Thursday, October 22, 2026
spot_img
HomeChandrapurदुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी आ. सुधीर मुनगंटीवार; दर सोमवारी ‘शेतकरी मदत कक्ष’...

दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी आ. सुधीर मुनगंटीवार; दर सोमवारी ‘शेतकरी मदत कक्ष’ सुरू करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी आ. सुधीर मुनगंटीवार; दर सोमवारी ‘शेतकरी मदत कक्ष’ सुरू करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तहसील कार्यालयांत दुष्काळाशी संबंधित विभागप्रमुखांच्या उपस्थितीचे निर्देश देण्याची आ.मुनगंटीवार यांची विनंती

शेतकऱ्यांना कार्यालयीन चकरांतून दिलासा मिळावा, तक्रारींचे एकाच ठिकाणी निराकरण व्हावे, हा प्रमुख उद्देश


*Jyotsna Wankhede* : दुष्काळसदृश परिस्थितीच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणींची संवेदनशीलतेने दखल घेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. निसर्गाच्या प्रतिकूलतेमुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पीक नुकसान, पीकविमा, पाणीटंचाई आणि कृषीविषयक समस्यांसाठी शासकीय कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, त्यांच्या प्रश्नांवर वेळेत कार्यवाही व्हावी आणि प्रशासनाने त्यांच्या अडचणींचे गांभीर्य ओळखून एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने दर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर तसेच जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांमध्ये ‘शेतकरी मदत कक्ष’ कार्यान्वित करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. दुष्काळाच्या कठीण काळात शेतकऱ्यांना केवळ आश्वासनांवर अवलंबून न ठेवता त्यांच्या समस्या ऐकून घेणारी आणि त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही करणारी प्रशासकीय व्यवस्था उभी राहावी, ही आ.मुनगंटीवार यांच्या मागणीमागील प्रमुख भूमिका आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पीक नुकसान, पीकविम्याची रक्कम, शासकीय आर्थिक मदत, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, जनावरांसाठी चारा व पाणी, कृषी योजनांचा लाभ आणि कर्जविषयक अडचणी अशा अनेक प्रश्नांनी शेतकरी त्रस्त आहेत. या समस्या सोडविण्यासाठी शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच संबंधित तहसील कार्यालयांत जात असतात. मात्र, वेगवेगळ्या विभागांचे अधिकारी एकाच वेळी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना अनेकदा वारंवार कार्यालयात जावे लागते.आधीच आर्थिक आणि नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशासकीय प्रक्रियेमुळे अतिरिक्त त्रास सहन करावा लागू नये, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रशासनाने ठोस व्यवस्था निर्माण करावी, अशी भूमिका आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागणीतून मांडली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे दर सोमवारी ‘शेतकरी मदत कक्ष’ कार्यान्वित करण्यात यावा आणि या कक्षात दुष्काळाशी संबंधित सर्व विभागांच्या विभागप्रमुखांनी अनिवार्यपणे उपस्थित राहावे, अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली आहे.कृषी, महसूल, मदत व पुनर्वसन तसेच शेतकऱ्यांच्या विविध समस्यांशी संबंधित विभागांचे अधिकारी एकाच ठिकाणी उपलब्ध असल्यास शेतकऱ्यांना आपल्या तक्रारी आणि निवेदने थेट संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडता येतील. त्यामुळे विविध कार्यालयांमध्ये जाऊन वेळ आणि पैसा खर्च करण्याची गरज कमी होईल. तसेच, संबंधित विभागांना परस्पर समन्वयातून प्रश्न सोडविणे अधिक सुलभ होईल.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी जिल्हाधिकारी कार्यालयात येणे शक्य होत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांमध्येही दर सोमवारी ‘शेतकरी मदत कक्ष’ सुरू करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या कक्षांमध्ये तहसीलदारांचे सहाय्यक आणि संबंधित विभागांचे जबाबदार अधिकारी उपस्थित राहतील, अशी व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात यावेत, असेही आ. मुनगंटीवार यांनी नमूद केले आहे.
या व्यवस्थेमुळे तालुका स्तरावरच शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेता येतील. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून प्रश्नांचे निराकरण करण्यास गती मिळेल आणि शेतकऱ्यांना मदतीसाठी अनावश्यक धावपळ करावी लागणार नाही.

तक्रारींची नोंद आणि प्रलंबित प्रकरणांचा नियमित आढावा

‘शेतकरी मदत कक्ष’ केवळ निवेदने स्वीकारण्यापुरता मर्यादित न राहता, तेथे प्राप्त होणाऱ्या प्रत्येक तक्रारीची आणि अर्जाची नोंद घेण्यात यावी. संबंधित विभागामार्फत त्या प्रकरणावर तातडीने कार्यवाही करण्यात यावी, तसेच प्रलंबित प्रकरणांचा नियमित आढावा घेण्यात यावा, अशी अपेक्षा आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.शेतकऱ्यांनी सादर केलेल्या अर्जांवर कोणती कार्यवाही झाली, कोणत्या विभागाकडे प्रकरण प्रलंबित आहे आणि त्याबाबत पुढील कार्यवाही काय आहे, याची माहिती संबंधित शेतकऱ्यांना देण्यात यावी. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या अर्जाच्या स्थितीसाठी वारंवार कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही. तक्रार नोंदणीपासून ते निराकरणापर्यंतची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी ही व्यवस्था उपयुक्त ठरू शकते.

शेतकऱ्यांच्या अडचणींना प्राधान्य देण्याची मुख्यमंत्र्याकडे मागणी

दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ वेळेत मिळणे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही होणे आणि संबंधित विभागांमध्ये प्रभावी समन्वय असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी केवळ कागदोपत्री नोंदवल्या न जाता त्यांचे प्रत्यक्ष निराकरण व्हावे, यासाठी ‘शेतकरी मदत कक्ष’ ही व्यवस्था महत्त्वाची ठरू शकते.चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तहसील कार्यालयांमध्ये दर सोमवारी ‘शेतकरी मदत कक्ष’ कार्यान्वित करण्याबरोबरच दुष्काळाशी संबंधित सर्व विभागांच्या विभागप्रमुखांनी उपस्थित राहण्याबाबत जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने निर्देश द्यावेत, अशी विनंती आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.दुष्काळाच्या कठीण काळात शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळविण्यासाठी होणारी धावपळ कमी व्हावी, त्यांच्या प्रश्नांना प्रशासनाकडून प्राधान्य मिळावे आणि संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारी कार्यक्षम यंत्रणा उभी राहावी, हा या मागणीचा केंद्रबिंदू आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page