*ज्योत्स्ना वानखेडे*:
ज्याअर्थी, दिनांक २५/०९/२०२६ रोजी चंद्रपूर शहरामध्ये गणपती विसर्जन मिरवणुक निघणार आहे. सदर विसर्जन मिरवणुकीमध्ये जवळपास सर्व गणपती मंडळ भाग घेत असतात अशा वेळी या मिरवणुक मार्गावर देखावे पाहण्याकरीता नागरीकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असते. त्यामुळे दिनांक. २५/०९/२०२६ रोजी सार्वजनिक गणेशोत्सवाचे कार्यक्रम मध्ये रहदारीला अडथळा होवुन जनतेला त्रास होवू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये. म्हणुन या संदर्भात वाहतुकीच्या मार्गामध्ये बदल करणे आम्हास गरजेचे वाटत आहे.
त्याअर्थी, आम्ही आयुष नोपानी (भापोसे), पोलीस अधीक्षक, चंद्रपूर आम्हाला मुंबई पोलीस अधिनियम-१९५१ च्या कलम ३३(१)(ब) नुसार सार्वजनिक ठिकाणी रहदारी व सुव्यवस्था राखण्यासाठी व नियमासाठी प्राप्त असलेल्या कायदेशीर अधिकारान्वये चंद्रपूर शहरातील प्रियदर्शनी चौक ते जटपुरा गेट-कस्तुरबा चौक मार्गे गांधी चौक ते जटपुरा गेट मार्गे रामनगर रोड मार्गे संत केवलराम चौक- ईरई नदी (रामसेतू पुल) या मुख्य मिरवणुकीच्या मार्गावरील रहदारी मध्ये बदल म्हणुन दिनांक २५/०९/२०२६ चे सकाळी ०६:०० वाजता पासुन ते दिनांक २६/०९/२०२६ चे सकाळी ०६:०० वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी शहरातील वाहतुक खालील प्रमाणे वळविण्याचे निर्देशीत करीत आहो.
१) गणेश विसर्जन मुख्य मिरवणुक सोहळा पार पडे पर्यंत प्रियदर्शनी चौक ते जटपुरा गेट-कस्तुरबा चौक मार्गे गांधी चौक ते जटपुरा गेट मार्गे रामनगर रोड मार्गे संत केवलराम चौक- ईरई नदी (रामसेतू पुल) हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांना बंद करण्यात येत आहे.
२) नागपूर रोडने येवुन बल्लारशा किंवा मुल कडे जाणारी सर्व प्रकारची वाहने हे प्रियदर्शनी चौक कडे जाण्यास बंदी करून सर्व प्रकारची वाहने ही वरोरा नाका उड्डाण पुल- सावरकर चौक ते बंगाली कॅम्प, मुल किंवा बल्लारशाकडे जातील.
३) मुल किंवा बल्लारशा कडून नागपूरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने ही बंगाली कॅम्प-सावरकर चौक वरोरा नाका नवीन उड्डाणपुल मार्गे नागपूर कडे जातील.
४) नागपूर कडून शहरामध्ये जाणारी सर्व वाहने (जड वाहने वगळून) छोटा नागपूर मार्गे दाताळा चौक-देवाळा गाव-चोराळा टी पॉईंट वरून बिनबा गेट किंवा पठाणपुरा गेट मधून शहरात प्रवेश करतील.
५) चंद्रपूर शहर पोस्टे हद्दीतील रहीवाशांनी नागपुर, वणी, घुघुस, गडचांदूर कडे जाण्याकरीता रहमत नगर, नगीना बाग व इतर परीसरातुन जाण्यासाठी बिनबा गेट -चोराळा-दाताळा इत्यादी मार्गाचा अवलंब करावा.
६) बल्लारशा व मुल कडून येणा-या सर्व वाहनांना (जड वाहने वगळुन) शहरामध्ये जावयाचे असल्यास बसस्टँड-एलआयसी ऑफीस-बगड खिडकी मार्गे किंवा जुनोना चौकातुन शहरामध्ये किंवा प्रसन्ना पेट्रोल पंप कडून वाबुपेठ मार्गे शहरात फक्त अंचलेश्वर गेट पर्यंत प्रवेश करता येईल.
७) गणेश विसर्जन मुख्य मिरवणुक सोहळ्या दरम्यान खालील ठिकाणे ‘NO PARKING ZONE’ व ‘ NO HAWKERS ZONE’ करण्यात आले आहेत.
१. जटपुरा गेट ते कस्तुरबा चौक पर्यंत
२. जटपुरा गेट ते रामनगर रोड मार्गे रामसेतू पुल पर्यंत
३. जटपुरा गेट ते प्रियदर्शनी चौक पर्यंत
४. कस्तुरबा चौक ते गांधी चौक ते जटपुरा गेट
५. कस्तुरबा चौक ते अंचलेश्वर गेट पर्यंत
६. गांधी चौक ते मिलन चौक ते जोड देऊळ पर्यंत
७. कस्तुरबा चौक ते जेल रोड चौक
८. दस्तगीर चौक ते मिलन चौक
९. मिलन चौक ते बजाज पॉलीटेक्नीक कॉलेज
१०. हिंदी सिटी हायस्कुल ते रघुवंशी कॉम्प्लेक्स पर्यंत
११. मौलाना आझाद चौक ते जयंत टॉकीज
१२. छोटा बाजार चौक ते पाताळेश्वर मंदीर
उपरोक्त नमुद मार्गावर नो-पार्किंग व नो- हॉकर झोन म्हणुन घोषीत केल्याने मिरवणुक व वाहतुक मार्गावर नागरीकांनी, व्यवसायीकांनी तसेच गणेश विसर्जन भक्तांनी कोणत्याही प्रकारची वाहने पार्किंग/उभी करू नये.
मुख्य मिरवणुक मार्गावर राहणाऱ्या रहीवाशांना स्वत:ची पार्किंगकरीता जागा नसल्यास त्यांना आपली वाहने १) जुबली हायस्कूलचे पटांगण २) महानगरपालीकेच्या बाजुला असलेली पार्किंग या ठिकाणी उभी करता येतील. परंतु मिरवणुक संपल्यानंतर ती वाहने तेथुन काढता येतील.
त्याचप्रमाणे चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणात साजरा होणारा गणपती विसर्जन सोहळा पाहण्यासाठी शहरातील व इतर ग्रामीण भागातुन नागरीक येत असतात. दरम्यान शहरात वाहतुक कोंडी होवु नये म्हणुन नागरीकांना खालील प्रमाणे पार्किंग झोन उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
*पार्किंग झोन खालील प्रमाणे घोषीत करण्यात आले आहे.*
१. चांदा क्लब ग्राउंड.
२. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, वरोरा नाका
३. सेंट मायकल हायस्कुल, नगीना बाग
४. सिंधी पंचायत भवन, संत केवलराम चौक जवळ रामनगर
५. व्यायाम शाळा ग्राउंड, पठानपुरा चौक
६. डी.एड.कॉलेज ग्राउंड बाबुपेठ
७. महाकाली मंदीर ग्राउंड, चंद्रपूर
ही ठिकाणे दिनांक २५/०९/२०२६ चे सकाळी ०६:०० वाजता पासुन दिनांक २६/०९/२०२६ चे सकाळी ०६:०० वाजेपर्यंत नागरीकांसाठी पार्किंग स्थळे म्हणुन घोषीत करण्यात येत आहेत. नागरीकांनी आपली वाहने शहरात न आणता वरील पार्किंग स्थळी पार्क करावे.
सदर मुख्य विसर्जन मिरवणुक मार्गातील गणपती मंडळाने दिलेल्या मिरवणुक मार्गातील क्रमाचे तंतोतंत पालन करावे तसेच नागरीकांनी देखील अधिसुचनेतील वाहतुकीच्या नियमाचे पालन करावे. कोणीही सदर अधिसुचनेतील तरतुदीचे उल्लंघन केल्यास ते कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहतील.
गणपती मंडळ तसेच जनतेने विसर्जन दरम्यान वरील अधिसुचनेचे पालन करून शांतता व सुव्यवस्था अबाधीत राखणे कामी पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. सदर अधिसुचनेमध्ये परिस्थिती नुसार बदल करण्यात येईल.