*जपतलाई आश्रमशाळेतील सर्पदंशाच्या दुर्दैवी घटनेची तातडीने दखल; विद्यार्थिनींच्या उपचारासाठी सर्वतोपरी प्रयत्न*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई निवासी आश्रमशाळेत सर्पदंशाची दुर्दैवी घटना घडून तीन विद्यार्थिनींचा मृत्यू, तर तीन विद्यार्थिनी गंभीर असल्याची माहिती मिळताच मन अत्यंत व्यथित झाले.
मी मुंबईच्या प्रवासात असतानाच घटनेची माहिती मिळताच तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे भेट देऊन गंभीर विद्यार्थिनींच्या प्रकृतीची माहिती घेतली. डॉक्टरांशी चर्चा करून उपचाराबाबत आवश्यक सूचना दिल्या.
घटनेची माहिती मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मिळताच त्यांनी तातडीने दखल घेत गंभीर विद्यार्थिनींना अधिक चांगल्या उपचारासाठी एअर अॅम्ब्युलन्सद्वारे नागपूर येथे हलविण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे विद्यार्थिनींच्या उपचारासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली.
त्यानंतर जपतलाई आश्रमशाळेला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करून आश्रमशाळेतील सुरक्षाव्यवस्थेची पाहणी केली. तसेच सहपालकमंत्री अँड आशिषजी जयस्वाल यांचा सोबत घटनास्थळाची पाहणी करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक त्या तातडीच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा केली.
या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांच्या दुःखात मी मनापासून सहभागी आहे. ईश्वर मृत विद्यार्थिनींच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.
दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ₹५ लाखांची शासकीय मदत देण्यात येत असून, मुख्यमंत्री सहायता निधीतून अतिरिक्त ₹५ लाखांची मदत मिळवून देण्यासाठीही प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत यासाठी आश्रमशाळांमधील सुरक्षा व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेऊन प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्याची आवश्यकता आहे. यासाठी प्रशासनासोबत समन्वय साधून आवश्यक त्या सर्व उपाययोजनांसाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल.
विद्यार्थ्यांचे जीवन आणि सुरक्षितता हीच सर्वोच्च जबाबदारी आहे.