Monday, May 18, 2026
HomeChandrapurचंद्रपूरच्या सुरक्षेला नवी बळकटी; आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याने नवीन पोलीस अधीक्षक...
spot_img

चंद्रपूरच्या सुरक्षेला नवी बळकटी; आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याने नवीन पोलीस अधीक्षक कार्यालयाला मिळणार मान्यता

चंद्रपूरच्या सुरक्षेला नवी बळकटी; आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याने नवीन पोलीस अधीक्षक कार्यालयाला मिळणार मान्यता

आ.मुनगंटीवार यांची गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांच्यासोबत सकारात्मक चर्चा

जूनच्या पहिल्या आठवड्यात मंत्रालयात होणार निर्णायक बैठक

पोलीसांना पायाभूत सुविधांबाबत आ. मुनगंटीवार यांची सातत्यपूर्ण भूमिका; पोलीस स्टेशन, निवास आणि गृहकर्जानंतर आणखी एक महत्त्वाचे पाऊल


Jyotsna Wankhede : चंद्रपूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम आणि आधुनिक करण्याच्या दृष्टीने राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना आणखी एक महत्त्वपूर्ण यश मिळण्याच्या दिशेने पाऊल पडले आहे. नवीन पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या उभारणीसंदर्भात गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांच्यासोबत आ. मुनगंटीवार यांनी सविस्तर चर्चा केली असून, जूनच्या पहिल्या आठवड्यात मुंबई येथील मंत्रालयात यासंदर्भात विस्तृत बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत चंद्रपूरच्या नवीन पोलीस अधीक्षक कार्यालयाला मान्यता मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

चंद्रपूर जिल्ह्याच्या वाढत्या लोकसंख्येसोबतच औद्योगिक विस्तार, नागरीकरण आणि वाढत्या प्रशासकीय गरजा लक्षात घेता आधुनिक व सुसज्ज पोलीस अधीक्षक कार्यालयाची आवश्यकता अनेक वर्षांपासून जाणवत होती. पोलीस अधीक्षक कार्यालय हे केवळ प्रशासकीय केंद्र नसून संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेचे नियोजन, समन्वय, कायदा-सुव्यवस्थेचे व्यवस्थापन, गुन्हे नियंत्रण आणि नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित महत्त्वपूर्ण निर्णयांचे केंद्र असते. त्यामुळे नव्या कार्यालयामुळे पोलीस प्रशासन अधिक गतिमान, प्रभावी आणि तंत्रसुसज्ज होण्यास मदत होणार आहे.

पोलीस विभागाच्या बळकटीकरणासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांचे योगदान यापूर्वीपासूनच उल्लेखनीय आणि दूरदृष्टीपूर्ण राहिले आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी भद्रावती, दुर्गापूर, बल्लारपूरसह जिल्ह्यातील विविध नवीन पोलीस स्टेशनना मान्यता मिळवून देत पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला होता. केवळ प्रशासकीय विस्तारावरच नव्हे, तर पोलीस कर्मचाऱ्यांच्या मूलभूत सुविधांकडेही त्यांनी संवेदनशीलतेने लक्ष दिले. चंद्रपूर येथील पोलीस क्वार्टर्ससाठी निधी मंजूर करून सुसज्ज निवास व्यवस्था उभारण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच, मुल येथील नवीन पोलीस स्टेशन इमारत बांधकामासाठीही त्यांनी विशेष पुढाकार घेत आवश्यक निधी मंजूर करून आणला. त्यांच्या पाठपुराव्यानंतर या इमारतीचे काम आता प्रगतीपथावर असून, पोलीस प्रशासनासाठी अधिक सक्षम आणि आधुनिक सुविधा उभारण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

नुकतेच राज्यातील ५ हजार ४५९ पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या घरकुल स्वप्नाला चालना मिळाली असून, प्रलंबित असलेल्या डीजी लोन योजनेसाठी शासनाने तब्बल १७६८.०८ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे. या प्रश्नावरही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे राज्यातील हजारो पोलीस कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून, पोलीस दलाच्या कल्याणासाठी त्यांनी घेतलेल्या संवेदनशील भूमिकेचे राज्यभरातून कौतुक होत आहे.

आता नवीन पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रस्तावालाही गती मिळत असल्याने चंद्रपूरच्या सुरक्षाव्यवस्थेला आणि पोलीस प्रशासनाला अधिक सक्षम करणारे आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जाणार असल्याचे मानले जात आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page