*आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात लेझर लाईट, डी.जे. व तीव्र ध्वनिक्षेपकांवर निर्बंध ; पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांचे आदेश*
*ज्योत्स्ना वानखेडे*:
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आगामी काळात मस्कऱ्या गणपती स्थापना व विसर्जन, नवरात्र उत्सव (दुर्गा/शारदा स्थापना व विसर्जन), दांडिया, दसरा, धम्मचक्र प्रवर्तन दिन असे विविध धार्मिक, सांस्कृतिक व सार्वजनिक उत्सव आयोजित केले जाणार आहेत. दिनांक 29/09/2026 (रात्री 24.00 वा.) ते 30/10/2026 (रात्री 24.00 वा.) या कालावधीत सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था, कायदा व नागरिकांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 36 आणि कलम 38(1) अन्वये विशेष निर्बंध व मनाई आदेश जारी केले आहेत.
*प्रमुख निर्बंध व नियम :*
*लेझर लाईटवर पूर्ण बंदी (कलम 36 अन्वये) -* मिरवणुकीदरम्यान Lazer Light, तीव्र तीव्रतेचे Flash Light व मानवी डोळ्यांवर तसेच आरोग्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या प्रकाश यंत्रणांच्या वापरावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. पोलीस अधिकारी / सक्षम प्राधिकारी मिरवणुकीतील लाईट उपकरणांची तपासणी करू शकतील व धोकादायक आढळल्यास ते तात्काळ बंद करण्याचे निदेश देतील.
*ध्वनिवर्धक व DJ वापराबाबतचे नियम (कलम 38(1) अन्वये) :-*
*लेखी परवानगी अनिवार्य :* सक्षम प्राधिका-यांच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपक, लाऊडस्पिकर, ॲम्प्लीफायर वापर करता येणार नाही.
*डी.जे. व मॉडिफाईड साउंड सिस्टीमवर बंदी :* डी जे, प्लाझ्मा सिस्टीम, मॉडिफाईड साउंड इक्विपमेंट, वुफर, सबवुफर, यांसारख्या अत्यंत तीव्र व हानीकारक ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर पूर्णतः बंदी राहील.
*शांतता क्षेत्र :* रुग्णालय, शैक्षणिक संस्था, न्यायालये यांसारख्या घोषित शांतता क्षेत्र परिसरात ध्वनी मर्यादांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे.
*रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पूर्ण बंदी :* रात्री 10.00 ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व डी जे वापरण्यास सक्त मनाई राहील (जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सूट दिलेले दिवस / वेळ वगळून)
*परिसरनिहाय ध्वनी तीव्रता मर्यादा (डेसिबल – db ):*
क्षेत्र कोड क्षेत्राचा/विभागाचा प्रकार दिवसा मर्यादा रात्री मर्यादा
A औद्योगिक क्षेत्र 75 db 70 db
B व्यावसायीक क्षेत्र 65 db 55 db
C निवासी क्षेत्र 55 db 45 db
D शांतता क्षेत्र (सायलन्स झोन) 50 db 40 db
*नियमांचे उल्लंघन केल्यास होणारी कारवाई :*
*साहित्य जप्ती व कायदेशीर कारवाई -* नियमांचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 70 अन्वये ध्वनी व प्रकाश यंत्रणा / उपकरणे जप्त केली जातील.
*अटक व खटला -* आयोजक, ऑपरेटर किंवा वाहन चालक विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 72(2) अन्वये वारंटाशिवाय अटक केली जाऊ शकते तसेच कलम 134, 136 अन्वये न्यायालयात खटला दाखल केला जाईल.
चंद्रपूर पोलीस प्रशासनाने सर्व नागरिक, उत्सव मंडळे व आयोजकांना शांततापूर्ण वातावरणात सण उत्सव साजरे करण्याचे आणि पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.