Tuesday, August 18, 2026
spot_img
HomeProjectचंद्रपूरच्या विकासासाठी गडकरींचा सकारात्मक दृष्टिकोन प्रेरणादायी - आ. किशोर जोरगेवार रिंग...

चंद्रपूरच्या विकासासाठी गडकरींचा सकारात्मक दृष्टिकोन प्रेरणादायी – आ. किशोर जोरगेवार रिंग रोडला हिरवा कंदील, फ्लायओव्हरच्या विषयावरही सविस्तर चर्चा..

चंद्रपूरच्या विकासासाठी गडकरींचा सकारात्मक दृष्टिकोन प्रेरणादायी – आ. किशोर जोरगेवार

रिंग रोडला हिरवा कंदील, फ्लायओव्हरच्या विषयावरही सविस्तर चर्चा..

*Jyotsna Wankhede*: चंद्रपूरच्या वाढत्या शहरीकरणासोबत भविष्यातील वाहतुकीची गरज लक्षात घेता बहुप्रतीक्षित रिंग रोड प्रकल्पासाठी आता सकारात्मक दिशा मिळाली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी “रिंग रोड अत्यंत गरजेचा आहे. तो सुरू झाला असे समजून कामाला लागा,” असे स्पष्ट करत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. त्यांच्या या भूमिकेमुळे चंद्रपूरच्या रिंग रोड प्रकल्पाच्या दृष्टीने आशादायी वातावरण निर्माण झाले असून, फ्लायओव्हरच्या विषयावरही सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली.

              केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपूर येथील महाल परिसरातील नवीन निवासस्थानी स्थलांतरित झाल्याबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यानंतर झालेल्या चर्चेत चंद्रपूर शहराच्या पायाभूत विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रिंग रोड आणि फ्लायओव्हरच्या विषयांकडे त्यांनी केंद्रीय मंर्त्यांचे लक्ष वेधले. चंद्रपूरच्या भविष्यातील गरजा लक्षात घेता हे दोन्ही प्रकल्प शहराच्या विकासासाठी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  चंद्रपूर शहराचा झपाट्याने विस्तार होत असून शहराची लोकसंख्या आणि वाहनांची संख्या सातत्याने वाढत आहे. परिणामी प्रमुख मार्गांवर वाहतुकीचा ताण वाढत असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासोबतच भविष्यातील वाढता वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी रिंग रोड महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. शहराच्या विविध भागांना जोडणारी सक्षम वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे आ. जोरगेवार यांनी सांगितले.

  यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चंद्रपूरच्या विकासाबाबत सकारात्मक दृष्टिकोन व्यक्त केला. “रिंग रोड अत्यंत गरजेचा आहे. तो सुरू झाला असे समजून कामाला लागा,” असे सांगत त्यांनी या प्रकल्पाला सकारात्मक पाठबळ दिले. केंद्रीय मंर्त्यांच्या या भूमिकेमुळे चंद्रपूरकरांच्या अनेक वर्षांच्या अपेक्षांना नवी आशा मिळाली असून, रिंग रोडच्या कामाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  यावेळी फ्लायओव्हरच्या विषयावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील वाढती वाहतूक, प्रमुख चौकांवरील वाहतूक कोंडी आणि भविष्यातील शहरी विस्तार लक्षात घेता फ्लायओव्हरची आवश्यकता असल्याचे आ. जोरगेवार यांनी केंद्रीय मंर्त्यांच्या निदर्शनास आणून दिले. फ्लायओव्हरच्या माध्यमातून शहरातील वाहतुकीचा वेग वाढण्यासोबतच नागरिकांचा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. त्यामुळे रिंग रोडसोबतच फ्लायओव्हरच्या प्रकल्पालाही गती मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

             केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना आ. किशोर जोरगेवार म्हणाले की, नितीन गडकरी हे पायाभूत सुविधांच्या माध्यमातून शहरांचा कायापालट घडवून आणणारे निर्णयक्षम नेतृत्व आहे. विकासाच्या विषयांवर तातडीने निर्णय घेण्याची त्यांची कार्यपद्धती आणि दूरदृष्टी नेहमीच प्रेरणादायी ठरली आहे. चंद्रपूरच्या विकासाबाबतही त्यांनी सातत्याने सकारात्मक सहकार्याची भूमिका घेतली आहे.

             रिंग रोड आणि फ्लायओव्हरसारखे महत्त्वाचे प्रकल्प प्रत्यक्षात साकारल्यास चंद्रपूरच्या वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासोबतच शहराच्या विविध भागांतील संपर्क व्यवस्था अधिक सक्षम होईल. याचा थेट फायदा नागरिक, व्यापारी, उद्योजक तसेच शहराच्या एकूण विकासाला होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पांकडे केवळ वाहतुकीच्या दृष्टीने नव्हे, तर चंद्रपूरच्या भविष्यातील सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने पाहणे आवश्यक असल्याचे आ. जोरगेवार यांनी सांगितले.

            चंद्रपूरच्या पायाभूत विकासासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रकल्पांना गती मिळावी, यासाठी आपला पाठपुरावा सातत्याने सुरू राहणार आहे. रिंग रोड आणि फ्लायओव्हर या दोन्ही प्रकल्पांना प्रत्यक्ष स्वरूप देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page