गरजू बालकांच्या हृदय उपचाराची जबाबदारी स्वीकारणार – किशोर जोरगेवार
258 बालकांची हृदय तपासणीय 48 बालकांच्या हृदयात छिद्र आढळले, मुंबईत होणार शस्त्रक्रिया
*Jyotsna Wankhede*:
आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही बालकाला हृदयावरील उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, आरोग्य क्षेत्रात सातत्याने काम करण्यात येत आहे. बालकांचे निरोगी आयुष्य हीच आपली सर्वात मोठी जबाबदारी असून, गरजू बालकांच्या उपचारासाठी आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहणार आहोत, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
सेवा संकल्प अभियानांतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने किम्स रुग्णालय, मुंबई आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या सहकार्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात बाल हृदय आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. शिबिराला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके, मुंबई येथील ज्युपिटर रुग्णालयाचे डॉ. परमानंद आनंदकर, किम्स रुग्णालयाचे डॉ. एल. श्रीनिवास, डॉ. सोनिया कारापूरकर, भारतीय जनता पार्टीचे महामंत्री रवि गुरुनुले, सविता दंढारे, नामदेव डाहुले, महिला मोर्चा प्रभारी वंदना हातगावकर, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, मंडळ अध्यक्ष स्वप्निल डुकरे, विमल कातकर, सुमित बेले, राकेश नाकाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये तब्बल ३१६ बालकांची हृदय तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान 48 बालकांच्या हृदयात छिद्र असल्याचे निदर्शनास आले. या सर्व बालकांवर मुंबई येथील खाजगी रुग्णालयात आवश्यक त्या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे आपल्या पाल्याच्या उपचाराबाबत चिंतेत असलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, अनेक कुटुंबांमध्ये लहान बालकाला हृदयविकार असल्याचे समजल्यानंतर उपचाराचा मोठा आर्थिक प्रश्न निर्माण होतो. उपचाराचा खर्च परवडत नसल्यामुळे अनेक पालकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत केवळ आर्थिक अडचणीमुळे एका बालकाचा उपचार थांबू नये, यासाठी सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आला आहे. आजच्या शिबिरात तपासणी करण्यात आलेल्या बालकांपैकी 48 बालकांच्या हृदयात छिद्र आढळले असून, त्यांच्या पुढील उपचाराची जबाबदारी घेण्यात येणार आहे.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून यापूर्वीही बाल हृदय आरोग्य तपासणीची शिबिरे घेण्यात आली आहेत. या शिबिरांच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास 268 बालकांवर मुंबई येथे यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियांनंतर अनेक बालकांना नव्याने निरोगी आयुष्य जगण्याची संधी मिळाली आहे. यंदाच्या शिबिरात शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या बालकांवरही मुंबई येथील खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे आमदार जोरगेवार यांनी सांगितले.
सेवा ही केवळ एका दिवसाच्या उपक्रमापुरती मर्यादित न राहता गरजू व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणारी असली पाहिजे. एका बालकाचा उपचार होणे म्हणजे त्या बालकासोबतच संपूर्ण कुटुंबाला नव्या आशेचा आधार मिळणे आहे. त्यामुळे आरोग्याच्या क्षेत्रात गरजू नागरिकांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी भविष्यातही विविध उपक्रम राबविण्यात येतील, असे आमदार जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.
शिबिरामध्ये बालकांची तपासणी करण्यासोबतच शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या बालकांची पुढील उपचारासाठी निवड करण्यात आली. मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने या बालकांवर आवश्यक उपचार करण्यात येणार आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील गरजू बालकांना मुंबईसारख्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या तज्ज्ञ वैद्यकीय उपचारांचा लाभ मिळणार आहे.
ओवीच्या निरोगी हास्याने भारावले आमदार जोरगेवार, दीड वर्षांपूर्वी हृदयात छिद्र आढळलेल्या चिमुकलीची घेतली भेट
दीड वर्षांपूर्वी अवघ्या एका दिवसाची असताना आरोग्य शिबिरात तपासणीसाठी आलेल्या ओवी अडबाले या चिमुकलीच्या हृदयात छिद्र असल्याचे निदान झाले होते. तिच्या उपचारासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी पुढाकार घेत मुंबई येथील ज्युपिटर रुग्णालयात तिच्यावर दोन वेळा निःशुल्क शस्त्रक्रिया करून दिली. आज दीड वर्षांची झालेली ओवी पुन्हा येथील आरोग्य शिबिरात नियमित तपासणीसाठी आली असता आमदार किशोर जोरगेवार यांची तिच्याशी भेट झाली. चिमुकलीला पूर्णतः निरोगी पाहून आमदार जोरगेवार भावूक झाले.
दीड वर्षांपूर्वी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने आयोजित आरोग्य शिबिरात ओवी आपल्या आई-वडिलांसोबत आरोग्य शिबिरात आली होती. तपासणीदरम्यान तिच्या हृदयात छिद्र असल्याचे समोर आले. आपल्या चिमुकल्या मुलीच्या हृदयासंबंधीची ही बाब समोर आल्यानंतर तिच्या आई-वडिलांसमोर मोठे संकट उभे राहिले होते. मात्र, ओवीच्या उपचारासाठी आमदार जोरगेवार यांनी पुढाकार घेत तिच्या कुटुंबाला आधार दिला. मुंबई येथील ज्युपिटर रुग्णालयात तिच्यावर दोन वेळा निःशुल्क शस्त्रक्रिया करण्यात आली.
उपचारानंतर ओवी आता पूर्णतः निरोगी झाली आहे. आज चंद्रपूर येथे आयोजित आरोग्य शिबिरात नियमित तपासणीसाठी ती आली असता आमदार जोरगेवार यांची तिच्याशी भेट झाली. दीड वर्षांपूर्वीची चिमुकली ओवी आज निरोगी आणि हसतमुख पाहून आमदार जोरगेवार यांना मोठा आनंद झाला. तिच्या चेहर्यावरील निरागस हास्य पाहून उपचारासाठी केलेले प्रयत्न सार्थकी लागल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
“एखाद्या चिमुकल्याला आजारातून बाहेर काढून त्याला निरोगी आणि आनंदी पाहणे, यापेक्षा मोठे समाधान नाही. ओवीच्या चेहर्यावरील आजचे हसू हीच आपल्या आरोग्यसेवेच्या प्रयत्नांची खरी पावती आहे,” अशी भावना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.