Monday, September 14, 2026
spot_img
Homeबल्लारपूरबल्लारपूरच्या विकासासाठी शासन जमा १९.२१ हेक्टर जमीन लोकहिताच्या प्रकल्पांसाठी द्या - आ....

बल्लारपूरच्या विकासासाठी शासन जमा १९.२१ हेक्टर जमीन लोकहिताच्या प्रकल्पांसाठी द्या – आ. सुधीर मुनगंटीवार

बल्लारपूरच्या विकासासाठी शासन जमा १९.२१ हेक्टर जमीन लोकहिताच्या प्रकल्पांसाठी द्या – आ. सुधीर मुनगंटीवार

कामगार विमा रुग्णालय, आयुष्य रुग्णालय व प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांसाठी ४७ एकर जागा आरक्षित करण्याची आ.मुनगंटीवार यांची मागणी

आ. मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकारी वसुमना पंत यांना पत्र; सार्वजनिक हिताच्या भविष्यातील गरजांनाही प्राधान्य देण्याची भूमिका


*Jyotsna Wankhede*: बल्लारपूर शहराच्या भविष्यातील गरजा आणि नागरिकांचे व्यापक सार्वजनिक हित लक्षात घेऊन शासन जमा झालेल्या १९.२१ हेक्टर जमिनीचा लोककल्याणकारी व नियोजनबद्ध वापर करण्यात यावा, अशी मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्याकडे केली आहे. या जमिनीपैकी राज्य कामगार विमा रुग्णालयासाठी ७ एकर, आयुष्य रुग्णालयासाठी ३० एकर आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गरीब व गरजू नागरिकांच्या घरकुलांसाठी १० एकर, अशा एकूण ४७ एकर जागेचे आरक्षण करण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रातून केली आहे. शासनाच्या ताब्यात आलेली ही जमीन केवळ महसुली नोंद न राहता बल्लारपूरच्या सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य, निवारा आणि मूलभूत सुविधांसाठी उपयोगी पडावी, ही आ. मुनगंटीवार यांची ठाम भूमिका आहे.

बल्लारपूर इंडस्ट्रीज लिमिटेड यांना निवासी प्रयोजनासाठी मंजूर असलेल्या १९.२१ हेक्टर जमिनीचा औद्योगिक प्रयोजनासाठी वापर करून मंजुरीतील अटी व शर्तींचा भंग करण्यात आल्याची बाब आ. सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र विधानसभेत उपस्थित केली होती. यासंदर्भात त्यांनी विधानसभेत अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती. त्यावेळी तत्कालीन महसूल राज्यमंत्र्यांनी नियमानुसार कार्यवाही करून अटी व शर्तींचा भंग झालेली जमीन शासन जमा करण्याबाबत आश्वासन दिले होते. या विषयावर सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे सदर १९.२१ हेक्टर जमीन शासन जमा करण्यात आली आहे.

शासन जमा झालेली ही जमीन आता बल्लारपूरच्या विकासासाठी महत्त्वाची संपत्ती असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी नमूद केले आहे. सदर जमिनीचा वापर कोणत्याही मर्यादित अथवा खाजगी स्वरूपाच्या प्रयोजनासाठी न करता शहरातील नागरिकांच्या व्यापक हितासाठी व्हावा, यासाठी आ.मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे. नुकत्याच मुंबई येथे अपर मुख्य सचिव, महसूल विभाग यांच्यासमवेत झालेल्या बैठकीतही या जमिनीच्या लोकहिताच्या वापराबाबत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत निश्चित झालेल्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी आ.मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

या तिन्ही प्रकल्पांसाठी एकूण ४७ एकर जागा आरक्षित होणार आहे. हे प्रकल्प बल्लारपूर शहराच्या विकासाला चालना देणारे आणि नागरिकांच्या सार्वजनिक गरजा पूर्ण करणारे ठरतील, असा विश्वास आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.कामगारांसाठी आरोग्य सुविधा, सर्वसामान्य नागरिकांसाठी आधुनिक रुग्णालयीन सेवा आणि गरीब कुटुंबांसाठी हक्काचे घर, या तीन मूलभूत गरजांचा एकत्रित विचार करून शासन जमा जमिनीचा वापर करण्याची आ. मुनगंटीवार यांची भूमिका बल्लारपूरच्या सर्वांगीण विकासाचा व्यापक दृष्टिकोन अधोरेखित करणारी आहे. उपलब्ध जमीन ही केवळ सरकारी मालमत्ता न राहता तिचा थेट लाभ नागरिकांना मिळावा, यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.

विशेषतः बल्लारपूरसारख्या औद्योगिक शहरात कामगारांच्या आरोग्याची काळजी, सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार उपचारांची उपलब्धता आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना निवाऱ्याची सुविधा या बाबींना प्राधान्य देणे आवश्यक आहे. शासन जमा झालेल्या जमिनीचा उपयोग या तीन महत्त्वाच्या लोकहिताच्या गरजांसाठी करून शहराच्या भविष्यातील विकासाचा मजबूत पाया घालण्याचा आ. मुनगंटीवार यांचा प्रयत्न आहे.त्यामुळे अपर मुख्य सचिव, महसूल विभाग यांच्यासमवेत झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने शासन जमा झालेल्या १९.२१ हेक्टर जमिनीपैकी राज्य कामगार विमा रुग्णालयासाठी ७ एकर, आयुष्य रुग्णालयासाठी ३० एकर आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांसाठी १० एकर जागा आरक्षित करण्याची आवश्यक प्रशासकीय कार्यवाही तातडीने करण्यात यावी, अशी विनंती आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्याकडे केली आहे.

सदर जागेची प्रत्यक्ष पाहणी, मोजणी, उपलब्ध अभिलेखांची पडताळणी आणि आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून संबंधित विभागांना जमीन उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव तातडीने सादर करण्यात यावा, अशी मागणीही आ.मुनगंटीवार यांनी केली आहे. बल्लारपूरच्या नागरिकांच्या व्यापक हितासाठी उपलब्ध झालेल्या या जमिनीचा दूरदृष्टीने आणि लोककल्याणकारी पद्धतीने वापर होणे हीच या संपूर्ण कार्यवाहीची योग्य परिणती ठरेल, अशी भूमिका आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

कामगारांसाठी राज्य कामगार विमा रुग्णालय

बल्लारपूर हे औद्योगिक शहर असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग वास्तव्यास आहे. औद्योगिक कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना दर्जेदार, सुलभ आणि त्यांच्या गरजेनुसार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य कामगार विमा रुग्णालयासाठी ७ एकर जागा आरक्षित करण्यात यावी, अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली आहे.

आयुष्य रुग्णालयासाठी ३० एकर जागा

बल्लारपूर तसेच आसपासच्या परिसरातील नागरिकांना आधुनिक व अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आयुष्य रुग्णालयासाठी ३० एकर जागा आरक्षित करण्याची मागणी करण्यात आली आहे. वाढती लोकसंख्या, आरोग्यसेवेची वाढती गरज आणि भविष्यातील अत्याधुनिक उपचार सुविधा लक्षात घेता या प्रकल्पासाठी पुरेशी जागा उपलब्ध असणे आवश्यक असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.

गरीब व गरजूंसाठी घरकुलांना १० एकर जागा

बल्लारपूर शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरीब आणि गरजू कुटुंबांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे, यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांच्या निर्मितीसाठी १० एकर जागा आरक्षित करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. शासन जमा झालेल्या जमिनीचा उपयोग समाजातील गरजू घटकांच्या निवाऱ्याच्या मूलभूत गरजेसाठी झाल्यास या जमिनीचा खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी उपयोग होईल, अशी भूमिका आ.मुनगंटीवार यांनी मांडली आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page