*ज्योत्स्ना वानखेडे*:
आगामी गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका जिल्ह्यात शांततेत, सुरक्षित वातावरणात आणि कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही भंग न होता पार पडावा, यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने सराईत गुन्हेगार आणि समाजकंटकांविरुद्ध व्यापक मोहीम राबवून धडक प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
नागरिकांना सुरक्षित वातावरणात सण साजरा करता यावा यासाठी पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा (LCB) पोलीस निरीक्षक तसेच सर्व पोलीस ठाण्यांच्या ठाणेदारांनी ही संयुक्त कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली आहे.
*प्रतिबंधात्मक कारवाईचा सविस्तर तपशील :*
– *भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १२६ व १२९ अंतर्गत कारवाई:* शांतता भंग करण्याची शक्यता असलेल्या तब्बल ६१५ सराईत गुन्हेगारांविरुद्ध कलम १२६ व कलम १२९ अंतर्गत (चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र) प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
– *तडीपार (हद्दपारी) कारवाई:* जिल्ह्यातील शांततेला गंभीर धोका निर्माण करणाऱ्या ३९ सराईत गुन्हेगारांना कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
– *मिनी तडीपार (कलम १६३ (२) BNSS):* उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचवू शकणाऱ्या १,७६१ संशयित इसमांविरुद्ध कलम १६३ (२) अन्वये मिनी तडीपारची प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
– *एमपीडीए (MPDA) अंतर्गत कठोर स्थानबद्धता:* वारंवार गंभीर गुन्हे करणाऱ्या आणि समाजात दहशत निर्माण करणाऱ्या ४ कुख्यात गुन्हेगारांवर ‘महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम’ (MPDA Act) अंतर्गत कारवाई करून त्यांना कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
*तडीपार गुन्हेगारांना पोलिसांचा कडक इशारा: एआय (AI CCTV) व्हॅन’ ची नजर*
*हद्दपार केलेल्या सर्व गुन्हेगारांना पोलिसांनी सक्त ताकीद दिली आहे:*
– *एआय तंत्रज्ञानाचा वापर:* चंद्रपूर पोलीस दलाच्या अत्याधुनिक ‘एआय (AI) सर्व्हेलन्स सीसीटीव्ही कॅमेरा व्हॅन’ च्या प्रणालीमध्ये हद्दपार आणि तडीपार करण्यात आलेल्या सर्व गुन्हेगारांचे फोटो, चेहरे (Face Recognition) आणि संपूर्ण माहिती नोंदवण्यात आली आहे.
– *सक्त इशारा:* हद्दपारीचा कालावधी सुरू असताना जर कोणताही गुन्हेगार विनापरवाना चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश करताना किंवा फिरताना आढळल्यास, एआय सर्व्हेलन्स सीसीटीव्ही कॅमेरा व्हॅनचे कॅमेरे त्याला तात्काळ ओळखून (Face Catch) अलार्म देतील.
– *कठोर कायदेशीर कारवाई:* आदेशाचे उल्लंघन करून जिल्ह्यात घुसखोरी करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करून अत्यंत कठोर दंडात्मक व तुरुंगवासाची कारवाई करण्यात येईल.
गणेशोत्सवादरम्यान कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी जिल्हा पोलीस दल पूर्णपणे सज्ज असून नागरिकांनी उत्सव शांततेत व नियमांचे पालन करून पारंपरिक पद्धतीने अत्यंत उत्साहात व भक्ती भावनेने साजरा करावा. तसेच संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी. असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.