार आहे. हा उपक्रम महिलांना उद्योजकतेकडून शाश्वत आजीविकेकडे वाटचाल करण्यासाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे.