*सी.एस.टी.पी.एस. परिसरातील कॉपर केबल चोरीचा पर्दाफाश, १० आरोपी दुर्गापूर पोलिसांच्या ताब्यात*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र (CSTPS) परिसरातून कॉपर केबल चोरीच्या वाढत्या घटनांच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन दुर्गापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी दुर्गापूर पोलिसांनी विशेष पथक तयार केले होते.
गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक: १८/०९/२०२६ रोजी पहाटे पोलिसांनी कारवाई करून सुमारे ६ क्विंटल कॉपर वायर, अंदाजे किंमत ₹ ७,२०,०००/- तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेला एक ट्रक, किंमत अंदाजे ₹ १५,००,०००/-, असा एकूण ₹ २२,२०,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एकूण १० आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई व तपास सुरू आहे.
सदर प्रकरणात फिर्यादी सहदेव कैलास नारनवरे, वय ४० वर्षे, व्यवसाय—नोकरी, रा. वसाहत ऊर्जानगर, ता. जि. चंद्रपूर, यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन दुर्गापूर येथे गुन्हा रजि. क्र. ०३९८/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. श्री. आयुष नोपानी, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, मा. श्री. ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर व मा. श्री. प्रमोद चौगुले, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन दुर्गापूर ठाणेदार संतोष शेंगावकर व पोलीस स्टेशन दुर्गापूरच्या गुन्हे शोध पथकाचे पोउपनि संदीप बच्छीरे, पोहवा राजु गोखरे, पोअं संदीप जाधव, सोनल खोब्रागडे, स्विखील उराडे, कोमल मोहजे यांनी यशस्वीपणे पार पाडली.