Friday, June 19, 2026
HomeChimurदेहव्यापार प्रकरणानंतर चिमूरमधील ‘वनिता बिअर बार’चा परवाना कायमस्वरूपी रद्द
spot_img

देहव्यापार प्रकरणानंतर चिमूरमधील ‘वनिता बिअर बार’चा परवाना कायमस्वरूपी रद्द

देहव्यापार प्रकरणानंतर चिमूरमधील ‘वनिता बिअर बार’चा परवाना कायमस्वरूपी रद्द

*ज्योत्स्ना वानखेडे*: चिमूर येथील वनिता बिअर बार अँड रेस्टॉरंटच्या नावाखाली कुंटणखाना चालविल्याचे उघड झाल्यानंतर प्रशासनाने कठोर पाऊल उचलत संबंधित बिअर बारचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ मे २०२६ रोजी चिमूर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वनिता बिअर बारवर छापा टाकण्यात आला होता. या कारवाईत बारच्या नावाखाली देहव्यापार सुरू असल्याचे समोर आले. पोलिसांनी एका पीडित महिलेची सुटका करत बार संचालिका वनिता जगन रंगारी हिच्याविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा (PITA Act) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते.
तपासादरम्यान संबंधित बिअर बारमध्ये महिलांचे आर्थिक शोषण करून देहव्यापार चालविला जात असल्याचे पुराव्यांवरून स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, हा बार दाट लोकवस्तीच्या भागात असून परिसरात मशिदी व बौद्ध विहार यांसारखी धार्मिक स्थळेही आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत चिमूर पोलिसांनी बिअर बारचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी आबकारी विभागाचा अहवाल मागवून संपूर्ण प्रकरणाची पडताळणी केली. पोलिसांच्या अहवालाला आबकारी विभागाच्या अहवालानेही दुजोरा दिल्यानंतर वनिता रंगारी यांच्या FL (III)-4846 या परवान्याचे कायमस्वरूपी रद्दीकरण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी १६ जून २०२६ रोजी दिले.
या निर्णयामुळे बिअर बारच्या नावाखाली सुरू असलेले बेकायदेशीर कृत्य पूर्णतः बंद झाले असून परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. चिमूर पोलिसांच्या या धडक कारवाईचे सर्वत्र स्वागत होत असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेचे कौतुक केले जात आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page