*चंद्रपूर पोलीस दलातील AI CCTV Survelliance Van मुळे गणपती विसर्जन काळात प्रभावी निगराणी, तडीपार इसमांवर वॉच तसेच चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यात यश …*
*चंद्रपूर पोलीस दलातील AI CCTV Survelliance Van मुळे गणपती विसर्जन काळात प्रभावी निगराणी, तडीपार इसमांवर वॉच तसेच चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यात यश …*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहर, राजुरा, वरोरा व जिल्ह्यात गणपती विसर्जन मिरवणुका शांततेत, सुरक्षित आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवून पार पाडण्यासाठी चंद्रपूर पोलीस दलामार्फत विशेष सुरक्षा नियोजन करण्यात आले होते.
मा. श्री. आयुष नोपानी, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांचे संकल्पनेतून दाखल झालेल्या AI आधारित CCTV Survelliance Van चा प्रभावी वापर करण्यात आला. सदर CCTV Survelliance Van चे प्रणालीमध्ये गर्दीचे ठिकाणी चोरी करणारे चंद्रपूर तसेच आजुबाजुचे इतर जिल्ह्यातील आरोपी व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तडीपार केलेले इसम अश्या १,५०० हून अधिक आरोपींचे माहिती समाविष्ट करण्यात आली होती.
गणपती विसर्जनाच्या कालावधीत शहरातील प्रमुख चौक, विसर्जन मार्ग, गर्दीची ठिकाणे, संवेदनशील ठिकाणे तसेच वाहन व नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेल्या परिसरात CCTV Survelliance Van तैनात करण्यात आली होती. सदर व्हॅनमधील अत्याधुनिक कॅमेरे AI आधारित तंत्रज्ञानाच्या सहाय्याने परिसरातील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. अत्याधुनिक यंत्रणेमुळे गर्दीच्या ठिकाणी तसेच विसर्जन मार्गावर सतत निगराणी ठेवणे शक्य झाले.
*तडीपार इसमांवर विशेष निगराणी*
गणेशोत्सवाच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तडीपार इसमांवर विशेष लक्ष ठेवणे आवश्यक असते. CCTV Survelliance व्हॅनच्या माध्यमातून गर्दीच्या परिसरातील व्यक्तींच्या हालचालींवर सतत निगराणी ठेवण्यात आली. संशयास्पद हालचाली आढळून आल्यास संबंधित पोलीस पथकांना तत्काळ सतर्क करून आवश्यक ती पडताळणी व प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. यामुळे तडीपार व्यक्तींकडून उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक स्वरुपात प्रभावी नियंत्रण ठेवण्यास मदत झाली.
*चोरीच्या घटनांवर नियंत्रण*
गणपती विसर्जनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असल्याने मोबाईल, पाकीट, दागिने व इतर मौल्यवान वस्तूंच्या चोरीच्या घटना घडण्याची शक्यता असते. अशा ठिकाणी CCTV Survelliance व्हॅनच्या माध्यमातून सतत देखरेख ठेवण्यात आली. गर्दीमध्ये संशयास्पद हालचाली, व्यक्तीची वारंवार होणारी ये-जा तसेच चोरीच्या उद्देशाने हालचाल करणाऱ्या संशयित व्यक्तींवर लक्ष ठेवण्यास या यंत्रणेची मोठी मदत झाली. CCTV निगराणीमुळे चोरीच्या घटना रोखण्यास तसेच एखादी घटना घडल्यास संबंधित व्यक्तीची ओळख पटविणे व त्यांचा माग काढणे अधिक सुलभ झाले. पो.स्टे. रामनगर येथे चोरी करणारे इसम यांचेवर गुन्हे नोंद करण्यात आले असून त्यांचे टोळीचा शोध सुरु आहे.
*रिअल-टाइम मॉनिटरिंगमुळे पोलीस प्रतिसाद अधिक गतिमान*
CCTV Survelliance व्हॅनमधून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे पोलीस नियंत्रण कक्ष व संबंधित पोलीस पथकांना आवश्यक माहिती तात्काळ उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी उद्भवणारी संभाव्य समस्या वेळीच लक्षात घेऊन संबंधित पथकाला घटनास्थळी पाठविणे शक्य झाले. विशेषतः विसर्जन मिरवणुकीदरम्यान गर्दीचे व्यवस्थापन, संशयास्पद हालचालींवर लक्ष, वाहतूक नियंत्रण आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला.
*तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सुरक्षित गणेशोत्सव*
चंद्रपूर पोलीस दलाकडून पारंपरिक पोलीस बंदोबस्तासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. CCTV Survelliance व्हॅन ही त्याचाच एक भाग असून, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रभावी पोलीसिंग या संकल्पनेनुसार तिचा वापर करण्यात आला.
प्रभावी वापरामुळे तडीपार इसमांवर निगराणी ठेवणे, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे, गर्दीच्या ठिकाणी चोरीच्या घटनांना प्रतिबंध करणे तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे यामध्ये चंद्रपूर पोलीस दलाला महत्त्वपूर्ण यश मिळाले.
चंद्रपूर पोलीस दलाकडून आगामी काळातही आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकांची सुरक्षितता अधिक सक्षम करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
अशी माहिती जनसंपर्क अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालय, चंद्रपूर यांनी दिली आहे.