*वैभव कॉन्व्हेंट स्कूल, बल्लारपूरचे विज्ञान प्रदर्शनात घवघवीत यश!*
*Jyotsna Wankhede* : पंचायत समिती बल्लारपूरच्या वतीने स्थानिक भालेराव पब्लिक स्कूल येथे दिनांक १३ ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ५४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात तालुक्यातील अनेक शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
वैभव कॉन्व्हेंट स्कूल, बल्लारपूरच्या वतीने विविध गटांत एकूण पाच विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनासाठी मांडण्यात आल्या होत्या.
या विज्ञान प्रदर्शनात वैभव कॉन्व्हेंट स्कूलने उल्लेखनीय कामगिरी करत विविध गटांत पुरस्कार प्राप्त केले. या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
उच्च प्राथमिक विद्यार्थी गटात इयत्ता सातवीचा विद्यार्थी देवेश दिलीप शेटे याने ‘स्मार्ट पार्किंग सिस्टीम’ या विज्ञान प्रतिकृतीसाठी द्वितीय क्रमांक पटकावला. यासोबतच त्याने विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून आपल्या बुद्धिमत्तेची व वैज्ञानिक दृष्टिकोनाची चुणूक दाखवून दिली.
माध्यमिक शिक्षक गटात शाळेच्या शिक्षिका प्रणाली गोरघाटे यांनी तयार केलेल्या ‘क्युरिऑसिटी ऑफ सायन्स’ या विज्ञान प्रतिकृतीला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. तसेच त्यांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली. त्यांच्या या यशातून शिक्षकांची वैज्ञानिक विचारसरणी, सर्जनशीलता आणि नावीन्यपूर्ण दृष्टिकोन दिसून आला.
त्याचप्रमाणे, प्रयोगशाळा परिचर गटात सृष्टी बेलखोडे यांनी तयार केलेल्या ‘आरोग्य व स्वच्छता’ या विषयावरील विज्ञान प्रतिकृतीला प्रथम क्रमांक प्रदान करण्यात आला. या प्रतिकृतीतून आरोग्य, स्वच्छता आणि सामाजिक जागरूकतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष श्री. हेमंत मानकर, सचिव श्रीमती राजिया खान, मुख्याध्यापक श्री. विजय शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या श्रीमती फरजाना शेख व श्रीमती शबिस्ता सय्यद, तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी पुरस्कारप्राप्त विद्यार्थी, शिक्षिका व सहभागींचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या मेहनतीचे आणि प्रयत्नांचे कौतुक करून भविष्यातही अशीच उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन दिले.
हे यश विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि शाळेत विज्ञान व नावीन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित आहे. या यशामुळे संपूर्ण शाळा परिवारात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वैभव कॉन्व्हेंट स्कूल परिवाराच्या वतीने सर्व पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!