Monday, April 20, 2026
HomePoliceशेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाने २३.५७ लाखांची ऑनलाइन फसवणूक; बल्लारपूरमध्ये गुन्हा दाखल
spot_img

शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाने २३.५७ लाखांची ऑनलाइन फसवणूक; बल्लारपूरमध्ये गुन्हा दाखल

शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाने २३.५७ लाखांची ऑनलाइन फसवणूक; बल्लारपूरमध्ये गुन्हा दाखल

ज्योत्स्ना वानखेडे:-शेअर मार्केटमध्ये जास्तीत जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका शेतकऱ्याची तब्बल २३ लाख ५७ हजार रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्याची गंभीर घटना बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

        उमेश देवराव वाढई (वय ३५), , रा. लावरी – नविन दहेली, पो. बाम्हणी, ता. बल्लारपूर, जि. चंद्रपूर यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारदार हे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचे बँक ऑफ इंडिया, शाखा बाम्हणी येथे खाते असून त्यांचा मोबाईल क्रमांक बँक खात्याशी जोडलेला आहे. ऑनलाइन व्यवहाराची प्राथमिक माहिती असली तरी ट्रेडिंग व गुंतवणुकीतील सखोल तांत्रिक बाबींचे ज्ञान नसल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

           दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी फेसबुकवर शेअर मार्केटसंबंधी व्हिडीओ पाहताना “पहिले काम पहा, मग विश्वास ठेवा” असा मजकूर दिसल्यानंतर ते “D5N Investment Alliance” या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडले गेले. या ग्रुपमध्ये करण सिंग हा अ‍ॅडमीन असून इतर दोन आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत मोबाईल क्रमांकांचे अ‍ॅडमीनही होते. ग्रुपमध्ये सुमारे १२३ सदस्य जोडलेले होते.

        दि. २९ सप्टेंबर २०२५ रोजी अ‍ॅडमीनकडून आलेल्या लिंकवरून “conifer” नावाच्या अ‍ॅपवर डिमॅट अकाउंट तयार करून देण्यात आले. ग्रुपमधील ‘आलोक सर’ नावाच्या व्यक्तीने पेअर मार्केटमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन देत इतर सदस्यांचे नफ्याचे स्क्रीनशॉट शेअर केल्याने तक्रारदाराचा विश्वास बसला.

        यानंतर तक्रारदाराने वेगवेगळ्या तारखांना आयएमपीएस व युपीआयच्या माध्यमातून बँक ऑफ बरोडा येथील विविध खात्यांमध्ये एकूण २३ लाख ५७ हजार रुपये गुंतवणूक म्हणून पाठवले. “conifer” अ‍ॅपवर नफा वाढत असल्याचे दाखविण्यात येत होते. दि. २० ऑक्टोबर २०२५ रोजी अ‍ॅपवर एकूण नफा ८६ लाख ८० हजार रुपये दाखविण्यात आला.

        त्यानंतर तक्रारदाराने ४०-४० लाख रुपये विड्रॉल करण्याचा प्रयत्न केला असता ते अयशस्वी ठरले. याबाबत विचारणा केली असता आरोपींनी विड्रॉलसाठी पुन्हा ७ लाख रुपये इन्कम टॅक्स भरण्याची मागणी केली. यानंतर चौकशी केली असता “conifer” नावाचे डिमॅट अकाउंट हे बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

        आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार आरोपी आलोक , करण सिंग यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

         या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून नागरिकांनी सोशल मीडियावरील गुंतवणूक योजनांपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page